Vegetable oil : वनस्पतिजन्य तेलाची अनोखी दुनिया

एकेकाळी स्थानिक तेली स्थानिक तेलबियांमधून खाद्यतेल काढून ते ग्राहकांच्या मागणीनुसार स्थानिक पातळीवरच विकत असत. पण वाढती लोकसंख्या, गिऱ्हाइकांची वाढती सुबत्ता आणि वाढती निर्यात अशा विविध कारणांमुळे तेल आणि तेलापासून बनणारे पदार्थ पुढे मोठ्या प्रमाणात खपू लागले. त्यामुळे ते मोठ्या कारखान्यांमध्ये निर्माण होऊ लागले. कारखान्यात मोठ्या प्रमाणात तयार होणारा माल उत्पादकाच्या वैशिष्ट्यपूर्ण वेष्टणात आणि विशिष्ट ब्रॅंडखाली विकला जात असल्याने तैलजन्य पदार्थांना एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागले. या समस्येचे कारण असे होते, की कोणताही माल एखाद्या विशिष्ट ब्रँडने विकायचा असेल, तर त्याची गुणवत्ता सतत कायम राखावी लागते.
vegetable oil
vegetable oilAgrowon

डॉ. आनंद कर्वे

वनस्पतिजन्य तेल (vegetable oil) केवळ आपल्या आहारातच नव्हे तर साबण, सौंदर्यप्रसाधने, औषधे, तैलरंग, वंगण आणि इतरही अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरले जाते. यात सर्वात जास्त तेल लागते ते आहारासाठी. एकेकाळी स्थानिक तेली स्थानिक तेलबियांमधून खाद्यतेल काढून ते ग्राहकांच्या मागणीनुसार स्थानिक पातळीवरच विकत असत.

पण वाढती लोकसंख्या, गिऱ्हाइकांची वाढती सुबत्ता आणि वाढती निर्यात अशा विविध कारणांमुळे तेल आणि तेलापासून बनणारे पदार्थ पुढे मोठ्या प्रमाणात खपू लागले. त्यामुळे ते मोठ्या कारखान्यांमध्ये निर्माण होऊ लागले.

कारखान्यात मोठ्या प्रमाणात तयार होणारा माल उत्पादकाच्या वैशिष्ट्यपूर्ण वेष्टणात आणि विशिष्ट ब्रॅंडखाली विकला जात असल्याने तैलजन्य पदार्थांना एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागले. या समस्येचे कारण असे होते, की कोणताही माल एखाद्या विशिष्ट ब्रँडने विकायचा असेल तर त्याची गुणवत्ता सतत कायम राखावी लागते.

vegetable oil
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

गुणवत्तेत सातत्य ठेवायचे असेल तर एकाच गुणवत्तेचा कच्चा माल सतत मिळायला हवा; पण वनस्पतिजन्य तेलाच्या बाबतीत हे शक्य होत नाही. भारतात नारळ हे एकमेव पीक वर्षभर सतत उपलब्ध असते. ते सोडल्यास प्रत्येक वनस्पतीच्या काढणीची विशिष्ट वेळ असते. त्यामुळे प्रत्येक तैलबीज त्याच्या काढणीच्या हंगामातच मोठ्या प्रमाणात आणि वाजवी किमतीत मिळते.

भारतात नारळाशिवाय, भुईमूग, मोहरी, सोयाबीन, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, कारळा, सरकी, एरंडी, भाताचा कोंडा यांसारख्या कृषिजन्य स्रोतांशिवाय करंज, कडुलिंब, मोह, उंडी, जट्रोफा, पिसा, गेळा, साल, पिलू, कोकम, यांसारख्या कृषिबाह्य स्रोतांपासूनही तेल काढले जाते. पण कारखान्याच्या व्यवस्थापनात कच्च्या मालाची अशी हंगामी उपलब्धता परवडत नाही. कारण सुव्यवस्थापनाच्या दृष्टीने कारखाना वर्षभर चालवणे अपरिहार्य असते. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे होते.

