
Maharudra Manganale Story माझ्याकडं बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अहमदपूर शाखेचं डेबिट कार्ड आहे. पाच महिन्यांपूर्वीच त्याची मूदत संपलीय. ते बदलून घ्यावं म्हणून ॲक्टिव्हावर अहमदपूरला गेलो. रितसर अर्ज केला, फॉर्म भरून दिला. समोरून उत्तर आलं- डेबिट कार्डांची उपलब्धता नाही. जेव्हा येईल तेव्हा कळवू.
साधारण सव्वा महिन्यांपूर्वी मी हेच उत्तर ऐकलं होतं...हसून बाहेर आलो. दिनकर मद्देवार आणि विठ्ठल कामाळे या मित्रांसोबत गप्पा मारत बसलो. दुपार झाली होती. मीच जेवणाचा प्रस्ताव ठेवला. एका हॉटेलमध्ये गप्पा मारत जेवण केलं.
आभाळ भरलेलं होतं. ढगांचा गडगडाट चालू होता. नरेशला फोन करून विचारलं, ॲक्टिव्हावर निघू का? नरेश म्हणाला, दहा-पंधरा मिनीटात पाऊस येईल असं वाटतयं.. लगेच निघा...
अहमदपूर शहराबाहेर पडेपर्यंत बारीक थेंब सुरू होते. शिरूरच्या जवळ येईल तसा पावसाचा जोर वाढत गेला. गावात येईपर्यंत पाऊस जास्तच वाढला.
शेताच्या रस्त्याला लागल्यानंतर खरी कसोटी आहे. थोडासा चिखल झाला तरी ॲक्टिव्हा घसरते. सावधपणे रूद्रा हट या माझ्या शेतातल्या घराच्या कंपाऊंडमध्ये पोचलो, तेव्हा पाऊस वाढला होता.
तिथंच छत्री घेऊन उभ्या असलेल्या गबरूला एक फोटो काढायला लावला. नवेलीत येऊन कपडे बदलत होतो तोच पत्र्यावर छोटे दगड पडल्यासारखे आवाज येत होते. बघितलं तर छोट्या गारा पडत होत्या. मी गारांचा फोटो काढायचा प्रयत्न केला. पण फोटोत त्या आल्या नाहीत.
मी मनात म्हटलं, बरं झालं थोड्या का होईना गारा पडल्या...तेवढाच बर्फ पडल्याचा फील मिळतो.. शिवाय आपल्याकडं गारा पडल्या नाहीत याची रूखरूख नको...
काही वेळात पाऊस थांबला...आता चक्क ऊन पडलयं. निसर्गाचा हा खेळ मी एन्जॉय करतोय. शिरूर ते अहमदपूर अवघं ११ कि.मी.चं अंतर. खरं तर ९० टक्के हायवेचं काम झालंय.
तरीही दुचाकी चालवताना मनात भीती असतेच...कोण कोणाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आपल्या अंगावर येईल ते सांगता येत नाही...धूळ,गर्दी आणि चालकांची मनमानी...कोणाचं कोणावर नियंत्रण नाही...
सगळेच रस्त्याचे मालक! अशा वेळी नुकत्याच व्हिएतनाममध्ये एका मित्रासोबत केलेल्या बाईक सफारीची अपरिहार्यपणे आठवण येते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.