मला भावलेलं पुस्तक गार्डन ऑफ द प्रॉफेट

काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली...
Drawing
DrawingAgrowon

तुमचं गीत चिमुकलं असू द्या. कारण जे गीत ओठातून अस्फुट येतं अन् विराम पावतं तेच पुष्कळांच्या काळजात घर करून राहतं. सुंदर असेल ते सत्य मोजक्या शब्दांत सांगा. अमंगळ सत्य सांगण्यासाठी तोंडाची वाफ दवडू नका. सूर्यप्रकाशात चमचमणारा केशसंभार घेऊन चाललेल्या कुमारिकेला ‘तू उष:कन्या आहेस’ म्हणून गौरवा; पण एखादा आंधळा समोर आला तर त्याच्या नशिबी काळोखी रात्र आहे हे सांगू नका.

सुखाच्या गाद्या-गिरद्यांत आणि पैशाच्या छनछनाटात ऐशोआरामाची सुस्त धुंदीच जन्माला येऊ शकते. तिथं नवसर्जनाला थारा कसा मिळावा? आपल्या बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhary) म्हणतात, ‘अरे संसार संसार। जसा तवा चुल्ह्यावर। आधी हाताला चटके। तेव्हा मिळते भाकर!’ अर्थात, ही जगण्याची गोष्ट झाली. साहित्य अन् कलेचंही तेच. परिस्थितीचे फटके आणि चटके खाल्ल्याशिवाय अस्सल कलाकार घडतच नाही जणू! हा शाप म्हणायचा की वरदान? काहीही असलं तरी हातून नवसर्जन घडणार असेल तर कोणाही फाकड्याची पसंती दारिद्र्यालाच राहील. खलिल जिब्रानचं बालपण असंच गेलं. दारिद्र्याची (poverty) राख त्यानंही चिवडली, पण याच राखेतून पुढं त्यानं फिनिक्स भरारीही घेतली. शब्दांचा जादूगार म्हणून अवघ्या पृथ्वीतलावर त्याची कीर्ती पसरली. लेबाननमधील बशारी या निसर्गरम्य (Natural) नगरात त्याचा जन्म झाला. तिथल्या देवदारांच्या राया त्याच्या मनात कायम रुंजी घालत. त्याच्या इच्छेनुसार त्याचं पार्थिवही याच मायभूमीत दफन करण्यात आलं. त्याचं तिथलं स्मारक आज कवी, शायर, चित्रकार आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांची मक्का बनलं आहे.

Book Photo
Book PhotoAgrowon
Drawing
उन्हाळ कांदा साठवण करण्यावर शेतकऱ्यांचा भर

काही माणसं शब्दांच्याही पलीकडली असतात. अक्षरांच्या जाळ्यात ती अडकत नाहीत; किंबहुना शिताफीनं निसटतात. त्यांच्याविषयी कितीही सांगा काही तरी अव्यक्त उरतंच. खलिल जिब्रान अशांतलाच. आधीच्या लेखात त्याच्या ‘द प्रॉफेट’ (The Prophet’) या साहित्यकृतीचा परिचय आपण करून घेतला. हा झपाटून टाकणारा माणूस आहे. वाचन संपलं तरी तो मनातून हटत नाही. त्याची अवतरणं मनात रुंजी घालत राहतात. ‘द प्रॉफेट’वर लिहिल्यानंतर खूप काही सांगायचं राहिलंय, ही जाणीव तीव्र होत गेली. म्हणून पुन्हा हा लेखनप्रपंच. विशेषतः शब्दमर्यादेमुळं त्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, जडणघडणीबद्दल फारसं काही लिहिता आलं नव्हतं. लेखक कळल्याशिवाय त्याच्या साहित्यकृतीचा स्रोत शोधता येत नाही, तिचं नीटसं आकलन करून घेता येत नाही. ‘द प्रॉफेट’चा दुसरा भाग त्यानं ‘गार्डन ऑफ द प्रॉफेट’ (Garden of the Prophet) या नावानं लिहिला. तोही पहिल्या भागासारखाच समृद्ध आशयानं खचाखच भरलेला आणि भारलेला आहे. त्याची उकल मात्र सोपी नाही. हे साधं सोपं वाचन नाही. स्वतःला समजून घेण्याची इच्छा असलेल्यांनीच हे तत्त्वज्ञानाचं गारुड समजून घ्यावं. हा प्रवास आनंददायी आणि स्वतःला माणूस म्हणून समृद्ध करणारा आहे हे नक्की!