vegetable oil
Edible Oil Import : खाद्यतेल आयातीशिवाय भारताला पर्याय नाही

तेलाचे गुणधर्म त्याच्या रासायनिक घटनेनुसार बदलतात. तेलाच्या प्रत्येक रेणूत तीन तीन मेदाम्ले असतात. कोणत्या तेलात कोणती मेदाम्ले असतात हे आता माहिती झाले आहे. आणि या मेदाम्लांनुसार तेलाचे आणि त्या तेलापासून निर्माण केलेल्या पदार्थांचे गुणधर्म कसे बदलतात याचाही अभ्यास झालेला आहे.

उदाहरणार्थ, खोबरेलात पामिटिक आम्लाचे प्रमाण अन्य तेलांच्या मानाने अधिक असते. पामिटिक आम्लात कार्बनचे फक्त १६ अणू असतात, तर अन्य तेलांच्या मेदाम्लांमध्ये १८ ते २२ कार्बन अणू असतात. त्यामुळे पामिटिक आम्लाचा रेणू सापेक्षतः लहान आकाराचा असतो. त्यामुळे जर खोबरेल तेलापासून साबण बनवला तर इतर तेलांपासून बनविलेल्या साबणापेक्षा त्याला अधिक चांगला फेस येतो.

पिलू आणि पिसा या वनस्पतींच्या तेलातील मेदाम्लांमध्ये तर केवळ १२ कार्बन अणू असतात आणि त्यामुळे या तेलांचा साबण तर फारच चांगल्या प्रतीचा समजला जातो. जवसाच्या तेलात लिनोलेनिक आम्ल हे मेदाम्ल असते. या मेदाम्लाचा हवेशी संपर्क झाला तर ते वाळते. त्यामुळे तैलरंगांमध्ये जवसाचे तेल वापरले जाते.

एरंडीच्या तेलात ९५ टक्क्यांहून अधिक रिसिनोलेइक आम्ल असते. मानवाच्या पोटात गेल्यावर त्याचा काय परिणाम होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण ते अत्यंत घणसर असूनही कमी तापमानात गोठत नाही म्हणून विमानात वंगण म्हणून ते वापरले जात असे. वंगणाचे तेल विकणाऱ्या एका कंपनीने कॅस्ट्रॉल हा ब्रँड एरंडीच्या तेलावरूनच (कॅस्टर ऑइल) घेतलेला आहे.

आपण भारतात आधुनिक सौंदर्यप्रसाधने बनविण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्यापुढे आणखी एक समस्या उभी राहिली. आधुनिक सौंदर्यप्रसाधने आपल्याकडे युरोपातून आली आणि त्यांच्या उत्पादनाचे मुख्य केंद्र होते फ्रान्स.

त्यामुळे या उत्पादनांना लागणारा मुख्य घटक होता ऑलिव्हचे तेल. ऑलिव्ह हा भूमध्य सामुद्रिक प्रदेशातला एक वृक्ष असून, त्याच्या बियांपासून तेल काढतात. अनेक प्रयत्न करूनही आपण भारतात ऑलिव्हची लागवड वाढवू शकलेलो नाही. त्यामुळे भारतात आधुनिक सौंदर्यप्रसाधने बनवून ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकायची तर आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह तेल आयात करावे लागले असते.

vegetable oil
Farmer Producer Company : जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवलेली ‘ओम गायत्री’ कंपनी

या सर्व समस्यांवर भारतीय तंत्रज्ञांनी एक यशस्वी तोडगा काढला. आणि तो होता तेलातील मेदाम्ले वेगळी काढून ती विकण्याचा. आपल्या उद्योगाला लागणाऱ्या तेलात कोणती मेदाम्ले किती प्रमाणात असतात हे माहिती असल्याने आपल्याला हवे असणारे तेल बाजारात उपलब्ध होण्याची वाट न पाहता आपल्याला पाहिजे ती मेदाम्ले खरेदी करायची आणि त्यांचा वापर करून आपल्याला पाहिजे तो पदार्थ बनवायचा, ही नवी उत्पादनपद्धती भारतात रूढ झाली. मेदाम्लांना मार्केट उपलब्ध झाल्यामुळे विविध अखाद्य तेलांतून आणि प्राणिजन्य चरबीतूनही मेदाम्ले शुद्ध स्वरूपात वेगळी काढणे हा एक नवा उद्योग भारतात सुरू झाला.

