Exportable Pomegranate : तडवळे झाले निर्यातक्षम डाळिंबाचे गाव

तडवळे (जि. सांगली) या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांनी हताश न होता जिद्दीने माळरानावर निर्यातक्षम डाळिंब पिकविण्याची किमया घडविली आहे.
Exportable Pomegranate
Exportable PomegranateAgrowon

अभिजित डाके

तडवळे (जि. सांगली) या दुष्काळी गावातील (Drought village) शेतकऱ्यांनी हताश न होता जिद्दीने माळरानावर निर्यातक्षम डाळिंब (Exportable Pomegranate) पिकविण्याची किमया घडविली आहे.

जिद्द, सचोटी, परिश्रम, संघटित वृत्ती व बदल घडवण्याची मानसिकता यातून त्यांनी पिकात स्वतःला झोकून दिले.

आज निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचं गाव म्हणून या गावानं आपली नवी ओळख बनविली आहे. काही कोटी रुपयांचे अर्थकारण (Economy) या पिकाने गावात घडवलं आहे.

दुष्काळासारख्या प्रतिकूल समस्येवर मात करून दर्जेदार शेतीमाल पिकवण्याची जिद्द शेतकऱ्यांत असते.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे पाहिल्यानंतर त्याचे प्रत्यंतर येते. रणरणत्या उन्हात, फोंड्या माळरानावर लालचुटूक डाळिंब पिकवण्याची किमया येथील शेतकऱ्यांनी घडविली. याच पिकातून शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे येऊ लागले. हळूहळू तालुक्यात बागेचे क्षेत्र वाढले. आज दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा तालुका अशी आटपाडीची ओळख निर्माण झाली आहे.

दुष्काळाशी सामना करणारे गाव

तालुक्यातील तडवळे हे भीषण दुष्काळाशी सामना करणारे गाव. इथली कुटुंबांची संख्या ४०० पर्यंत असून, लोकसंख्या १८११ आहे. गावातील शेती म्हणजे माळरान आणि सर्वत्र दिसणारी चिलारांची झाडं. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना रोजगाराशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शेतीतून मिळणाऱ्या पैशातून रोजीरोटी कशीबशी चालायची.

घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी प्रत्येक कुटुंबातील तरुण परराज्यांत गलाईचे काम करण्यासाठी स्थलांतरित झाला. तिथं मिळालेल्या कमाईतून गावाकडील घर, प्रपंचाला हातभार लागला. असं असलं तरी शेतीशिवाय कुटुंब सुखी होत नाही या गोष्टीवर गावकऱ्यांची पुरेपूर श्रद्धा होती. मग प्रतिकूलतेतही शेती यशस्वी करण्यासाठी ते पुढे आले. लढण्याची जिद्द त्यांच्यात अफाट होती.

डाळिंब शेतीचा विकास

सन १९९० च्या दरम्यान गावात डाळिंब पीक आले. त्या वेळी गणेश वाण घेतले जायचे. त्यातून दोन पैसे अधिक मिळू लागले. हळूहळू गावातील शेतकऱ्यांना त्याचं अर्थकारण पटू लागलं. ते या पिकाकडे वळू लागले. शेतातील चिलारच्या झाडांची जागा आता डाळिंबाच्या झाडांनी घेतली. आजमितीस गावात ४७५ एकर क्षेत्र या पिकाने व्यापले आहे.

मुळात डाळिंबाला पाण्याची आवश्यकता तुलनेने कमी असते. परंतु तेवढेदेखील पाणी गावात उपलब्ध नव्हते.पण इच्छा तेथे मार्ग या उक्तीने गावकऱ्यांनी आटपाडी, कचरेवस्ती तलावातून पाइपलाइन केल्या. तरीही पाणी पुरेसे नव्हते. मग टॅंकर मागवून बागा जगविल्या.

सन २००३, २००८, आणि २०१३ चा दुष्काळ भयानक राहिला. अशा परिस्थितीत बागा काढण्याचा विचार शेतकऱ्यांच्या मनात आला. पण यापूर्वी मिळालेल्या समाधानकारक उत्पन्नाने आशा जिवंत होत्या. बागा काढण्यापेक्षा त्या जोपासूया. भले एक रुपया कमी येईल असा विचार शेतकऱ्यांनी केला. जिद्दीला साथ मिळाली ती टेंभू योजनेच्या पाणी योजनेची. आता शेताच्या बांधापर्यंत पाणी खेळणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली. आज बांधावर बंदिस्त पाइपलाइनचे आउटलेट्‌स दिसून येतात.

