26 january: अजूनही सव्वीस जानेवारीची ती सकाळ काळजात रूतून बसली आहे... 

पळत जाऊन आमदार किंवा साखर कारखान्याचे चेअरमन वगैरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरचे बक्षीस घेऊन पळत पुन्हा जाग्यावर येऊन बसायचो.
26 january
26 januaryAgrowon

- विकास गोडगे

सव्वीस जानेवारीच्या (26 January) सकाळी “विकास गोडगे$$$$” (vikas Godage) असं स्पीकरवरून नाव पुकारलं जायचं आणि समोरच्या रांगेत कवायत संपून वाटच बघत असलेला मी खाकी चड्डीला लागलेली फक्की आणि धूळ झटकत पळत स्टेजकडे सुटायचो.

पळत जाऊन आमदार किंवा साखर कारखान्याचे (Sugar Factory) चेअरमन वगैरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरचे बक्षीस घेऊन पळत पुन्हा जाग्यावर येऊन बसायचो.

ते प्रमाणपत्र घेऊन पळत ओळीत बसायला जाताना बाजूंला कामगारांमध्ये बसलेल्या किंवा उभारलेल्या वडलांची फुगलेली छाती आणि चेहऱ्यारील आनंद, तिकडे न बघता पण मला दिसायचा.

मग ते प्रमाणपत्र आणि पहिला क्रमांक असेल तर अकरा रुपयाचे पाकिट आणि दुसरा असेल तर सात रुपयाचे पाकिट घेऊन लेमन गोळ्या खात खात मी घरी यायचो. मित्राबरोबर येताना आपल्या हातात असलेल्या प्रमाणपत्राचा एक वेगळाच हुरूप चेहऱ्यावर असायचा.

26 january
Vikas Godage Mithun : मिथुनचे उपकार आहेत अनेक पिढ्यांवर...

“मोहनरावांचे चिरंजीव हुशार आहेत बुवा, एके दिवशी नाव काढणार” अशा सहकाऱ्यांच्या वैगेरे शुभेच्छां झेलत झेलत वडील घरी यायचे आणि म्हणायचे, “ते आकरा रुपये तुझेच, काय करायचे ते कर तू.” आणि मग ते त्यांच्या मित्रांना शिपशिप पाजून स्वतः पण शिपशिप घेऊन येत असत. म्हणजे थोडक्यात वडिलांच्या एकदम आनंदाचा दिवस असे २६ जानेवारी.

“ते आकरा रुपये तुझेच, तू काय करायचे ते कर” हे माझ्यासाठी सर्वात मोठे बक्षीस असायचे. मग मी ते अकरा रुपये आईकडे गहाण ठेवून तिच्याकडून एक एक रुपया घेत रहायचो.

ते अकरा रुपये बहुतेक कधीच संपत नसत. वर्षभर त्याचे हफ्ते चालू असत. अजूनही आई ते नाही संपल्यासारखीच वागते आणि गावाहून येताना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतच असते.

सातवीतून आठवीत गेलो आणि पहिला यायचा तो तिसरा नंबर आला. त्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद जरा कमी झाल्याचा भास झाला आणि छाती पण जरा कमीच फुगल्यासारखी वाटली.

पण त्यात काय विशेष नसते असे मागे-पुढे होत असते म्हणून वडील काही बोलले नाहीत. पुढच्या वर्षी म्हणजे नववीच्या वर्षातील बक्षीस समारंभाच्या वेळी पहिला नंबर झाला, दुसरा नंबर झाला आणि तिसरा नंबर झाला तरी माझे नाव पुकारलेच गेले नाही.

“कसं काय मोहनराव, इकासचा नंबर नाही आला यंदा”, असे म्हणून काही जणांनी त्यांना टोमणे पण मारले असावेत. त्यावेळी त्या कामगारांच्या गर्दीत वडिलांचा पडलेला चेहरा अजून आठवतो. तेव्हा त्या पडलेल्या चेहऱ्यामागील वेदना मला किती समजली होती माहित नाही पण ती खूप मोठी असावी.