जिब्रानचे वडील सरकारी (Father Government Tax Officer) करसंकलक म्हणून काम करायचे. भ्रष्टाचारी आणि दारूडेही. एकदा प्यायल्यावर बायको, मुलांना मारहाण ठरलेली. या साऱ्याला कातावून जिब्रानच्या आईनं आपल्या कच्च्याबच्च्यांसह लेबानन सोडण्याचा निर्णय घेतला. जिब्रान, त्याचा भाऊ आणि दोन मुलींसह ती अमेरिकेतील बोस्टनमध्ये आयुष्य काढायला दाखल झाली. सुरुवातीला शिलाईचं काम पत्करलं. खाणाऱ्या पाच तोंडांचा त्यावर गुजारा होणं कठीणच. जवळच्याच एका शाळेत (School) जिब्रानला दाखल करण्यात आलं. त्याची चित्रकलेची आवड पाहून पुढं कला विद्यालयात त्याची रवानगी करण्यात आली. तिथं त्याच्यातील चित्रकार आकाराला आला. त्याचं इंग्रजीही उत्तम झालं. विल्यम ब्लेक, डब्ल्यू. बी. यीट्‍स, शेली यांच्या काव्याचा तो दिवाना बनला. त्याच्यातील तत्त्वज्ञ, कवीही इथंच जन्मला. अरबी शिकण्यासाठी पुन्हा लेबाननला परतण्याचा निर्णय जिब्राननं घेतला. तिथं त्याला आपलं पहिलं प्रेम भेटलं. हाला तिचं नाव. खानदानं आडवी आल्यामुळं ते फार पुढं सरकलं नाही. प्रेमभंगाचं दुःख घेऊन जिब्रान बोस्टनला परतला. सुरुवातीला तो चित्रकार म्हणूनच ख्यातनाम झाला. नंतर मात्र त्याला जगण्याचं ईप्सित सापडलं. ते होतं लिखाण. अमेरिकेच्या साहित्यिक वर्तुळात त्याची पुस्तकं चर्चिली जाऊ लागली. ‘द ब्रोकन विंग्ज’, ‘मॅडमॅन’ (‘The Broken Wings’, ‘Madman’.) ही पुस्तकं (Book) जोमानं खपू लागली. धर्ममार्तंडांनी काही पुस्तकांवर आक्षेप घेतल्यानं ती वादग्रस्तही ठरली. त्याच्या विरोधातील निषेधाचे सूर तीव्र बनले. पण तो हटला नाही. त्याच्या साहित्यावर ‘चार चांद’ लावले ते ‘द प्रॉफेट’ आणि त्यानंतर आलेल्या ‘गार्डन ऑफ द प्रॉफेट’ या पुढं जगविख्यात झालेल्या कृतींनी.विचार असू द्यात की पुस्तकं, ‘तोच तो’पणा आपल्याला हैराण करतो. अशा स्थितीत उत्तुंग नवविचारांच्या खजिन्याची पुरचुंडी आपल्यासमोर कोणी खोलली तर मग ते आनंदाचं निधानंच! जिब्रान वाचताना नेमकी हीच अनुभूती मिळते. जे काही खरं आहे ते जिब्रान सुलटं करून आपल्यापुढं उभं करतो. त्यामुळं आजवरच्या आपल्या धारणा, विचार तर उलटेच होते याचं रोकडं भान येतं. जिब्रानचं ‘गार्डन ऑफ द प्रॉफेट’ तत्त्वज्ञानाची पेरणी करणाऱ्या पद्यमय गद्य रचनांनी गाजलं. याआधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणं मधुश्री पब्लिकेशननं प्रकाशित केलेल्या ‘द प्रॉफेट’ या मराठी अनुवादित पुस्तकातच ‘गार्डन ऑफ द प्रॉफेट’ समाविष्ट आहे. त्यातील निवडक भाग इथं द्यावाचा लागेल. त्याशिवाय जिब्रानची आणि त्याच्या लिखाणाची महत्ता कळायची नाही देशाचे जबाबदार नागरिक (Civil) म्हणून आपली काही कर्तव्यं असतात, प्रत्यक्षात मात्र आपण फक्त हक्कांविषयी जागरूक असतो. असं नागरिकत्व देश उभारणीच्या काय कामाचं? अशा देशातील राजकीय व्यवस्थेचा बट्ट्याबोळ ठरलेला. त्यामुळं काय धोके उद्‍भवू शकतात हे आपण जागरूकपणानं तपासलं पाहिजे. याबाबत जिब्राननं केलेलं विश्‍लेषण डोळे उघडणारं ठरावं. ‘गार्डन ऑफ द प्रॉफेट’मध्येही खलिल जिब्रान अल् मुस्तफा या प्रेषिताच्या मुखातूनच बोलतो, आपलं तत्त्वज्ञान मांडतो. राष्ट्राविषयी अल् मुस्तफा म्हणतो

