कष्टमुक्त मानव ही संकल्पनाच निसर्गविरोधी

मानवनिर्मित यंत्रे, रोबोट व निसर्गनिर्मित मानव यातील मला समजलेला महत्वाचा फरक म्हणजे दोन्हींची झीज होते; पण निसर्गनिर्मित शरीरातील झीज ताबडतोब भरुन येते.
कष्टमुक्त मानव ही संकल्पनाच निसर्गविरोधी
Human Life Agrowon

अमिबाच्या निर्मितीपासून सजीवामधे प्रगती होत होत मानवाची निर्मिती झाली. त्याचा प्रत्येक अवयव आवश्यकतेनुसार प्रगत होत गेला. जो अवयव वापरला गेला नाही, तो हळूहळू नामशेष झाला. जो वापरात अधिक आला तो अधिक प्रगत, सक्षम झाला.

मानवनिर्मित यंत्रे, रोबोट व निसर्गनिर्मित मानव यातील मला समजलेला महत्वाचा फरक म्हणजे दोन्हींची झीज होते; पण निसर्गनिर्मित शरीरातील झीज ताबडतोब भरुन येते. निसर्गनिर्मित शरीरातील झीज नुसतीच भरुन येत नाही तर वापरलेला अवयव पुन्हा ते काम करण्यासाठी अधिक सक्षम बनवला जातो. तो अधिक काळ टिकतो. त्या अवयवाचा वापर कमी केला तर त्याची क्षमता कमी होते, त्याचा आकार कमी होतो.

या निसर्ग नियमानुसार आपण पाहतो की, नियमित काम करणारे अधिक वर्षं निरोगी जीवन जगतात. म्हातारा/ म्हातारी चे वय ९०- ९५ च्या पुढे होते, शेवटपर्यंत काम करत होती, कधी दवाखाना लागला नाही... ही वाक्यं मी तरी अनेक वेळा ऐकली आहेत. बदलत्या काळानुसार अनेक नवनवीन साधनांचा शोध लागला. त्यामुळे रोजच्या जगण्यातील अनेक शारीरिक हालचाली कमी झाल्या.

सकाळी अंघोळीसाठी पाणी काढणे, कपडे धुणे, वाळत घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे अशा सर्वसाधारण कामामध्ये शरीराचा वॉर्मअप होत असे. प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी चालत जावं लागे. प्रातर्विधीसाठी मॉर्निंग वॉकला पर्याय नव्हता. अर्थात आता शौचालयाच्या सुविधा वाढल्या, ही चांगलीच गोष्ट झाली. त्यामुळे संसर्गजन्य आजार कमी करण्यात मदत झाली. काळानुरूप झालेले अनेक बदल हे मानवाला काही विधायक काम करण्यासाठी अधिक वेळ देणारे आहेत.

भारतात प्रत्येक बाबीची उपलब्धता वाढली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीवेळी असलेला टंचाईचा काळ संपला आहे. अधिक सकस अन्न उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. नवजात बालकांच्या वजनात वाढ झाल्याचे दिसते. तरुणांच्या उंचीत वाढ झाली आहे. अन्नासाठी होणारे शोषण बऱ्याच अंशी संपले आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

प्रत्येक बाबीला दोन बाजू असतात. गावत ५० वर्षापूर्वी एखादा माणूस जाड असायचा. ढोल्या म्हणलं की एखादीच व्यक्ती डोळ्यासमोर यायची. आज ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोक स्थूल आहेत. तरूण वयात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी रोजच्या कामातून होणारा व्यायाम थांबला. बदलत्या जीवनशैलीत आता मुद्दामहून ठरवून वॉर्मअप, मॉर्निंग वॉक, इतर व्यायाम करणारे लोक मोजकेच आहेत. त्यामुळे आपल्या देशात रक्तदाब, मधुमेह, स्थूलता यासारखे जीवनशैलीचे आजार आणि त्यामुळे अचानक ओढवणाऱ्या मृत्यूचे प्रमाण गेल्या ५० वर्षांत प्रचंड वाढल्याचे दिसून येते.

