Marriage In village : चालत्या संसाराला खिळ घालणाऱ्या माणसांची उन्हाळ जिंदगी

सुन्यानं गटागट दोन ग्लास पाणी पिलं. आणि मंडपातली सगळ्यात सेफ जागा शोधायला लागला. बाई तिकडं बायकांच्या गराड्यात मिसळून गेली होती.
Marriage In village
Marriage In villageAgrowon

लेखक- धनंजय सानप

Rural Story : शाळेतल्या पटांगणात लग्न मंडप घातलेला होता. मंडपात बसलेली पुरुष मंडळी अधूनमधून उपरण्यानं घाम पुसत होती. गरम झळा अधूनमधून कानात शिरत होत्या. कडकडीत ऊन घामाच्या धारा लावत होतं.

तिशी चाळीशीतले पुरुष मंडपाच्या बाहेरच्या लिंबाच्या झाडाखाली बसून गप्पा झोडत होती. मंडपात सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली. बायका खोलीत होत्या. कलकलणाऱ्या उन्हातही लग्नाचा उत्साह चौफेर पसरलेला होता.

सुन्यानं गटागट दोन ग्लास पाणी पिलं. आणि मंडपातली सगळ्यात सेफ जागा शोधायला लागला. बाई तिकडं बायकांच्या गराड्यात मिसळून गेली होती. चुलत चुलत भाऊ आणि त्यांच्या बायका तर कुठं एक दोन माणसं तेवढी ओळखीची दिसत होती.

त्यातल्या एक दोघांशी नजरानजर झाली होती. त्यांना जाऊन बोलावं असं काही त्याला वाटलं नव्हतं किंवा त्यांच्याकडूनही तसा प्रतिसाद आला नव्हता.

अजून त्याचं नजरेनं जागा शोधणं सुरूच होतं. आधी तो बाईसोबत शाळेच्या खोलीत बसलेला होता. पण तिथं बसून उकडायला लागलं होतं आणि अशा कडकडीत उन्हात घशाला कोरड जाणवत होती म्हणून तो उठून बाहेर आला होता.

लग्नात दोन्हीकडची बरीच मंडळी मिरवण्यात दंग होती. कुणी बसल्या बसल्या इकडच्या तिकडच्या चौकशा करत होते. तर कुणी कामाच्या घाईत दिसत होते.

अधूनमधून उग्र अत्तराचा सुगंध मंडपात दरवळत होता. त्यातला एक सुगंध त्याच्या नाकाला ओळखीचा वाटला. तो मोगऱ्याचा सुगंध होता. या गर्दीतही त्यानं तो अचूक ओळखला होता. काही वास ओळखीचे असतात. त्यातलाच हा एक.

त्या सुगंधानं त्याचं मन थोडं विचलित झालं होतं. क्षणभर त्याला त्या सुगंधाचा पिच्छा करावासा वाटला. पण पुन्हा अंगावरची पाल झटकावी तसा त्यानं तो विचारही झटकला. आणि पावलं टाकत तो तसाच इकडं तिकडं जागा शोधत नवऱ्या मुलाच्या खोलीजवळ आला.

तोवर माईकमधून कर्कश आवाज कानावर आला. हॅलो! चेक वन टू थ्री... चेक! माईक टेस्टिंग... म्हणणारा पोरगा घोगऱ्या आवाजात दोन तीन वेळा तीच त्याची ठरलेली शब्द बोलत होता. शाळेच्या खोल्या स्लॅबच्या होत्या.

त्यातली उत्तरेला असलेली एक खोली नवऱ्या मुलाला दिलेली होती. तिथं माणसांची वर्दळ होती. तो तिथून पुढं सरकला आणि मोबाईल काढून स्क्रोल करायला लागला. शऱ्याचे एकदोन मेसेज आले होते. त्यानं त्याला रिप्लाय केला.