‘राष्ट्र’ (Nation)
जे राष्ट्र अनेक श्रद्धांनी गजबजलेलं आहे, पण धर्महीन आहे, त्याची अवस्था फार अनुकंपनीय असते. जे राष्ट्र आपण स्वतः विणलेली नाहीत अशी वस्त्रं पांघरतं, हंगामात उगवून आली नाहीत अशी धान्यं-फळं खातं, आपल्या मद्यालयात गाळलेलं नाही अशा मद्याचे घुटके घेतं, त्याची अवस्था खरोखर दयनीय असते. जे राष्ट्र पुंड-मवाल्यांना आपुलकीनं कवटाळतं, झगमगाटात मिरवणाऱ्या विजेत्याला संपन्न आणि समृद्ध समजतं, त्याची अवस्था अनुकंपनीय असते. जे राष्ट्र स्वप्नातल्या उत्कट कामनांचा तिरस्कार करतं आणि वास्तव जीवनात त्यांच्यापुढं शरणागती पत्करतं, त्याची अवस्था केविलवाणी होते. जे राष्ट्र अंत्ययात्रेच्या प्रसंगी तेवढं धाय मोकलून आक्रोश करतं, प्राचीन अवशेषांच्या परिसरात बढाईच्या गोष्टी बोलतं आणि कुणीतरी मानेवर तलवार धरावी तेव्हाच बंड करून उठतं त्या राष्ट्राची अवस्था अनुकंपनीय असते. ज्या राष्ट्राचा नेता कोणी मुत्सद्दी कोल्हा आहे; ज्याचा तत्त्ववेत्ता हातचलाख जादूगार आहे, की जो ठिगळं लावण्यात आणि नक्कलखोरीत माहीर आहे, त्या राष्ट्राची अवस्था फार दयनीय होते. जे राष्ट्र नव्यानं येणाऱ्या राज्यकर्त्याचं शंख तुताऱ्यांनी स्वागत करतं, त्यालाच पदभ्रष्ट करताना शिव्याशाप देतं, आणि नव्यानं गादीवर येणाऱ्याला पुन्हा तशीच शंख-तुताऱ्यांची सलामी देतं, त्या राष्ट्राची अवस्था केविलवाणी होते. मित्रांनो, ज्या राष्ट्रातील साधुसज्जन वयोमानानं बहिरेमुके झालेले आहेत आणि ज्याचं नेतृत्व अजून पाळण्यात अंगठा चोखत आहे, त्या राष्ट्राची अवस्था अनुकंपनीय होते.

