खरेदीदाराने अडत्यांचे कोट्यवधी थकवले

खामगाव बाजार समितीत पाळला बंद
Khamgaon APMC
Khamgaon APMCAgrowon

खामगाव, जि. बुलडाणा ः एका खरेदीदाराने अडत्यांचे कोट्यवधी रुपये थकविल्याने अडत व्‍यापाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (ता. २०) बाजार समिती बंद ठेवली. यामुळे हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे या बंदबाबत कुठलेही लेखी पत्र किंवा निवेदन नव्हते, असे स्पष्ट करीत बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे यांनी या वादावर तातडीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदीदार (Soybean) दुर्गाशक्‍ती फूड प्रायव्‍हेट लिमिटेडने ()DurgaShakti Food PVT Ltd.) अडत्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, सूर्यफूल व भुईमूग खरेदी केला आहे. या मालाचे २६ एप्रिलपासून सर्व अडत्‍यांना चुकारे मिळालेले नाहीत. यामुळे अडते अडचणीत आले आहेत. दुर्गाशक्‍ती प्रतिष्ठानकडे किमान १० ते १२ कोटी रुपये थकल्याची चर्चा आहे. ही रक्कम मिळावी यासाठी अडते संबंधितांकडे आग्रह धरून आहेत. त्यातून मार्ग न निघाल्याने शुक्रवारी (ता. २०) बंद पाळण्यात आला.

संबंधित प्रतिष्ठानकडून व्‍यवहाराबाबत अडत्यांना एसएमएस पाठवून एक महिन्‍याचा कालावधी मागण्यात आला होता. मात्र अडत्यांनी थकीत व्‍यवहाराबाबत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

सुरेका बंधूंनी या बाजार समितीमध्ये दुर्गाशक्‍ती फूड्स, सुरेश फूड्स व डीएफएलएसएफ ॲग्रोटेक या नावाने खरेदीदार म्हणून परवाना घेतला आहे. येथे झालेल्या व्‍यवहारांपोटी तीनही परवाने मिळून बाजार समितीचे एक कोटी तीन लाख रुपये सेस संबंधितांकडे थकलेला आहे. काही अटीशर्थी घालून त्यांना एप्रिलपासून पुढील खरेदीचा परवाना देण्यात आलेला आहे. थकलेल्या पैशांबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुकुटराव भिसे, सचिव कृउबास, खामगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com