मी एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे. १९७९-८० साली पदव्युत्तर शिक्षण घेताना खांदा आखडल्याचा रुग्ण कधीतरी पाहायला मिळायचा. आज कोणत्याही ऑर्थो डॉक्टरांच्या बाह्यरुग्णांत त्याचे प्रमाण ५ ते १० टक्के एवढे आहे. बदलत्या जीवनशैलीत महिनोनमहिने खांद्यातून हात वर उचलला जात नाही. त्याची काही कारणे पुढील प्रमाणे आहेत. स्वयंपाकघरातील फळी, शिंकाळे, न्हाणीघरातील वळण, विजेची बटणं खाली आली. जमीन, भिंती सारवणे इ. कामं बंद झाली. उभे राहून, दांडीला धरून बस प्रवास बंद झाला.

नवीन झालेले बदल वाईट नाहीत, त्यामुळे झालेल्या सोयी उपयुक्त आणि कष्ट कमी करणाऱ्या आहेत. परंतु ज्याप्रमाणे जंतूसंसर्ग झाल्यास अँटिबायोटिक उपयुक्त आहे, पण त्याचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी त्यासोबत दिले जाणारे उपयुक्त बॅक्टेरिया (lactobacillus) व ते निर्माण करीत असलेले अत्यावशक जीवनसत्वे घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक सोयीसोबत कमी होत चाललेली शारीरिक हालचाल जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे.

शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी ते आवश्यक आहे. नियमित, रोज, जन्मभर ठराविक व्यायाम म्हणजे शारीरिक कष्ट करण्यास पर्याय नाही. परंतु अशा प्रकारे नियमित व्यायाम करणारे लोक समाजात एक टक्कादेखील नसतील.

वरील बाबींचा विचार करता कष्टमुक्त मानव ही संकल्पनाच कशी निसर्गविरोधी आहे, शारीरिक आरोग्यास घातक, आजारांना निमंत्रण देणारी आहे, क्षणिक आनंदासाठी जन्मभर क्लेश देणारी आहे, हे दिसून येते. शारीरिक स्वास्थ्य नसेल तर जीवनातील कोणतंही सुख घेता येत नाही, हेच सत्य आहे.

माझे मित्र महारुद्र मंगनाळे यांचा दैनिक ॲग्रोवन मधील लेख वाचून हे चिंतन सुचले. जीवनात कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी सर्व जीवनावश्यक कामं स्वतः करून अनुभव घेणं गरजेचं आहे. मला हॉस्पिटल चालवायचे असेल तर बाथरूम ब्लॉक काढणे, फ्युज बदलणे, मी वापरात असलेल्या यंत्राची किरकोळ दुरुस्ती मला यावीच लागते; अन्यथा ऐनवेळी रुग्णाच्या जीवितास धोका संभवतो. येथे माझ्या प्रतिष्ठेपेक्षा त्या कामाची प्रतिष्ठा कशी महत्वाची आहे, हे लक्षात घेऊन ते काम करणाऱ्याला प्रतिष्ठा देण्याचं बंधन मी पाळत आलो आहे. समाजाने मात्र त्या कामगारांना प्रतिष्ठा दिली नाही, हे कटू सत्य आहे.

शेतमजुरांना समाज प्रतिष्ठा देत नाही, असे महारुद्र मंगनाळे यांचे म्हणणे आहे. शेतकरी त्यांना प्रतिष्ठा देत नाहीत, असे नाही. ती त्यांना द्यावीच लागते. शेतीची इतर क्षेत्रांशी तुलना करून बघा. कोणताही कारखानदार, व्यापारी, व्यावसायिक व्याजाशिवाय उचल देत नाही, कामगारांसोबत जेवत नाही, त्यांच्या घरी जात नाही. परंतु शेतकरी-शेतमुजर मात्र आपापसात आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करतात. अशी देवाणघेवाण फक्त समान सामाजिक, आर्थिक परिस्थितीतील लोकच करू शकतात. भारतातील ९०-९५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या अडचणी महारुद्र यांनी मांडल्या आहेत. या लेखातील विचारांना शेतकरी व शेतमजूर यातील संघर्षाचे स्वरूप दिले जात आहे, ते हास्यास्पद आहे.

