
Vikramgad News : निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व लांबत चाललेला पाऊस, तसेच वातावरणातील बदल, अवेळी पडणाऱ्या पावसाचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा (Mango) व काजू उत्पादनाबरोबरच (Cashew Production) काळ्याभोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झाला आहे.
दरवर्षी गावरान जांभूळ बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते; मात्र जांभळाचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चाललेला आहे. त्यामुळे जांभूळ पिकण्याचा कालावधी लांबत जाऊन जून महिना उजाडतो. पावसामुळे जांभळे खराब होऊन नुकसान सहन करावे लागते.
यंदा जांभूळ उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व ५० ते ६० टक्के उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार शेतकरी वर्गाने सांगितले.
विक्रमगड हा जंगली भाग असल्याने जांभळाचे भरपूर उत्पादन मिळते; परंतु गेल्या दोन-चार वर्षांपासून हवे तसे उत्पादन निघत नसल्याने शेतीप्रमाणे सर्वच अलबेल झालेले आहे.
एप्रिलचे १५ दिवस संपत आले तरीही अद्याप जांभूळ फळधारणा झालेली नाही. साधारणपणे जानेवारी महिन्यात जांभळांच्या झाडांना मोहर येत असतो; परंतु यंदा मोहर लांबला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे मोहर व लहान फळेही गळून पडली आहेत.
त्यामुळे विक्रमगड बाजारात गावरान जांभळांची मे महिनाअखेरची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
गावरान जांभूळ दुर्मिळ
जांभळाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने गावरान जांभळे या वर्षीही दुर्मिळ झाली आहेत. जुनी जांभळाची झाडेही कमी झालेली आहेत. शिल्लक राहिलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत.
पूर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही. त्यामुळे गावरान जांभळांचा पहिल्याप्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झाले आहे.
आदिवासी विक्रेते, शेतकऱ्यांना आर्थिक फटका
यंदा हवामानातील बदलामुळे आंबा, काजू उत्पादनाप्रमाणेच जांभळालाही उशिराने मोहर आला आहे. हंगाम उशिराने सुरू झाल्याने जांभळाचे उत्पादन व मिळणारा पैसा येथील बागायतदारांना कमी मिळणार आहे.
वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे जांभूळ व्यवसाय फक्त मे महिना व जूनच्या सुरुवातीला चालणार असल्याने आदिवासी विक्रेत्यांना व शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.