आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल
Ajit Pawar Agrowon

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल

उपमुख्यमंत्री अजित पवार ः वैद्यकीय उपकरणामुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट होणार

पुणे ः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Health Center) ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनॅलिसिस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे (Health Equipment) जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘गॅप ॲनॅलिसिस योजनेअंतर्गत (Gap Analysis Scheme) खरेदी केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी पवार यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘जिल्हा परिषदेचा स्वनिधी, सामाजिक संस्थांनी केलेली मदत, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्यसेवेसाठी आवश्यक असलेल्या या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरच अद्ययावत उपचार उपलब्ध करून देणे शक्य होईल आणि गरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’

वैद्यकीय उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणांप्रमाणेच तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीदेखील आवश्यकता असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.

रुग्णसेवा ही ईश्‍वर सेवा मानून काम करा

कोरोनाकाळात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे सांगून पवार म्हणाले, डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी केवळ तज्ज्ञ असणे पुरेसे नसून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. रुग्णसेवा ही मानवसेवा, ईश्वरसेवा मानून काम केले पाहिजे. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय कमी आणि सेवाकार्य अधिक आहे, हे लक्षात ठेवावे, असे आवाहन पवार यांनी केले.

आरोग्य केंद्र सक्षमीकरणासाठी सीएसआरचा १७ कोटी निधी

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी ९ खासगी कंपन्यांनी १७ कोटी ६० लक्ष रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी दिला असून त्यातून एकूण १०२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण शक्य झाले आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून ४ कोटी २५ लाख रुपये देण्यात आले असून त्यातून ५४ आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती आयुष प्रसाद यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com