
Mumbai News : बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांची बँक खाती विमा कंपनीने (Insurance Company) चुकीचा पीकविमा जमा झाल्याचे कारण देत गोठवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला, तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सीबिलवरही झाला.
अशा प्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून, संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांनी केली.
विधानसभेत स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर चर्चेदरम्यान गुरुवारी (ता.२) श्री. मुंडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘खरीप हंगाम २०२२ मधील विमाधारक शेतकऱ्यांपैकी सुमारे १२ हजार खात्यांवर एकूण १२ कोटी रुपये रक्कम बजाज अलायन्स विमा कंपनीने जमा केले होते.
मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही आणि त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहार्य आहे.’’
ऐन अडचणीच्या काळात बँक खाते गोठवल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खात्यावरील जमा पैसे काढता येत नव्हते. त्या काळात विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ते १२ हजार शेतकरी नेमके कोणते, याबाबतही संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला.
तसेच विमा कंपनीच्या चुकीच्या वसुली धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सीबिलवरही परिणाम झाला व त्याचा त्रास भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेताना होऊ शकतो, असे श्री. मुंडे म्हणाले.
विमा कंपनीच्या या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध राज्य शासनाने विमा कंपनी विरोधात गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या सिबिलवर कोणताही परिणाम होणार नाही,
याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणी श्री. मुंडे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.