
Sangli District Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असतानाच सहकार विभागाच्या तोंडी सूचनेने ती थांबवल्याचे समजते.
विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या समितीने तक्रारीच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरू केली होती.
विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार बँकेकडून माहिती घेऊन कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. चौकशी अहवाल पूरक कागदपत्रांसह २८ पर्यंत सादर करण्यात येणार होता. मात्र चौकशी अचानक थांबली. चौकशी पथक गेले काही दिवस बँकेत फिरकले नाही.
तक्रारदार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. अधिकाऱ्यांनी काही दिवस चौकशी थांबल्याचे सांगत अहवाल सादर होणे कठीण असल्याचे सांगितले.
बँकेकडून सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, तत्कालीन संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटी रुपयांचे कर्ज शिफारस नसताना देणे, स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड कारखान्यास चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्ज वाटप, या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू होती.
सूतगिरणी विक्री प्रकरणाचाही समावेश
आटपाडीतील ४० कोटी रुपयांची बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी १४ कोटी रुपयांत विक्री झाल्याची चौकशी शासनामार्फत सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने चौकशी समितीला दिले होते. त्याचीही चौकशी सुरू होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.