‘असणं’
एकदा एका शिष्यानं (Discipleship) विचारलं, ‘गुरुदेव, ‘असणं’ म्हणजे काय? आम्ही आहोत याचा अर्थ तरी काय?’
अल् मुस्तफा म्हणतो, ‘‘तुमचं असणं म्हणजे शहाणं असणं... याचा अर्थ अडाणी-मूर्खापासून तुटून निघणं नव्हे. तुमचं असणं म्हणजे शक्तिमान असणं... म्हणजे आर्त-दुर्बळांचा नि:पात नव्हे. तुम्ही आहात याचा अर्थ, सौंदर्याच्या पावलांचा माग तुम्ही काढत आहात. तशानं तुम्ही कड्याच्या सुळक्यावर पोहोचलात तरी बेहत्तर! सौंदर्याला पंख आहेत, तुम्हाला नाहीत. सुळका ओलांडून ते झेप घेईल तरीही त्याचा पिच्छा सोडू नका. जिवलगांनो, जिथं सुंदरता नाही तिथं सगळं शून्य आहे. असणं म्हणजे लुटलं जाणं; असणं म्हणजे फसवलं जाणं. इतकंच नाही तर तुमचं असणं प्रतिक्षणाला चकव्यात वाट चुकतं, कोंडीत सापडतं... आणि वरती त्याला वेडावून दाखवलं जातं! इतकं झालं तरी तुम्ही असता. तुम्ही आहात याचा अर्थच मुळी तुमच्यातल्या उंच आणि उदार आत्मिक बळानं तुम्ही स्मित करीत आहात.’’

‘सुंदर सत्य’ (Wonder Truth)
ऋजुता कायमस्वरूपी वस्तीला असलेलं मानवी हृदय खरोखरीच महान असतं. निरोपाचं भाष्य करताना अल् मुस्तफा आपल्या शिष्यांना म्हणतो, ‘‘वेगळ्या वाटांनी जाण्यापूर्वी माझ्या अंत:करणातल्या काही गुजगोष्टी मी तुमच्याशी बोलाव्या म्हणतो. आपली आपली वाट धरलीत तरी गात राहा आणि रमवीत राहा. मात्र तुमचं गीत चिमुकलं असू द्या. कारण जे गीत ओठातून अस्फुट येतं अन् विराम पावतं तेच पुष्कळांच्या काळजात घर करून राहतं. सुंदर असेल ते सत्य मोजक्या शब्दांत सांगा. अमंगळ सत्य सांगण्यासाठी तोंडाची वाफ दवडू नका. सूर्यप्रकाशात (Sun light) चमचमणारा केशसंभार घेऊन चाललेल्या कुमारिकेला ‘तू उष:कन्या आहेस’ म्हणून गौरवा; पण एखादा आंधळा समोर आला तर त्याच्या नशिबी काळोखी रात्र आहे हे सांगू नका. तुमच्या यात्राकालात पसरट पंजांची माणसं सामोरी येतील, त्यांना पाकळ्यांची बोटं द्या. काटेरी जिभांची माणसं हटकतील, त्यांना मधासारखे शब्द द्या.’’

Drawing
गडचिरोलीः समृध्द जंगल, समाधानी माणसं

द्रष्टा आणि कोमल हृदयाचा महात्मा खरंच किती महान असतो याची प्रचिती येणारा अल् मुस्तफाचा संवाद, आवाहन केवळ वाचण्यासाठी नव्हे तर अंगी मुरवण्यासाठीही उपयुक्त ठरावे. वैश्‍विक शहाणपण काय असतं याची ही झलकच जणू!