महिन्यातून २० दिवसांपेक्षा अधिक दिवस कामावर येणारा, दारू न पिता कामावर येणारा कामगार दुर्मिळ झाला आहे. ही खेड्यातील वस्तुस्थिती त्यांना मोबदला कमी मिळतो, त्यांची पिळवणूक केली जाते या आरोपांना उत्तर देण्यासाठी पुरेशी आहे. दारू पिऊन कामावर येणारा कामगार नको असं म्हटलं तर दुसरा मिळत नाही. काम करू दिले तर सुटी होईपर्यंत तो काय करतो याचे टेन्शन. नुकसान भरून काढता येईल; पण अपघात झाला तर, गाजावाजा होतो मालकाच्या निष्काळजीपणाचा.

शेतमजुरांना मिळणारा कामाचा मोबदला इतरांपेक्षा कमी असतो; त्यास शेतकरी जबाबदार हा विचार चुकीचा आहे. शेतमाल निर्मितीसाठी लागणारे कष्ट व अस्मानी, सुलतानी संकटांचा विचार करता शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, हे सत्य आहे. मागणीप्रमाणे पुरवठा हे सूत्र शेतकरी लागू करू शकत नाही. मागणीप्रमाणे पीक त्याच्या शेतात पिकत नाही.

कोणत्याही शेतात कोणतेही पीक येत नसते. काही ठराविक पीकच घ्यावे लागतात. जमिनीची प्रत, तेथील हवामान, पाऊस अशा अनेक बाबींचा विचार करून पिकाची निवड करावी लागते. याच कारणासाठी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी खरिपात फक्त सोयाबीन घेतात. मूग, उडीद, भुईमूग, पिवळी, संकरित ज्वारी, सूर्यफुल, करडई ही पिके जणू इतिहासजमा झाली.

सध्या फायद्यात आहे ते पीक वर्षानुवर्षे घेत गेलो तर जमिनीची प्रत रसातळाला जाईल, ती नापीक होईल याचाही विचार करावा लागतो. भाव टिकवण्यासाठी मालाची टंचाई व्यावसायिकांकडून केली जाते. तेच तंत्र शेतकऱ्यांना अवलंबावे लागेल. अर्धी शेती वर्षाआड करून मातीची प्रत व भाव दोन्ही टिकतील. परंतु सर्व शेतकऱ्यांना हे अशक्य आहे, हेही तेवढंच खरं.

कोणीतरी अमेरिकेशी तुलना करतो. तेथील जमीन, वातावरण, पाऊस, लोकसंख्या, नैसर्गिक संपत्ती या बाबी पूर्णपणे भिन्न असताना ही तुलना करणे म्हणजे मुद्द्याला बगल देणे आहे. अमेरिकी नागरिक कष्टमुक्त आहेत ही माहिती कपोकल्पित आहे. रोजच्या जगण्यासाठी त्याला स्वतः स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी साफ करणे, फरशी पुसणे, कार साफ करने, बंगला असेल तर गवत कापणे इ. अनेक कामे करावी लागतात. त्यासाठी यंत्रे आहेत. ती चालवायला हातच लागतात. आपल्यासारख्या गरीब मध्यमवर्गीय समजल्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये मोलकरीण असते, तसं तिथं कुठंच दिसत नाही. कारसाठी ड्रायव्हर अभावानेच आढळतो. अमेरिकेत कष्टमुक्ती आहे, हा शोध कोणी लावला ते कळत नाही.

शेतीत मजुरांच्या टंचाईला अजून एक पर्याय सुचवला गेला आहे- यांत्रिकीकरण. हा सल्ला भाकरी मिळत नाही तर बिस्कीट, केक खा अशा धाटणीचा आहे. यंत्र खरेदीसाठी भांडवल, त्याचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती, देखभालीसाठी आवश्यक यंत्रणा, त्याच्या पुरेपूर वापरासाठी आवश्यक जमीन हे किती जणांकडे उपलब्ध आहे? शहराजवळ राहणाऱ्या पैसे पाळून असणाऱ्या मोजक्या लोकांना हे शक्य आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com