
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी फेरविचारासाठी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे, तर नव्या अध्यक्ष निवडीसाठी नेमलेल्या समितीची बैठक ५ किंवा ६ मे ला होणार असल्याने याबाबत दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राजीनाम्याचा निर्णय घोषित केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच घोषणाबाजी करत होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
लोकशाही पद्धतीवर श्रद्धा असलेले शरद पवार अचानक राजीनामा देतात हे न पटणारे आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, असे जनमत आहे. त्यामुळे त्यांनी तो मानावा, अशी आग्रही भूमिका आव्हाड यांनी मांडली.
राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी (ता.३) सकाळी दहा वाजता शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दाखल झाले. दुपारी एकपर्यंत ते तेथे होते. या वेळी त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. देशभरातून राष्ट्रवादीचे नेते त्यांना भेटून राजीनामा मागे घेण्याची विनंती करत होते.
केरळचे राष्ट्रवादीचे नेते पीसी चाको, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, रोहित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांनी पवार यांची भेट घेतली. पवार यांनी नवीन अध्यक्ष निवडीसाठी नेमलेल्या समितीची बुधवारीच बैठक होणार असल्याची अफवा पसरली होती.
यावर प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी अशी कुठलीही बैठक बोलविली नसल्याचे सांगितले. पटेल म्हणाले, ‘‘अशी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. अध्यक्षपदाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. तसेच पवार यांनी मंगळवारी (ता. २) घेतलेल्या निर्णयाचा फेरविचारही केलेला नाही.
आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी दोन-तीन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. त्यामुळे पवार यांना शांतपणे विचार करू द्या. आम्ही त्यांना पुन्हा भेटू. त्यानंतर अधिकृतपणे पक्षाची भूमिका सांगू.’’
‘जयंत पाटील नाराज नाहीत’
‘‘बुधवारी (ता.३) बोलवलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निमंत्रण नाही, तसेच त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या अफवा उठल्या होत्या. जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर नाही. मंगळवारी ते किती भावनिक झाले होते, हे सर्वांनी पाहिले आहे.
बुधवारी त्यांच्या कारखान्याची बैठक पुण्यात होती. पक्षाची बैठकच नसल्याने त्यांना निमंत्रण देण्याचा प्रश्न नव्हता,’ असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आव्हाड यांचीही राजीनाम्याची घोषणा
पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. मात्र कुठल्याही पदाधिकाऱ्याने राजीनामा देऊ नये, असे आवाहन पटेल यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.