प्रेम (Love)
अल् मुस्तफा म्हणतो, ‘‘धनिकांनो, तुमचा मध माझ्या जिभेला जहरासारखा झाला; आणि दरिद्री कंगालांनो, मी पालथ्या हाताचा भिकारडा, मला तुम्ही लाजवलंत, तरी मी तुमच्यावर प्रेमच केलं. मागून घेतलेली बासरी आणि स्वत:ची आंधळी बोटं यांच्या साह्यानं गीतं रचणाऱ्या कविमित्रा, तू आत्मलोलुप झालास तरी मी तुझ्यावर प्रेम (Love) केलं. हे विद्वान मित्रा, कुंभार जिथून माती घेतो त्या शेततळ्यांना खणून प्रेतावरची वस्त्रं तू गोळा केलीस तरी मी तुझ्यावर प्रेम केलं. देवांचे भक्त असणाऱ्या मित्रांनो, तुम्ही स्वतःच्या वासना-विकारांना पुजलेत, तरी मी तुम्हाला प्रेम दिले. जीवनाचा प्याला काठोकाठ भरलेला असूनही तहानेली असणाऱ्या प्रमदे, तुला उमजून मी तुझ्यावर प्रेम केलं आहे. रात्रीमागून रात्र (Night) तगमगत घालवणाऱ्या तनुजे, तुझ्यावर मी अनुकंपायुक्त प्रेम केलं. वाचाळांनो, मी तुमच्यावरही प्रेम केलं; मनात म्हटलं की, जीवनात बोलत राहावं असं पुष्कळच आहे. मौनी मित्रांनो, तुमच्यावर प्रेम केलं तेव्हा स्वतःशी कुजबुजलो : शब्दांनी सांगितलेलं मला आवडेल, ते तर त्यानं मुकेपणानं सांगितलं ना?’’

तर हा आहे खलिल जिब्रान आणि त्याचं कवतिक. जिब्रानच्या कोमल हृदयातून स्रवणाऱ्या साजिऱ्या काव्यानं ‘जगावं कसं, वागावं कसं’ (How to wake up, how to behave ') याचा मूलमंत्र मानवजातीला बहाल केला. जिब्रानच्या आयुष्यात पुढं वेगवेगळ्या टप्प्यावर तीन स्त्रिया आल्या. पण लग्नाचं काही जमलं नाही. अखेरीस हा सडाच कबरीत चिरविश्रांती घेता झाला. तरीही त्यानं अखंडपणे प्रेमाचं कवन गायलं. हृदयावरच्या (Hearth) ओरखड्यांना त्यानं कटुतेची फळं येऊ दिली नाहीत. हे त्याचं थोरपण. मोठी माणसं म्हणून तर मोठी असतात. डोळ्यांनी जे दिसतं, कानांनी जे ऐकू येतं त्याच्या पलिकडंही खूप काही असतं. तेच या दृष्याच्या, ध्वनिलहरींच्या मागचं वास्तव असतं. आपल्याकडं संत चोखोबांनी म्हणून ठेवलंय, ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा!’ जिब्रानचंही तेच सांगणं आहे. विवेकाचं मानसशास्त्र विकसित करणारे डॉ. अल्बर्ट एलिस ( Dr. Albert Ellis) यांनीही हेच सांगितलंय, ‘‘बाबांनो, जे दिसतं आहे त्याच्या पलीकडं पाहा. विचार करा. मगच व्यक्त व्हा! मानवी जिव्हा म्हणजे तळपती तलवार. तिला कायम रक्ताची आस लागलेली. तिला बळी पडू नका, हे साऱ्या संत-महात्म्यांचं सांगणं. पण ऐकतो कोण? समस्त मानवजातीविषयी कळवळा असेल, हृदयात करुणेचा विशाल सागर गंभीर गाज ऐकवत असेल तरच हे साधेल. अन्यथा, मौखिक हिंसाचार आणि समोरच्याचं खच्चीकरण, अवहेलना ठरलेली. आपण तरी प्रयत्नपूर्वक या गजबजाटापासून दूर राहूया. तीच सुंदर जगाच्या निर्मितीची सुरुवात असेल.

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com