नवीन काहीच नाही, म्हणून त्यानं मोबाईल खिशात ठेवला. आणि रेंगाळत तो मंडपातल्या हिरव्या चटईवर चार पाच घोळक्यापासून अंतर सोडून बसला.

Marriage In village
Rural Social Structure: गाव आणि शहराच्या मधोमध हरवलेली माणसं

आजूबाजूची पुरुष मंडळी आपआपल्या नादात बसून होती. त्यातली बरीच जण नवरदेव मंडपात कधी येतो याची वाट पाहत होते. सुन्या चटईवर बसला तसा मागून त्याच्या पाठीवर थाप मारत केशव म्हणला, "कधी आलास! फोनबिन करायचा असतोय का नाह्य"

तसा सुन्या बावचळून झर्रकन मागं वळत म्हणला, "तुय व्हय! ह्येव काय आत्ताच आलोय. लै उन्हाची बेजारी राव!" केशव म्हणला, "मंडपाच्या भाहीर मोटरसाईकल लावलीस तव्हाच आवाज देणार व्हतो.

मपल्या हातात आहेराचं सामान होतं मंग म्हणून देला नाही." "हा का. मला तू दिसलाच नाइ." केशव म्हणजे सुरेशरावांच्या बहिणीचा धाकटा मुलगा. तो औरंगाबादला कुठल्यातरी कंपनीत कामाला होता तेव्हापासून दोघांची ओळख होती.

काही दिवस एकाच खोलीत ते राहतही होते. पुढं केशवनं लग्न केलं आणि कुठं गायब झाला तेच कळालं नाही. त्यानंतर त्यांची भेट झाली नव्हती. पण इथं अशी अचानक भेट झाल्यावर दोघांनी एकमेकांची किरकोळ विचारपूस केली.

सुन्याला आत्तापर्यंत उगाच एकटं पडल्यागत वाटत होतं. केशवच्या भेटीनं त्याला थोडा मोकळेपणा आला. असं ओळखीचं माणूस खूप दिवसांनी भेटलं की, पटकन काय बोलावं ते त्याला कळायचं नाही. तो थोडा गांगुरून जायचा.

कुठल्या मुद्द्याला हात घातला म्हणजे केशव बोलत राहील याची तो मनाशीच जुळवून करून बोलला, "मंग आत्ता काह्य सुरुये?" केशव तसा खुदकन हसून म्हणला,"काह्य सुरू असणारे! तेच आपला ससार बाकी काह्य! ससाराचं वझं बोकांडी पडल्याव काह्य असतंय. काम अन् घर." सुन्याच्या मोघम प्रश्नावर केशवचं मोघम उत्तर आलं होतं.

म्हणून मग सुन्यानं अजून धीटपणे पण हलक्यात विचारलं, "तसं नाई रे म्हंजी उद्योगधंदा काह्य सुरुय ईचाऱ्याचं होतं मला!" त्यावर केशव म्हणला, "ह्या भागात कसला आलाय राव उद्योगधंदा! काम धरलंय रतन शेठच्या स्टोअर्सवर. सकाळी जायचं आणि राती घरला यायचं. हाई ते सुखात चालूय."

केशव जनरल स्टोअर्सवर कामाला होता. त्याचं बोलणं सुरूच होतं. सुन्या गळ्यातला रुमाल काढून अधूनमधून स्वतःला वारं घालत होता. पुढं सुन्यानं विचारलं, "वैनी काय आल्या नाय काह्य सोबत?" "नाई ती माहेरी गेलीय. तिच्या चुलतभईनीचं लग्नय म्हणून एकटाच आलोय."

खरंतर वैनीचा विषय निघाल्याबरोबर केशवच्या तोंडावर बारा वाजल्याचं सुन्याला जाणवलं होतं. पण हा विषय लांबवण्यात मजा नव्हती म्हणून त्यानं फाटा फोडत विचारलं, "महिना काह्य पडतोय तुला?" तसा केशव काही वेळ पॉज घेत म्हणला, "हाई आठ हजार!" त्याचं बोलणं संपेपर्यंत सुन्यानं पुढचा प्रश्न फेकला, "त्यात धकतंय का मंग?"