त्या रात्री वडील आनंदात नाही तर टेन्शन मध्ये शिपशिप न घेता अगदी आख्खी बाटलीच घेऊन आल्यासारखे वाटले. सामान्य मुलाप्रमाणे वडील दारू पिलेत याचे मला वाईट वाटले असेलही बहुतेक. बाकी दुसऱ्या गोष्टीचे वाईट वाटण्याच्या पुढचा प्रवास माझा चालू झाला असावा.

असंच पुढे दहावी संपून मी तालुक्याच्या गावाला कॉलेजला वैगेरे प्रवेश घेतला. तालुक्याच्या गावाला गेल्यानंतर माझ्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळू लागला. त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गावाकडील मंडळीनी भरच घातली.

परिंदा, मिट्या, येटान ही मंडळी आडतीवरून पैसे उचलून ती थेट माझ्या रूमवर येत आणि मला पण जीवाची चैन करायला घेऊन जात. कधी कधी वर्गातून बोलावून घेऊन जात. बाकी दोस्तासमोर मला खूप कौतुक वाटे की माझे दोस्त भारी आहेत.

आपण हुशार आहोत परीक्षेच्या अगोदर अभ्यास करून मस्त मार्क मिळवू, या भ्रमात एक वर्ष गेले आणि आकरावीलाचा ड्रॉप घेण्याचा विक्रम अख्या बार्शी तालुक्यात माझ्या नावावर प्रस्थापित झाला असावा.

तरी सुद्धा पुढच्या वर्षी सुधारेन, या आशेने खर्च करून तसंच मला बार्शीला ठेवले गेले. पोराला बार्शीत चांगले खायला मिळत नसेल म्हणून आई वडिलांना चिकन/मटन वैगेरे घेऊन पाठवायची. एकदा असेच वडील जेवण घेऊन आले असता रूम मालकीण म्हणाली,” तुमच्या गावाकडची पोरं आली होती. त्यांच्या बरोबर विकास बाहेर गेलाय.” 

आम्ही दोघं-तिघं बसची किंवा गावाकडील कोणते तरी वाहन येईन म्हणून वाट बघत स्टॉपवर थांबलो होतो.

परिंदा मला म्हणाला, “डबल घे”. मी डबल घेऊन मळू लागलो तेवढ्यात वर्गातील एक पोरगी सनी झिपवरून हळूच पुढून चालली होती. मी लगेच डबल मळणारा हात मागे घेतला. ती हळूच पुढून निघून गेली. परिंदा म्हणाला,” इकास हात का म्हागं घेतला, काय घाबरतो का पोरीला?”

मी म्हणालो,” नाहीरे ती वर्गातली होती, सोनिया कोठारी.”

“आयला, आम्ही पाचवीतच शाळा मास्तरला शिव्या देऊन जी शाळेतून पळून गेलो ती पुना शाळेचं तोंड बघितलं न्हाय, आता त्याच मास्तरसंगं गावात दारू पेतो. न्हाय तर आम्हालाबी कॉलेजला जाऊन आसल्या पोरी बघायला भेटलं असत...”, परिंदा ते सोनाली नामक आकर्षण लांब जायीस्तोवर तिच्याकडे बघत बघत म्हणाला.

ती गाडीवर छान दिसत होती. तिच्या हवेत उडत असलेल्या बॉब कट केसांकडे आणि सनी झिपवर ग्रीप धरून बसलेल्या हौजिंगकडे बघत परिंदाची समाधीच लागायची बाकी होती.

मी पुन्हा डबल मळण्याच्या कामाला लागलो. तो कुणी ना कुणी यायचाच दिवस होता. घात वार असावा. विडा मळून आता सगळ्यांना वाटणार तोच समोरून वडील येताना दिसले. ते माझ्याकडेच बघत होते. मी हातातील तंबाखू खाली टाकून हात चोळल्यासारखे केले आणि अस्वस्थ पण तोंडावर माज आणून उभा राहिलो.

