
अमेरिकेतील बटाट्याचा परिचय युरोपला १५६०-७० च्या सुमारास झाला. त्यावेळी बटाटा हे पशुखाद्य समजलं जात असे. अनेक युरोपिय देशात बटाटे खाण्यावर बंदीच होती.
युद्धकैद्यांना बटाटे खाऊ घातले जायचे. बटाटा हे फळ नाही तर जमिनीखाली वाढणारं खोड आहे, हे अनेक वर्षं युरोपला ठाऊकच नव्हतं.
बटाटे कच्चे खायचे नसतात तर उकडून, सोलून खायचे असतात हे समजण्यासाठीही युरोपियनांना काही वर्षं लागली.
दुष्काळात गरिबांनी कोणतं अन्न वा अन्नपदार्थ खावेत या विषयावर फ्रान्समधील बेझाँसा विद्यापीठाने एक स्पर्धा आयोजित केली.
या स्पर्धेत पार्मेतिए या अभ्यासकाने भाग घेतला. तो काही काळ युद्धकैदी होता. त्या काळात त्याने बटाटा खाल्ला होता. त्याने केलेल्या बटाट्याच्या पदार्थांना या स्पर्धेत बक्षिस मिळालं.
हा काळ फ्रान्समधील क्रांतीपूर्व काळ होता. जमीनदार वा सरंजामदार आपल्या मस्तीत होते, शेतकरी अशिक्षित आणि अडाणी होते, बहुसंख्य जनता उपासमारीशी झगडत आहे याची राज्यकर्त्यांना फिकीर नव्हती, असं व्होल्तेअरने नमूद केलंय.
या काळात पार्मेतिएने बटाट्याच्या प्रसाराला वाहून घेतलं होतं. कारण गरिबांना उपासमारीपासून वाचवायचं असेल तर बटाटा हाच सर्वोत्तम पर्याय आहे, अशी त्याची खात्री होती.
अनेक विचारवंतांनाही पार्मेतिएच्या मांडणीबद्दल आस्था वाटू लागली. जनतेवर धर्माचा, धर्मसंस्थेचा म्हणजे अर्थातच चर्चचा पगडा असल्याने धर्मगुरुंनीच बटाट्याचा प्रसार करावा अशी सूचना या विचारमंथनातून पुढे आली.
बटाटे विषारी असतात, ते प्राण्यांचं खाद्य आहे अशी समजूत जनमानसात भिनली होती. त्यामुळे बटाट्याचा प्रचार करणाऱ्या धर्मगुरुंवर अनेकदा दगडफेक होत असे.
पण धर्मगुरु स्वतःच बटाट्याचं सूप पितात, हे कळल्यावर लोकांचा विरोध मावळला. पुढे सोळाव्या लुईने त्याच्या बटाट्याच्या शेताचं रक्षण करण्यासाठी सैनिकच नेमले.
त्यामुळे लोकांमध्ये या पिकाबद्दलची उत्सुकता वाढली. दर रविवारी राजाच्या शेतावर केवळ बटाट्याची रोपं बघण्यासाठी अलोट गर्दी व्हायची.
त्यानंतर प्रत्यक्ष काढणीच्या वेळी राजाने सैनिकांची संख्या कमी केली. राखणीला असलेल्यांना ताकीद देण्यात आली की चोरांना पकडाल तर याद राखा.
राजा बटाट्याच्या चोरीलाच उत्तेजन देत होता. लोकांनीही मनसोक्त बटाटे चोरले आणि खायला सुरुवात केली. बटाट्याचं मार्केटिंग करण्यात राजाने अशा प्रकारे पुढाकार घेतला.
१७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. पॅरिस कम्यूनने सत्ता काबीज केली. बटाटा खाल्लाच पाहीजे अशी सक्ती नव्या सरकारने केली. अशा प्रकारे बटाटा युरोपियनांच्या आहारात आला.
इंग्लडात बटाटे खाणं हे गरीबीचं लक्षण मानलं जात असे. बटाटा हे गुरांचं अन्न आहे, आयर्लंड, स्कॉटलंड इथले लोक बटाटे खातात आपण नाही, असं कुजकट बोलून ब्रिटीश लोक आयरिश, स्कॉटीश लोकांचा पाणउतारा करत असत.
आयर्लंडमध्ये तर दुष्काळात बटाटा हाच आधार होता. एका वर्षी बटाट्याच्या पिकावरच रोग पडला. उपासमारीने शेकडो लोक मृत्युमुखी पडले, हजारोंनी स्थलांतर केलं.
त्यापैकी बहुतेक अमेरिकेत गेले. केनेडी कुटुंब त्यांच्यापैकीच एक. त्यातलेच जॉन एफ केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. असो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.