
विनोद इंगोले
बंदिस्त पक्षिपालनासंदर्भात आलेल्या याचिकेदरम्यान उच्च न्यायालयाच्या धोरण ठरविण्याच्या निर्देशानुसार महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात अभ्यास करण्यात आला. तेथील कुक्कुटपालन संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील तज्ज्ञांनी अभ्यास, निरीक्षणे यांच्या आधारे एका पक्ष्याकरिता लागणारी जागा व गटातील पक्ष्यांची संख्या निश्चित केली. या निकषांचे पालन केल्यास अंडी उत्पादनात फारशी घट न होताही पक्ष्यांचे कल्याण साधणे व्यावसायिकांना शक्य होणार आहे.
पशुपक्षी पालनामध्ये जनावरे किंवा पक्ष्यांचे हाल केले जातात, असा आक्षेप पशुपक्षी प्रेमींकडून कायम घेतला जातो. व्यावसायिक बंदिस्त पक्षिपालनासंदर्भात असाच आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका क्रमांक डब्ल्यु.पी.(सी)९०५६/२१६ सोबतच इतर प्रकरणे एकत्रित करण्यात आली होती. त्यात याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार पिंजऱ्यांमध्ये कोणत्याही पक्ष्याचे पालन करणे हा त्यांच्यावरील अन्याय असून, ते मुक्त निसर्गातच केले जावे. पिंजऱ्यात पक्ष्यांचे पालन करताना त्यांच्यासाठी आवश्यक जागा नेमकी किती असावी, हे निश्चित करण्याची मागणीही होती. प्राणी आरोग्य आणि कल्याणाच्या दृष्टीने वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ यांनी काही निकष निश्चित केले होते. त्यात पक्षी उपाशी राहू नये (कुपोषित नसावेत), पाणी मुबलक असावे, ताण तणावमुक्त वातावरण, शारीरिक व भौगोलिक वातावरणानुसार आवश्यक सोयी, आजारपणापासून मुक्ती, वागणूक जास्तीत जास्त नैसर्गिक राहील, अशा अनेक निकषाचा समावेश होता. कोंबड्यांच्या बाबतीत अन्य चार निकषांची पूर्तता होत असली तरी त्या पिंजऱ्यात असल्यामुळे नैसर्गिक वातावरणामध्ये राहण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही.
प्रयोगात काय साधले?
कुक्कुटपालनशास्त्र विभागाने ही समस्या लक्षात घेऊन, सोडवण्यासाठी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पिंकी रॉय या विद्यार्थिनीला पीएच.डी. साठी हा विषय देण्यात आला होता. पिंकी रॉय यांनी डॉ. मुकुंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने निरीक्षणे, नोंदी घेऊन निष्कर्ष काढले. त्या आधारे विविध शिफारशी करण्यात आल्या. प्रयोगासाठी प्रत्येक पक्ष्यासाठी ६०, ७५, ८५ व १०० चौरस इंच अशी जागा निश्चित केली. त्या आकाराच्या कॅलिफोर्निया पद्धतीच्या पिंजऱ्यामध्ये पक्षी ठेवून २० आठवडे निरीक्षणे घेण्यात आली. महाविद्यालयाचे तज्ज्ञ, कुक्कुट उद्योग क्षेत्र तसेच प्रगतिशील शेतकरी, प्राणी कल्याण समितीचे पदाधिकारी यांची एक समिती तयार करण्यात आली. हे लोक वेळोवेळी भेट देऊन प्रत्येक पिंजऱ्यातील पक्ष्याची स्थिती पाहून वेगवेगळ्या निकषावर आधारित गुण देतील, अशी रचना केली. पक्ष्यांसाठी १०० गुणांचे स्कोअरकार्ड तयार केले. त्यातील ४८ गुण अंडी उत्पादन आणि अर्थकारण याला, तर अंडी गुणवत्ता, रोग प्रतिकारशक्ती याला २४ गुण, पक्षी कल्याणविषयक बाबींना २८ गुण असे विभाजन होते. प्रत्येक भेटीमध्ये समिती सदस्यांनी नोंदवलेल्या बाबी व त्याआधारे पक्ष्यांचे मूल्यांकन करण्यात आले. गुण देण्याच्या पद्धतीमुळे पारदर्शकता होती. प्रत्येक शेडमध्ये पक्ष्यांच्या हालचाली, हावभाव टिपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. सर्व मुल्यांकनानंतर ८५ चौरस इंच जागा प्रभावी आणि उपयोगी ठरत असल्याचे निष्कर्षाअंती समोर आले. अचूकतेने मांडायचे तर ८५ चौरस इंच जागेत ८९.