शेतकरी झाले संघटित

तडवळेतील शेतकरी सांगतात, की १९९० च्या दरम्यान गावात डाळिंब शेतीचे ‘कल्चर’ सुरू झाले. दिल्ली मार्केटला ते गावातील संघामार्फत पाठवावे लागत असे. आधी मिरज रेल्वे स्टेशन आणि तेथून ते रेल्वेने रवाना होई. दोन, तीन फार फार तर पाच पेटी माल पाठवणे शक्य होई. त्या वेळी प्रति किलो ९ ते १० रुपये दर मिळायचा. काही वेळेस पाठवण्याचा खर्च खिशातून जायचा.

सन २०१५-१६ च्या दरम्यान गावातील विजय मरगळे आणि जितेंद्र गिड्डे यांनी युरोपात डाळिंब निर्यात करण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. अन्य शेतकऱ्यांनाही सोबत घेण्याचे ठरविले. केवळ स्थानिक बाजारपेठेतून अर्थकारण सशक्त होणारे नव्हते हे त्यांनी ओळखले. विजय यांनी कृषी पदवीचा अभ्यास पूर्ण केला. निर्यातक्षम उत्पादनासाठी जमिनीचा पोत, वातावरण, हवामान, खते, वाण, अर्थकारण असा सांगोपांग अभ्यास केला. एकमेकां देऊ साथ या उक्तीने आजमितीला गावातील सुमारे १०० हून अधिक शेतकऱ्यांचे युरोप किंवा अन्य देशांना निर्यात करण्यामध्ये योगदान राहिले आहे.

बदल स्वीकारले, परिणाम दिसले

निर्यातक्षम दर्जा मिळवायचा तर पारंपारिक पद्धतीचे व्यवस्थापन बदलणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी ओळखले. त्यादृष्टीने सेंद्रिय, रासायनिक, जैविक असे एकात्मिक पध्दतीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन होऊ लागले. विरळणी, बहर व्यवस्थापन होऊ लागले. वयानुसार प्रत्येक झाडाला किती फळे ठेवायची ते निश्‍चित होऊ लागले. फळे डागविरहित असावीत, सनबर्निंग होऊ नये म्हणून पेपरच्या साह्याने आच्छादित होऊ लागले. यातून फळाचा आकार, वजन, चकाकीपणा वाढला.

दरम्यान, आज गावातील शेतकरी एकरी ८ ते १० टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत. किलोला १०० च्या पुढे व १२५ ते १७५ रुपये दर घेण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे. एकूण उत्पादनातील मोठा हिस्सा निर्यात होतो. गावात काही कोटींची वार्षिक उलाढाल होण्यास हे पीक कारणीभूत ठरले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

डाळिंबाने घडवली प्रगती (इन्फो १)

गावातील प्रातिनिधिक उदाहरण सांगायचं, तर अंकुश गावडे सांगतात, की माझी शेती म्हणजे १० एकर माळरान होतं. हाताला काम नसल्याने डाळिंब बागेत छाटणीला जायचो. सुरुवातीला १२५ रुपये दिवसांची हजेरी मिळायची. यातून डाळिंब पिकाची आवड निर्माण झाली. शेतातील चिलाराची सारी झाडं काढून स्वतःची डाळिंब बाग विकसित करण्यास सुरुवात केली. मजुरी अजून सोडली नव्हती. हळूहळू हाती पैसा आला. डाळिंबाचे क्षेत्र वाढवले. आजमितीस दोन हजार डाळिंबाची झाडे आहेत. त्या जोरावर घर बांधले, गाडी घेतली. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत आज बदल झाला आहे.

तडवळे गावातील आदर्श सुविधा (इन्फो २)

१) गावातील प्रत्येक वाड्यावस्त्यांवरील दळणवळणासाठी पक्का रस्ता.

२) प्रत्येक घराला स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्वच्छ पाणी व्यवस्था

३) ग्रामपंचायत, तलाठी, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या नव्या सुंदर इमारती.

४) गावांतर्गत सिमेंटचे रस्ते.

५) ‘डिजिटल’ अंगणवाड्या

६) प्राथमिक शाळेची ‘मॉडेल स्कूल’साठी निवड

७) गावातील वाद गावातच मिटविले जातात.

देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंब विक्री शक्य होती. पण युरोपला निर्यात करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचं संघटन करून जागृती करावी लागली. मोफत मार्गदर्श नासोबत निर्यात धोरणांची अंमलबजावणी सुरू केली. परिणाम म्हणून चार- पाच वर्षांपासून परदेशात डाळिंब निर्यात करण्यात आम्हाला यश आले आहे.
डाळिंबावर सातत्याने बदलत्या वातावरणाचा परिणाम होतो. त्यामुळे व्यवस्थापनात त्या दृष्टीने बदल केले. मी २०१६ पासून युरोपला डाळिंब निर्यात करू लागलो आहे. ‘ए ग्रेड’साठी कमाल २०० रुपये प्रति किलोपर्यंत दर मी घेतला आहे.
जितेंद्र गिड्डे - फोटो नं. - ९९७५२२५४३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com