Cultured Generation : संस्कारक्षम पिढ्यांतच देशाचे उज्ज्वल भविष्य

आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगात पैसा-अडका, प्रसिद्धी, यश, शिक्षण या सर्व बाबींना खूप महत्त्व आले आहे. मात्र या सर्व धावपळीत आपण संस्कारांकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहोत का, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा.
Children
ChildrenAgrowon

संस्कार हा खूप गहन आणि मोलाचा शब्द आहे. सर्वसामान्यपणे संस्कारावर बरीच चर्चा होते. मात्र संस्कारक्षम पिढी (Cultured Generation) घडवण्यासाठी विशेष काही होताना दिसत नाही. आपली पिढी संस्कारक्षम असली पाहिजे, ती घडवण्यासाठी अनेक गोष्टी करणे आवश्यक असताना त्या करण्यास आपण तयार होत नाही. संस्काराचा जप करून संस्कार होत नसतो हे ध्यानात घेतले पाहिजे. काळ खूप बदलला, काळाच्या ओघात सर्वच बाबी बदलल्या आहेत.

Children
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

पूर्वी लोकांकडे पैसा कमी असायचा अनंत अडचणी असायच्या पण संस्काराची श्रीमंती त्यांच्याकडे होती. एकत्र कुटुंब पद्धती आणि भावा-भावांमधला एक विचार वाखाणण्याजोगा होता. एकमेकांच्या उत्पन्नाचा विचार न करता परिवारासाठी एकत्रित काम करण्याची जिद्द त्या वेळेस पाहायला मिळत होती. त्यातूनच त्यांची प्रगतीदेखील होत होती. आज विभक्त कुटुंब पद्धती समाजात वाढीस लागली आहे. लहान मुलांना त्यांचे आई-वडील हाच त्यांचा परिवार आहे असा समज तयार झाला आहे. आजी-आजोबा, चुलते-चुलती यांचा परिवार वेगळा आहे अशी जाण आणि संस्कार त्यांच्या मनावर रुजले जात आहेत.

आपल्या आयुष्यातलं यश हे आपल्या संस्कारांवर मोजायचं की पैशावर मोजायचं, हे एकदा आपण ठरवलं पाहिजे. दारू, सिगारेट इत्यादी घातक नशा करणारी आजची तरुणाई, डान्सबार, पब, किटी पार्टीमध्ये धिंगाणा करणारी आजची पिढी, अशोभनीय कपडे घालून फिरणाऱ्या आणि नको त्या ठिकाणी नको ते अश्‍लील चाळे करणारे तरुण-तरुणी यांचे मोठ्या शहरातील लोंढे रोजच्या रोज तयार होत आहेत.

Children
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

फ्रीडमच्या नावाखाली किंवा स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार बोकाळल्यावर ‘लिव-इन-रिलेशनशिप’ सारखे प्रकार वाढीस लागले नाही तर नवलच! अल्पवयात वैधव्य प्राप्त झालेल्या काही स्त्रियांनी आपल्या मुलाबाळांना शिकून संपूर्ण आयुष्य त्यागामध्ये घालवले त्यांचा आदर्श कुठे आहे? आजच्या जगात कागदावरच्या मार्कांना आणि कागदी नोटांना इतके महत्त्व प्राप्त झाले, की ते मिळवणे हाच जीवनाचा उद्देश असल्याचा भ्रम त्यांच्यात निर्माण होत आहे, जो त्यांच्यासाठी आणि या देशासाठी देखील घातक आहे. आपले आजी-आजोबा, आई-वडील, नात्या-गोत्यांमध्ये न राहता लिव-इन-रिलेशनशिपमध्ये एखाद्या अनोळखी व्यक्ती बरोबर राहणे हे आजचे संस्कार आहेत का?

Children
Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांसारख्या अनेक महापुरुषांनी ठरवले असते, तर अफाट संपत्ती गोळा केली असती. मात्र त्यांनी निवडलेल्या मार्गामुळे ते अजरामर झाले. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती या जगात असणार आहे, याला यश आणि यालाच यशस्वी माणसं म्हणायची. आजच्या कुटुंबात मुलांना जे हवं नको ते सर्व मिळत आहे. किंबहुना, ज्याची गरज नाही ते देखील मिळत आहे. मात्र पिढ्यांन् पिढ्या चालत आलेल्या संस्काराचा प्रचंड अभाव जाणवत आहे. भारतासारख्या धार्मिक देशाला संस्काराची मोठी परंपरा आहे. विविध संप्रदायांच्या, धार्मिक मार्गांच्या आधारे पिढ्यान् पिढ्या संस्कार देण्याचे कारखाने सुरू आहेत. महाराष्ट्राला तर ‘संतांची भूमी’ असं म्हटलं जातं. इथं जन्म घेणे भाग्याचे आहे.

संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास, संत एकनाथ, चक्रधर स्वामी यासारख्या शेकडो संतांचे साहित्य म्हणजे संस्काराचा कधीही न आटणारा वाहता झराच आहे. अगदी अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, स्वामी विवेकानंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे संस्काराचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याकडे आहेत. बालपणात होणारे संस्कार हे संपूर्ण आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.

बालवयात होणारे संस्कार हे मुलं आपल्या सूचनेतून नव्हे तर आपल्या आचरणातून शिकत असतात. कारण मुले किंबहुना सर्वच मानवजात ही अनुकरणप्रिय असते. त्यातूनच संस्कार कोरले जातात. लहान मुलांना त्यांचं घर हे त्यांच्यासाठी संपूर्ण जग असते. पुढे शाळा कॉलेज त्यांच्यासाठी आदर्श असतात. मात्र आजकाल सर्वच शाळा या फक्त मुलांना शिक्षित करण्याचे कारखाने आहेत आणि कॉलेज हे पदवीधर बनवण्याचे! शाळा कॉलेजमध्ये वाढलेली गर्दी पाहता तिथे संस्कार होण्याची शक्यता अजिबातच नसते.

महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय गेल्या शेकडो वर्षांपासून संस्कार शिकवत आहे. अगदी अलीकडच्या काळात स्वाध्याय परिवार आणि इतर अनेक आध्यात्मिक संप्रदाय, पंथ ही परंपरा जोमाने चालवत आहेत. सर्वच धर्म आणि संप्रदाय हे संस्कार शिकवत असतात मात्र तरीही संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या दृष्टीने आपण आजही कमी पडत आहोत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. संस्कार ही काळाची गरज आहे. विज्ञानाने जग कितीही जवळ आले असले तरी आत्मीयता आणि प्रेम जिव्हाळा वाढवण्यात विज्ञान अपयशी ठरले आहे. समाजाचा आर्थिक-भौतिक स्तर सुधारला मात्र चंगळवाद, भोगवाद, आणि विलासी वृत्ती वाढत चालली आहेत.

पैसा कमावण्याचे मार्ग आणि पैसाप्रेम वाढले. मात्र, देशप्रेम वाढवण्यात आणि भ्रष्टाचार संपवण्यात आपण कमी पडलो आहोत. मानवी मेंदूचा उपयोग करून हजारो बाबी शोधल्या नवनवीन उपकरणे तयार केले. मात्र मानसिक स्थिती, मानसिक गोंधळ आणि मनोविकार आपण रोखू शकत नाही. समाजसेवा तर खूप दूर राहिली इथे आई-वडिलांना सांभाळायला देखील आजची पिढी तयार होत नाही हे इथलं वास्तव आहे.

टीव्ही सीरियल मधले रोजचे दिसणारे घरगुती ड्रामे आणि वाद, संसदेत चालणारा गदारोळ, समाजातील प्रतिष्ठित म्हणणाऱ्या नेत्यांकडून निघणारे अपशब्द, त्यांचे वागणे, पुढच्या पिढीवर काय संस्कार देत असेल याचा आपण कधी विचार केलाय का? माझ्या मुलांनी व्यसन करू नये, मुला-मुलींनी आई-वडिलांच्या मर्जीने विवाह करावा असं वाटत असेल, तर आई-वडिलांनी आपले आचरण अगोदर बदलण्याची गरज आहे. आपले कपडे, आपले बोलणे, वागणे, चालणे याचा एकदा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.

कडुनिंबाच्या झाडाला आंबे लागत नसतात, जे बीज पेरले तेच उगवते म्हणून आई-वडिलांनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. बालसंस्कार किंवा संस्कार केंद्रातील संस्कारापेक्षा आपल्या घरात होणाऱ्या संस्काराचा जास्त प्रभाव मुलांवर पडत असतो. राजमाता जिजाऊंचे संस्कार छत्रपतींवर झाले आणि आज करोडो लोकांचे राजे आदर्श आहेत. १८-१८ तास अभ्यास करून शिक्षण घेऊन, निर्व्यसनी राहून, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जगात प्रसिद्ध झाले. अशा थोर पुरुषांचे संस्कार नव्या पिढीत रुजणे गरजेचे आहे. येत्या काळात पुढच्या पिढीला कागदी शिक्षणासोबत संस्काराचे शिक्षण देऊन संस्कारक्षम पिढ्या घडवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा देश अधोगतीस जाण्यास वेळ लागणार नाही.

(लेखक शेती तसेच सामाजिक प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com