या प्रश्नावर केशव पाय लांब करत म्हणला, "कसलं धकतंय. ससाराला काय बसर येतंय व्हय. कव्हा कव्हा वाटतंय मायला उगच सोडलं औरंगाबाद! आमचं फादर तरी म्हणत होतं नकु येऊ इकडं. पण आपल्यालाच कंड होता. जिरला आता!" "कसं काह्य?" सुन्याला उत्सुकता लागली होती.

तेवढ्यात माईक टेस्टिंग करणाऱ्या पोरानं 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी सदा खुश रहो दुआ है हमारी' लावून दिलं होतं. त्या आवाजानं केशव थोडावेळ बोलायचा थांबला आणि म्हणाला, "कसं होतं माहिती का, लग्न व्हायच्या आधी खर्चबिरचं नव्हता एवढा.

लग्न झालं अन् खर्चाचं लटांबळ बोकडी बसलं. लग्न झाल्यावर चार पाच महिने काढले औरंगाबादमधी. वाळूजमधी रुमबिम केलती. मजेत ससार सुरू होता बरंका! पण त्या कंपनीत ना नऊ तासाच्या शिफ्टला लैच पिट्टा पडायचा. अन् मिळायचा इतुसा पगार.

त्यात बायकू एकटीच रह्याची घरला म्हणून माइला तिकडं बोलून घेतलं. त खर्चचं वाढला. राती नुसतं हाथरूनावर पडलो की, डोळाच लागायचा. मायला म्हणलं हे काह्य आपल्याला जमायचं नाह्य.

शेवटी बेजारी करून जगण्यात काह्य मजाय काह्य? नाइ तूच सांग! मंग काय गुंडाळलं ह्येकदिवस कदरून चंबूगबाळ अन् धरली गावाकडची यस्टी. पण हिथं आल्यावर पार उन्हाळाच झाला." सुन्यानं आता कुतूहल म्हणून बसल्याजागीच मागे रेलत हाताचा आधार घेत विचारलं, "कसं काह्य?"

Marriage In village
Rural Social Structure : गावगाड्यात जागा हुडकणाऱ्या माणसांची गोष्ट!

केशवला भडाभडा बोलावसं वाटत होतं. पण लग्न मंडपात या विषयावर चर्चा करणं त्याला जखडून टाकणारं वाटलं. म्हणून तो लांबवलेले पाय आखडत सुन्याला म्हणला, "तिकडं मंदिराकड एक चकर टाकू. डीजे लैच वाजायला. बघून येऊ.

" सुन्याला त्याला तात्काळ नकार द्यावसा वाटला होता. या उन्हात चालत जायचं म्हणजे पुन्हा थकल्यासारखं होणार या विचारात त्यानं नकार देऊन पाहिलं. आधीच झोप पूर्ण झाली नव्हती. म्हणून त्याला नकार द्यावा असं वाटलं होतं.

केशवसोबत गेलो नाहीतर तो पुढचं काय बोलणार नाही याची जाणीव होताच त्यानं हातावरचा भार हलका करत जमिनीचा आधार घेतला आणि म्हणला, "बरं चल येऊ एक चकर टाकून. म्या बी लै दिवस झालेत पोरं नाचताना पाहिलीच नाहीत." त्यावर केशव म्हणला,

"आरं पोरं फकाट होऊन नाचतेत. कव्हाच्यानं सुरुय नुसता डिस्को! आमच्या मामानं जावई लई नंबरी मित्रमंडळ असणारा हुडकलाय." दोघांनी एकमेकांना हसत टाळी दिली आणि मंडपातून बाहेर पडले.

