
Pune News : ग्रामविकासाला (Rural Development) प्रोत्साहन व चालना देण्याची गरज असून प्रदर्शन व विक्री केंद्र आदी उपक्रमांमुळे ग्रामीण कामगारांची प्रगती होण्यास मदत होईल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने शिवाजीनगर येथील हातकागद संस्था येथे आयोजित मातीकला वस्तूंचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी (ता. १) झाले. त्या वेळी पाटील बोलत होते.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत, खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उद्योजक श्रीकांत बडवे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की खादी ग्रामोद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज आहे. खादी म्हणजे केवळ कापड नसून पर्यावरण संतुलनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे साधन आहे. ग्रामीण भागातील कारागिरांना स्वतः पायावर उभे करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता शहरी भागातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
साठे म्हणाले, की मातीकलेला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मातीकला वस्तूंचे राज्यस्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. खादी ही स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत होण्याकडे एक वाटचाल आहे. खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून अशा उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात जिल्हानिहाय मेळावे, प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत.
बडवे म्हणाले, की ग्रामोद्योगात ग्रामीण आणि उद्योग या दोन गोष्टींची सांगड आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उद्योजकाला उद्योगाची माहिती मिळण्यास स्वत:बरोबर देशाची प्रगती करण्यास हातभार लागतो. पुरस्कार मिळणे ही एक प्रेरणा असून आगामी काळात चांगले कार्य करण्याची उर्जा मिळते.
या वेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे ‘ग्रामोद्योग’ या त्रैमासिकाचे अनावरण करण्यात आले. हे प्रदर्शन ३ मे पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत खुले असणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.