७५ टक्के, १०० चौरस इंच जागेत ९०.७० टक्के, ७५ चौरस इंच जागेत ८८.२० टक्के, ६० चौरस इंच जागेत ८५.५० टक्के अंडी उत्पादन मिळाले. अंडी उत्पादनात एक टक्के घट दिसत असली तरी प्रति पक्षी ८५ चौरस इंच जागेत पक्ष्यांची अन्य वर्तणूक ही अधिक कल्याणकारक असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. त्यामुळे या आकाराच्या पिंजऱ्यांची शिफारस करण्यात आली. पुढे माफसू विद्यापीठांर्गंत जॉइंट सायंटिफिक रिसर्च कौन्सिल (जेएसआरसी) नेही त्यावर अधिकृततेची मोहोर उमटवली आहे.
एका गटात किती पक्षी?
या वेळी एका गटामध्ये किती पक्षी ठेवावेत, यासाठी अभ्यास केला गेला. याच प्रयोगात वरील वेगवेगळ्या आकाराच्या पिंजऱ्यामध्ये एका गटामध्ये सहा आणि नऊ पक्षी संख्या ठेवून निरीक्षणे घेतली. त्यात गटामध्ये सहा संख्या असताना पक्ष्यांचे वर्तन अधिक स्वाभाविक असल्याचे दिसून आले. त्यावर आधारित प्रति पक्षी ८५ चौरस इंचाप्रमाणे ५१० चौरस इंचाच्या एका पिंजऱ्यामध्ये सहा पक्ष्यांना ठेवावे, अशी शिफारसही कुक्कुटपालन शास्त्र विभागाकडून करण्यात आली आहे.
पक्ष्यांकरिता खास रचना
आपल्याला घरामध्ये ज्या प्रमाणे अनेक सोयी असाव्यात असे वाटते, तशीच पक्ष्यांच्याही सोयींचा विचार करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या सोयीच्या दृष्टीने कोणती वैशिष्ट्ये पिंजऱ्यामध्ये असावीत, यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यानुसार अंडी देणाऱ्या पक्ष्यांना अंड्याना उब देण्यासाठी खास अंधारी जागा आवश्यक असते. त्यानुसार कापडी पडदा लावून अंधारी जागा तयार केली. त्यांच्यावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने बसण्यासाठी खास झुल्यासारखा पाइपही पिंजऱ्यात लावण्यात आला. अशा काही सोयी पिंजऱ्यामध्ये करण्यासाठी खर्च वाढत असला तरी पक्ष्यांवरील ताण कमी होऊन, अधिक पोषक वातावरण मिळते. अंडी उत्पादनाचा दर्जा सुधारत असल्याचे डॉ. मुकुंद कदम यांनी सांगितले.
संशोधनाला मिळाला सन्मान
अशा प्रकारचा पक्ष्यांच्या आरोग्य, स्वास्थ, उत्पादन आणि कल्याणाचा विचार करणारा अभ्यास आजवर तरी देशपातळीवर झालेला नाही. त्यामुळे या अभ्यासाची दखल ‘इंडियन पोल्ट्री सायन्स असोसिएशन’ ने घेतली. ५ नोव्हेंबर रोजी मथुरा येथे झालेल्या ‘इंडियन पोल्ट्री सायन्स असोसिएशन’ च्या कार्यक्रमामध्ये डॉ. पिंकी रॉय यांना सर्वोत्कृष्ट प्रबंध (बेस्ट थिसिस) असा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. मुकुंद कदम यांनाही गौरविण्यात आले.
- डॉ. मुकुंद कदम, ८८८८८३६३७४
(विभाग प्रमुख, कुक्कुटपालन
शास्त्र विभाग, नागपूर.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.