
Sangli Tembhu Irrigation News : सातारा, सांगली आणि सोलापूर या तिन्ही दुष्काळी भागांत टेंभू उपसा सिंचनाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या योजनेची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जातात. २०२२-२३ या वर्षात टेंभू उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाणीपट्टी वसुलीसाठी ३९० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
या आर्थिक वर्षात ५२० कोटींची पाणीपट्टी वसूल झाली असून उद्दिष्टापेक्षा अधिक पाणीपट्टी वसूल झाल्याने योजनेचे आवर्तन सुरू करण्यात कसल्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत.
सातारा, सांगली आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांतील २१० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर लाभ क्षेत्राला पाणी देणारी ही योजना आहे.
या योजनेतून खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशी तीन आवर्तने सोडली जातात. यामुळे लाभ क्षेत्रातील गावांना याचा फायदा होत आहे. मुळात योजना म्हटल की पाणीपट्टी वसुली आलीच.
परंतु या योजनेच्या लाभ क्षेत्रात सुमारे ९ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या माध्यमातून पाणीपट्टी वसुलीसाठी मोठे सहकार्य मिळत असल्याने पाणीपट्टी वसूल करण्यासाठी या योजनेच्या अधिकाऱ्यांना अडचणी येत नाहीत.
मुळात गेल्या काही वर्षांपासून पाणीपट्टी वसुलीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, ८१ः१९ या सूत्रानुसार ८१ टक्के वीजबिल तर १९ टक्के वीजबिल हे शेतकऱ्यांकडून आकारले जाते. असे असले तरी, पाणीपट्टी वसुलीसाठी कारखाना, शेतकऱ्यांच्याकडे योजनेचे अधिकारी पाठपुरावा करत असल्याचे चित्र आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात टेंभू प्रकल्पाचे पाणीपट्टी वसुलीची उद्दिष्ट २८३ कोटी इतके होते. या वर्षात ४१२ कोटी इतकी पाणीपट्टी वसूल झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली होत असल्याने योजना सुरळीत सुरू आहे. यामुळे दुष्काळी भागाला वेळेत पाणी मिळत असल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.