दोघं मग डिजेच्या दिशेनं चालू लागली. डीजे अजून बराच लांब होता. आजूबाजूची पुरुष डोक्यावर रुमाल टाकून आणि बायका डोक्यावर पदर घेऊन इकडून तिकडं जात होती. सुन्यानं गळ्यातला रुमाल डोक्यावर टाकला. केशवनं हात रूमाल काढून डोक्यावर आवळून घेतला. सुन्यानं पुन्हा विषयाला हात घातला.

"मंग औरंगाबाद सोडल्यावर कसं काह्य गावात बेजारी झाली म्हणीत होतास?" त्यावर केशव सावध होत बोलायला लागला. "सांगू नकु कोनाला. गावात आलो तसा काहारकरकसा सुरू झाला. बायकूला काय हिथं करमना गेलंतं. हिथं गावात शहरासारखं नसतंय आबाद.

घरातली कामंबिमं करावीच लागत्यात. पण बायकुला झालं त्याचं वझं. एकतं तिकडं मोह्याशिवाय कोणाचा धाक नव्हता. हिथं माईचं अन् तिचं लागले खटके उडायला. एकदिवस तर भडकाच झाला. बायकूनं कडई नीट घासली नाइ म्हणून मपली म्हातारी खालीवर बोलली काह्य तरी.

मी होतो त्या दिवशी दुकानावर. मंग बायकुनं केला सासऱ्याला फोन सासऱ्यानं मेव्हन्याला मोटारसायकलवर धाडलं अन् मी घरी येईस्तो त गेला तिला घेऊन." सुन्या कान लावून सगळं ऐकत होता. एखादं अर्ध्या वाक्यावर हं म्हणत होता.

केशव पुढं बोलत होता."बरं आमच्या म्हातारीला त्या कडईत काय पंचपक्वान्न करायचे होते काय माहीत! समदं नीट चाललं होतं बरं का. पण मिठाचा खडा टाकला त्येव आमच्या म्हातारीनं."

"मंग तू आणायला गेला नाहीस काय?" सुन्यानं विचारलं. "आरं गेलतो की बबा. पण एकदा नासलं की भलतंच नासतं. कोनाला म्हणू नकु बरं का! म्हणलं दोन तीन दिवस राहू द्यावी तिकडं तिला. होईन शांत मंग सासू-सासरे देतन खुद धाडून हिकडं.

पण झालं उलटच. घोडा आमच्याच बोकांडी चढला." सुन्याला असं सांगता सांगता सस्पेंस तयार केलेलं आवडत नव्हतं. पण केशव स्वतःची बेजार इतकी रंगून सांगत होता की, सुन्याला त्याच्या शब्दाशिवाय दुसरं काही महत्त्वाचं वाटत नव्हतं.

सुन्यानं जाणीवपूर्वक विचारलं, "मंग पुढं काय झालं?" "कशाचं काय उन्हाळाच नुसता. बायकूला तीन दिवसांनी फोन केला. म्हणलं राग उतरला असन आता म्हणून. पण त्येव उचलला सासूनं. सासूला म्हणलो, शिवकन्याकड द्या. तर तिनं आधीच रान हाणलं.

पोरीला लै सासुरवास लावलाय तुम्ही. एक त शहरात नोकरीला होता म्हणून आमची सोन्यासारखी पोरगी तुम्हाला देली. अन् तुम्ही तिला खरकटं काढायला घेऊन आले व्हय गावात.

आधीच सांगायला पाहिजे होतं. हे उगाच आपलं रान हणून शेवटी बॉंबच टाकला. म्हणली, आता काय आम्ही पोरगी नांदायला धाडीत नसतो." केशव म्हणला. "मंग?" सुन्यानं विचारलं.

केशव पुन्हा बोलायला लागला. "तव्हा मंग फादर आणि सुरेश मामाला मध्यस्ती करायला लावली. कसंबसं लाईनीवर यायला लागलं होतं. तोवर पुन्हा एकदा धुणं धुण्यावरून म्हातारी वरखाली बोलली. पुना तेच. तव्हा त मी घरी असून उपोग झाला नाई. कोणाची बाजू घेऊ तेच कळलं नाई.

