
स ध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Elections) वारे जोरात वाहत आहे गावात आपापल्या परीने उमेदवार मत मलाच द्या, असा आग्रह मतदाराकडे करीत आहेत. सरपंच थेट जनतेतून निवडून जाणार आहे. अशी ही निवडणूक येत्या काही दिवसांत संपन्न होईल. आता मुद्दा महत्त्वाचा राहतो तो गावातील चांगले वातावरण असण्याचा! यासाठी काही तडजोड करत बिनविरोध निवडणूक व्हावी हा पर्याय आहेच.
फॉर्म मागे घेण्याची तारीख जवळ आली आहे त्या दिवसापर्यंत नक्कीच संधी आहे माणसाला आलेला राग हा क्षणिक असतो. क्षणिक आलेला राग हा वादळासारखा असतो तो सर्व होत्याचे नव्हते करतो यासाठी चांगले विचार जोपासत गावासाठी एक होऊयात. कायम बेबनाव करून तरी हाती काय लागते? यामुळे अजूनही ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकते. फक्त यासाठी हवा आहे तो गावकऱ्यांचा आपसांतील सुसंवाद या सुसवांदातच माणूस एकत्रित करण्याची शक्ती नक्कीच असते. यासाठी हवी फक्त ती इच्छाशक्ती!
आपण एका गावात अथवा शेजारी, शेजारी राहूनही आपसात बोलणे टाळत असतो. याचा परिणाम आमच्यात दुरावा निर्माण करण्यात होत असतो. आपल्याला आपले गाव चांगले करण्यासाठी अगोदर चांगल्या विचाराची कास धरावी लागेल. भौतिक प्रगती म्हणजेच सर्व प्रगती असते हा बोलबाला समाजात केला गेला आहे. व्यवस्था असावी लागते अवस्था चांगली येण्यासाठी! त्यामुळे अनेक जण या मृगजळाच्या मागे धावत राहतात. गावातील व्यक्ती ही गावकऱ्यांना आमचीच वाटली पाहिजे, असा स्वतःबाबत गावकऱ्यांचा समज झाला पाहिजे. इतकी सावधानता नेतृत्व करणाऱ्या लोकांनी घेतलीच पाहिजे.
एक बाब सत्य की एकच विचार सर्वांचा असू शकत नाही पण समोरील व्यक्ती वेगळ्या विचारांची असेल तर ती आमची शत्रू असू शकत नाही, असा विचार करणे गरजेचे आहे. आता यात एक विषय राहतो तो म्हणजे या निवडणुकीत मीच का माघार घेऊ, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. परंतु हा ‘मी’च आमचा घात करत असतो. याकरिता गावासाठी नेहमी चांगले कार्य करीतत राहिले की गावकरी त्या व्यक्तीला प्रेमाने जवळ करत असतात.
यासाठी कष्ट तितके करावे लागतात. निवडणूक म्हटले की इच्छा नसतानाही गैर मार्ग वाट्याला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी थोर आहे, हे विसरा. मी हुशार आहे हेही विसरा आणि तुम्ही लहानपण घेण्याचे स्वीकार करा. मग होईल काय तर तुम्हाला सर्व गावकरी जवळ करतील. परंतु यासाठी उद्देश चांगला ठेवा. गावातील तरुण आपला आदर्श घेतील, असे वर्तन आम्ही जर करू शकतो. यासाठी हवा आहे समंजसपणा! असे झाले तर हा ग्रामपंचायत मधील सर्वात मोठा गावविकासासाठी विजय राहील.
रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.