काय होतं ?
काय नाही असंच हात चोळत होतो.

वडील काही बोलले नाहीत. आम्ही दोघे शांततेत रूमवर आलो. रूमवर माझा पार्टनर येऊन पट्ट्यापट्ट्याच्या अंडरवेअरवर तोंडात तंबाखूचा विडा घालून बसलेला. हातात हैदोस होताच. आम्हाला बघताच पुस्तक कॉलेजच्या पुस्तकात ठेऊन बाहेर गेला आणि गुळणा करून आला. आता तो सभ्यतेचा आव आणून बसायला रिकामा झाला होता.

एकूण दोन-तीन वर्षात आमच्या तीर्थरूपांना आमच्या शिक्षणाच्या आयचा घो झालेला आहे ते समजले आणि त्यांनी कसल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवणे बंद केले. त्या तीन वर्षाच्या काळात आमच्या घरात भयानक असहिष्णुतेचे वातावरण होते.

दिवस गेले वर्ष सरली, पण त्या लहानपणी नंतर वडिलांच्या तोंडावर तो सव्वीस जानेवारीला मला बक्षीस मिळाल्यावर झालेला आनंद आणि फुगलेली छाती मला कधीच दिसली नाही. ही गोष्ट मला अगोदर कधी जाणवली की नाही माहित नाही पण आज थोडासा भूतकाळात फेरफटका मारताना प्रकर्षाने जाणवले. 

26 january
Vikas Godage Story : म्हातारीच्या जगण्याची गोष्ट

त्यानंतर मला बरीच पारितोषिके मिळाली. मी एमबीए होऊन करियरमध्ये मार्गी लागलो. कंपनीत चांगल्या कामासाठी पारितोषिके मिळाली/मिळतात. पण मी आता ते वडिलांना सांगायची तसदी घेत नाही. का घेत नाही माहित नाही.

गरज वाटत नसेल किंवा त्या काही असहिष्णुतेच्या दोन-तीन वर्षानंतर आमच्यातील संवाद कमीच झाला किंवा फक्त कामा पुरताच उरला असेल. किंवा जगरहाटी प्रमाणे एकदा आईवडील वृद्ध होऊन मुलांवर अवलंबून राहिले की तो आनंद ते दु:ख सगळे संपून चेहऱ्यावर राहतात ते उपकराचे भावच फक्त आता उरले असावेत. मुलाच्या आणि सुनेच्या उपकाराचे भाव. ह्या उपकराच्या भावाखाली सगळ्या भावना झाकाळून जात असाव्यात. 

हे थोर आहे. मुलगा जसा बापावर हक्कच आहे ह्या आविर्भावात वावरत असतो, तसे वृद्ध झाल्यावर बाप मुलावर आपला हक्कच आहे असे वागू शकत नाही. जगाची उत्पत्ती न्याय तत्त्वावर झालेली नाही, याचा हा पुरावा म्हणावा लागेल.

आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी झोपेतून उठल्या उठल्या बालपणात गेलो. आणि त्या बालपणीच्या सुगीच्या दिवसात एका मुलाच्या भावविश्वात फिरत असताना एका बापाला पण पुन्हा निरखून घेतले. काही वेळ शांत बसलो.

ज्या शाळेत शिकलो तिथं जाऊन यावे वाटले, जिथे कामगारांच्या गर्दीत बक्षिसे घेतली त्या कारखान्याच्या मैदानात जाऊन यावे वाटले. पण ते आता सगळं ओसाड झालंय. तिथल्या ओसाड, उजाड वातावरणात त्या आठवणी फक्त असतील. त्या फक्त मलाच दिसतील; पण अनुभवता मात्र येणार नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com