
ज्योती आधाट-तुपे, ९४२०९५००७५
आई असावी तर माँ जिजाऊंसारखी (Jijamata). जिजाऊ मातेला स्वराज्यासाठी (Swarajya) आपल्या पुत्राला कणखर आणि शूर बनवावे असे वाटत होते. आपल्या लेकराला स्वराज्याच्या अग्निकुंडात समर्पण करायला लावणारी माता ही खरोखर किती शक्तिशाली, प्रखर अन् तेजस्वी असेल.
का? त्यांच्या मनात स्वराज्यासाठी झगडण्याची प्रेरणा निर्माण झाली. महाराष्ट्र संपूर्णपणे अन्याय सहन करत होता. मुघल सत्तांच्या अन्यायामुळे सगळी पिके, घरे चिरडून जात होती. माता-भगिनींचा संरक्षणाचा मोठा प्रश्न होता. सगळीकडे अशांत असे वातावरण होते.
जिजाऊंचे माहेर डोळ्यांदेखत संपवले जात होते. या महाभयानक संकटांना संपवण्याची ताकद कोणात असणार? हजारो स्वारांच्या या फौजांना कोण रोखू शकणार होतं? समुद्राची लाट थांबवण्याइतकेच ते अशक्य होतं.
किती आक्रोश, असुरक्षित वातावरण, अन्यायकारक धोरणे, असंवेदनशील वृत्ती पाहून या स्वराज्यजननीला आतून पेटून उठल्यासारखं झालं. आधी संघर्ष पाहिल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय कुठलीही चांगली गोष्ट घडत नाही.
अगदी तसेच छत्रपती शिवरायांचा जन्म हा स्वराज्यासाठीच झाला होता. मुघली सत्तांना जबर चपराक देण्याचे धाडस माझ्या जिजाऊने अंगी बाणले. अवतीभवतीचा संघर्ष, जुलूम, हाल, दुःख निद्रिस्त भवानीच्या दाराशी आक्रोश करीत होते.
हा आक्रोश जिजाऊंच्या कानी पडला. भवानीमातेला आर्त हाक प्रजा मारत होती आणि साक्षात जिजामातेच्या रुपातच जणू ही भवानीमाता स्वराज्याप्रेरिका बनून अवतरली.
दैत्यांचा संहार करण्यासाठी अनेक महिषासुरमर्दिनी अशाच पेटून उठलेल्या आपण पुराण कथेत वाचलेल्या आहेत. पण या मुघली सत्तांचा बीमोड करण्यासाठी ही देवी स्वतःसोबत आपल्या पुत्रालाही जागवते.
सजगता हा गुण गर्भातच पेरते. जिजाऊ नसती तर शिवबा नसते. जिजाऊंनी घेतलेल्या अन्नाच्या प्रत्येक घासागणिक पोटातल्या शिवबाला स्वराज्याचे पोषण होत होते. गर्भसंस्कार हे जाणीवपूर्वक स्वराज्याच्या दृष्टीने चालू होते.
आई भवानीला या शूर मातेने प्रार्थनेतून आर्त हाक दिली होती की, हे माते स्वराज्यरक्षणासाठी एक शूर पुत्र तू मला बहाल कर. मला शक्ती दे.
पोटातल्या बाळाशी जिजाऊसाहेब स्वराज्य रक्षणाच्याच गप्पा मारायच्या. किती धाडसी विचार होते हे! कोणती आई आपल्या लेकराला या जीवघेण्या लढाईत उतरवील.
आजच्या माझ्यासकट सगळ्या माता-भगिनींनी सखोल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या लेकराला जर थोडे खरचटले तरी आपला जीव कासावीस होतो. प
ण या मातेला डोहाळेच हत्तीवर बसण्याचे, भालाफेक करण्याचे, युद्ध करण्याचे, डोंगरावर किल्ले चढण्याचे लागावेत.
किती विशेष आहे. कुणी त्यांना विचारले की, मुली तुला काय हवंय तर मला स्वातंत्र्य हवे! पराक्रम हवा! अपमानांची भरपाई हवी! असे त्या सांगायच्या.
छत्रपती शिवरायांना स्वराज्य खेचून आणण्याची शक्ती माँ जिजाऊँमुळे मिळाली. पोटात असतानाच झालेले हे सामर्थ्यशाली संस्कार बाळ शिवबा तितक्याच सामर्थ्याने घेऊन आले होते.
आणि नुसतेच ते विचारापुरते नसून त्यावर छत्रपती शिवरायांनी जिवाची पर्वा न करता स्वराज्य खेचून आणले.
धन्य ती थोरमाता
घडविले शिवबाला
केले सामर्थ्यशाली संस्कार
दिला स्वराज्यास आकार
स्वराज्य मिळवणे ही प्रथम इच्छा जिजाऊंच्या मनात रुजली. अन् नुसती रुजली नाही तर, जिवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या समर्पित भावनेच्या साथीने स्वराज्य मिळवण्यात छत्रपती शिवरायांना यश मिळाले.
स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि फक्त बघणाऱ्याच नाही तर ते सत्यात देखील उतरवणाऱ्या, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं.
अशा या शूर पराक्रमी जिजामाता, (राजमाता जिजाऊ) यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पुत्र शिवबाच्या मनात पेरलं. नुसतं पेरलचं नाही तर ते तितकंच सुसंस्काराचं खतपाणी घालून त्याला फुलवलं.
शिवबांनी आपल्या आईवडिलांचं स्वराज्याचं स्वप्न तितक्याच ताकदीनं पूर्ण केलं. जिजाऊंनी आजीची भूमिकाही तितक्याच निडरपणे निभावली.
शंभूराजांनाही घडवताना त्यांनी त्यांच्यातल्या नेतृत्वाला जागवलं. स्वराज्यासाठी आपले लेकरू समर्पित करणाऱ्या या महान मातेला कृतज्ञतापूर्वक मानाचा मुजरा! स्वराज्यप्रेरिका जिजाऊमाता आपल्या सर्वांच्या मनात कर्तृत्वाचा ठसा असाच जन्मोजन्मी उमटवत राहतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.