वर दिलेली माहिती मला ज्ञात होण्याचे कारण असे होते, की मी सन १९७० पासून ऑइल टेक्नॉलजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा सभासद आहे. १९७०च्या दशकात वरील तंत्र विकसित झाले आणि ते भारतात मोठ्या प्रमाणात वापरलेही जाऊ लागले. त्या वेळी आमच्या तंत्रज्ञांना असे वाटू लागले, की आपण या तंत्राचा अन्य देशांमध्ये प्रचार करावा.

त्यानुसार आमच्या असोसिएशनने काही विकसनशील देशांमधील २० तैलतंत्रज्ञांना आपल्या खर्चाने भारतात आणले आणि त्यांना भारतातील विविध कारखाने दाखविले. त्यानंतर त्या सर्वांची दिल्लीत एक सभा घेऊन त्यांना भारतातल्या तैलतंत्रातून काय शिकायला मिळाले, हे त्यांच्याकडून वदवून घेतले. व्यासपीठावरून बोलताना प्रत्येकाने भारतीय तंत्रज्ञांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. ती ऐकताना आम्हा प्रेक्षकांना अगदी धन्य वाटले.

vegetable oil
Sugar Export : साखर कराराबरोबर पाठवणीलाही वेग

त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला. भोजनाच्या वेळी माझ्या शेजारी एक इजिप्शियन तंत्रज्ञ बसला होता. त्याला मी त्याचे खरे मत विचारले. तो म्हणाला, की तो व्यासपीठावरून जे बोलला ते तर त्याचे खरे मत होतेच, पण त्याला भारताबद्दल खरे कौतुक वाटले ते वेगळ्याच एका गोष्टीचे. ती गोष्ट अशी होती, की भारतात त्याने जेवढे कारखाने पाहिले त्या सर्व कारखान्यांमधली यंत्रे भारतीय बनावटीची होती.

इजिप्तमधील सर्व यंत्रसामग्री परकीय बनावटीची असते आणि त्यामुळे त्यांना प्रचंड गैरसोयींना तोंड द्यावे लागते. लहानसहान बिघाड झाला तरी परदेशांतून तो विशिष्ट पार्ट घेऊन कंपनीचा मेकॅनिक येईपर्यंत कारखाना बंद राहतो. कित्येक वेळा १५-१५ दिवसांचा खोळंबा होतो. त्या पार्टची किंमत आणि दुरुस्तीची फी तर द्यावी लागतेच, पण त्या मेकॅनिकचे विमानभाडे व हॉटेलभाडेही द्यावे लागते.

त्याचे म्हणणे होते, की त्याने भारतात ज्या ज्या कारखान्यांना भेटी दिल्या त्या प्रत्येक कारखान्यात त्याने या विषयावर चर्चा केली. त्या वेळी सर्व भारतीय व्यवस्थापकांनी त्याला सागितले, की आम्ही फोन केल्यावर काही तासांत मेकॅनिक तो पार्ट घेऊन येतो आणि बिघडलेले मशिन दुरुस्त करून जातो. त्यामुळे यांत्रिक बिघाडामुळे त्यांचा कारखाना कधीच एक दिवसाच्या वर बंद राहत नाही. आपल्या कारखान्यात स्वदेशी यंत्रसामग्री बसविण्याचा असा फायदा होतो, हे मलाही त्या वेळी पटले.

: ९८८१३०९६२३

(लेखक ‘आरती’चे (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्‍वस्त आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com