आठवणींचा विठोबा...

वर्तमानात जगत असतानाही भूतकाळात हळूच डोकावून कडू गोड आठवणींची पणती मिणमिणती ठेवायला प्रत्येक माणसाला आवडत असते.
मशागत लेख
मशागत लेख Agrowon

देवा झिंजाड

वर्तमानात जगत असतानाही भूतकाळात हळूच डोकावून कडू गोड आठवणींची पणती मिणमिणती ठेवायला प्रत्येक माणसाला आवडत असते. ही आठवणींची पणती कधी कधी संकटात जगण्याचे बळ देते. कधी चीड निर्माण करते. कधी पश्चातापही करायला लावते. कधी आपल्या हातून काहीतरी करायचे राहून गेलेय, अशी हुरहूरही मनाला लावून जाते. तर काही वेळा हीच पणती 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' बसवून आपल्याला हळुवारपणे झोके देता देता एक एक पदर उलगडत डोळ्यांच्या कडाही ओलावते. मग काळजाला शरण गेलेले डोळे वर्तमान विसरून बराच वेळ भूतकाळात रेंगाळत राहतात.

मशागत लेख
खते, बियाणे दुकानात 'कृषी'कडून तपासणी

विशेषतः गावापासून दुरावल्यावर गावच्या आठवणीत अनेकजण गुंतून पडतात पण तो गुंता कसा सोडवायचा ह्याची जाण प्रत्येकालाच असते असं नाही. मग अशावेळी त्यांच्या मदतीला 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हे चंद्रकात चव्हाण (९४२०७८९४५५) ह्याचं पुस्तक धावून येते. त्यातला प्रत्येक लेख वाचकाला मनसोक्त झोके देत राहतो. त्या प्रत्येक झोक्यासोबत आपल्याला नवा स्नेहगंध मिळत जातो. प्रत्येक पानासोबत तुमच्या आमच्या मंतरलेल्या क्षणांचे जाते गरगर फिरायला लागते.

मशागत लेख
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

चूल, माती, माय, पावसातलं भिजणं, आयुष्याच्या वारीच्या भावगर्भ पाऊलवाटा पुन्हा जिवंत होत जातात. मग हरवलेले काहीतरी चांगले-वाईट सापडत चाललेय असे वाटू लागते. अन् हे अगदी जसेच्या तसे अतिशय सुंदर व सोप्प्या भाषेत व शब्दात बांधून आपल्यासमोर मांडण्याची कला त्यांच्या लेखणीत आहे असे पुस्तकाच्या पानोपानी वाटत राहते.

खरं तर पुस्तक हा केवळ एक धागा आहे पण ह्यातील प्रत्येक लेख हा तुमच्या आमच्या जगल्या भोगल्याची गोष्ट आहे. त्यातले अनुभव अस्सल आहेत. शेतीमातीशी असलेली आपली घट्ट नाळ कधीच तुटत नाही हे सांगताना आठवणींचा एक सुंदर गोफच लेखक आपल्या ओंजळीत ठेवतात असे वाटत राहते. आपण पोट भरायला कुठंही आलो असलो तरी ज्या गावच्या मातीतल्या फुफाट्याने आपले पाय माखले त्या मातीचा आठव मनाला गहिवर आणतोच अन् हा हळवा गहिवर उभा करण्याचे सामर्थ्य अन् आपलेपणाचा ओलावा निर्माण करण्याची ताकद ही साहित्यात असते.

म्हणून तर 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' ह्या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाने मानवी जीवनाच्या अनेकरंगी स्मृती तर जागवल्याच पण गावगाडाही पुन्हा जिवंत केला. तसेच ह्यातील एक एक अनुभव आठवणींच्या विठोबासोबत ओंजळभर सुखही देऊन जातो. एकूणच त्यांच्या जीवनाविषयीच्या तत्वचिंतन्मातक मांडणीने भौतिक सुखांच्या पलीकडेही सुखाचे असंख्य बिंदू आहेत ह्याची जाणीव आपल्याला जमिनीवर राहण्याचा संदेश देते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com