
Solapur News : शेतीक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून, शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा आणि पीकपद्धतीचा वापर करून प्रगती करावी. देशात शेतकऱ्याच्या कष्टानेच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Minister Radhakrishna Vikhe Patil) पाटील यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी (ता.५) पालकमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी पालकमंत्री विखे-पाटील बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले, वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, विभागीय कृषी संचालक रफिक नाईकवाडी, बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘कोरोना काळात सर्व उद्योगधंदे बंद होते. अशा काळात एकच रोजगार सुरू होता तो म्हणजे शेती. शेती क्षेत्रामध्ये २४ तास शेतकरी कार्यरत होते. त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
जवळपास २० लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. देशामध्ये जेवढे काही स्टार्टअप सुरू आहेत. त्यामध्ये सर्वाधिक स्टार्टअप हे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून शेती क्षेत्रामध्ये आणखी बदल करावेत.
तसेच कृषिपूरक व्यवसाय असलेल्या बचत गटांसाठी सात कोटी रुपयांची तरतूद आपण केली आहे. त्याचेही ब्रँडिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादने विक्री करण्यास मदत होणार आहे,’’ असेही ते म्हणाले.
आमदार देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले तर शेतकऱ्याचे उत्पन्न नक्की वाढेल. चमत्कार केल्याशिवाय नमस्कार कोणी करणार नाही.
त्यासाठी जिल्ह्यांतर्गत कृषी महोत्सव भरविण्याबरोबर अन्य जिल्ह्यामध्ये देखील असा महोत्सव भरविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सोलापूर या दुष्काळी जिल्ह्याची ओळख आता हळूहळू पुसून द्राक्ष, डाळिंब, केळी यामध्ये आघाडीवरचा जिल्हा अशी होत आहे, असे सांगितले. आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी आभार मानले.
नऊ मार्चपर्यंत चालणार कृषी महोत्सव
कृषी विभागाचा हा महोत्सव येत्या नऊ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. शेतीविषयक विविध ज्ञान, तंत्रज्ञान, निविष्ठा, बी-बियाणे, शेतीविषयक अवजारे आदी साहित्यांचा यात समावेश आहे.
पण विविध पिकांवर तज्ज्ञांची व्याख्याने, शेतकरी ते थेट ग्राहक विक्री आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याची माहिती आणि प्रत्यक्ष धान्याचे स्टॅाल्स हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.