तिथून पुढं बायकू खळीला आली अन् सासू त्यात तडाखा हाणायला बसली. मंग काय मपल्या जिंदगीचा नुसताच खकाना. सगळं मिटामिटीत सासूनं बायकूचे कान भरले. बायकू म्हणली, तुम्ही आई-बापूतून वेगळं राहणार असले तरच मी नांदायला येईन. नाही तर नाही.

मग काय घेतलं घरात प्लायुडचं पार्टिशन ठोकून. थाटला येगळा संसार. आता घरात माय-बापाची एक चूल अन् आमची एक चूल. लागला घोडा!"

केशवनं आपलं भकाभका असलं नसलं सगळं सांगून झालं होतं. सुन्याला काय बोलावं ते कळालं नाही. त्यानं नुसतं अवघडय राव म्हणून विषय थांबवला. केशव त्यावर जिंदगी अशीच असती तुमचं लै बरंय म्हणला. तोवर डीजेचा दणदणाट कानावर येऊ लागला होता.

सुन्या आणि केशव डीजेच्या जवळ पोहचले होते. डिजेवर गाणं सुरू होतं, मला प्रितीच्या झुल्यात झुलवा अन् इशकाचा गुलकंद खिलवा. डिजेसमोर तरणीपोरं नागमोडी नाचत होती. सुन्या आणि केशव एका बाजूला उभे राहून नुसतेच त्या वेडवाकडं नाचणाऱ्या पोरांकडे पाहत होती.

नवरीकडची दोन तीन पुरुष डीजेवाल्याला पुढं चल म्हणून खुणावत होती. लग्नाचा मुहूर्त टळला होता म्हणून त्यांची गडबड सुरू होती. डीजेवर झिंगलेली पोरं डीजेवाल्याला इथंच थांब म्हणत होती.

सुन्याला त्या आवाजात एक धुंद चढली. केशवबद्दल त्याला कीवही यायला लागली होती. त्याच्या मनस्थितीचे अडाखे बांधण्याचा तो प्रयत्न करत होता. पण शेवटी त्याला ते जमत नव्हतं. कडकडीत उन्हामुळं जमीन वाफा बाहेर फेकत होती.

डीजेचा आवाज त्या गरम वाफा चिरत गल्लीतल्या घरांच्या भिंतीवर आदळत होता. त्या गरम वातावरणात सुन्याच्या मनात मात्र केशवचा गोतावळा डचमळत होता. तेवढ्यात एक तरूण केशवच्या हाताला धरून आग्रहाने ओढत बाजूला घेऊन गेला.

केशवने पाच मिनिटात येतो, असं बोटानं सुन्याला खुणावलं. कारण डीजेच्या आवाजासमोर माणसांचे आवाज येण्याची शक्यता नव्हती. सुन्यानं त्यावर मान हालवत होकार दिला. आणि पुन्हा आजूबाजूला उभ्या असणाऱ्या घोळक्यात सामील झाला.

Marriage In village
Rural Social Structure: गावातलं गावपण अनुभवताना होणारी घुसमट

नाचणारी पोरं निवळ नाचण्याचा आनंद घेत होती. नवरदेव चकचकीत पांढऱ्या चारचाकीत बसून होता. काही गाणी पुन्हा पुन्हा वाजत होती तर काही वाजता वाजता बंद केली जात होती. डीजेचा टेम्पो पाहून सुन्याला संत्याची आठवण आली होती.

त्या आठवणीत तो फार रमला नाही. जिंदगीचा अजून एक असमाधानी चॅपटर केशवच्या निमित्ताने सुन्याला पाहायला मिळत होता. ऊन आता अधिक प्रखर होत चाललं होतं.

क्रमशः

#गोतावळा_९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com