
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तसेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी बुधवारी (ता.१०) सकाळी वैजापूर तालुक्यात दाखल झाले.
पायथा ते माथा नियमानुसार आधी गंगापूर तालुक्याला पाणी सोडण्यात येईल. त्यानंतर वैजापूर व कोपरगावला पाणी देण्यात आले आहे. हे आवर्तन २१ दिवस सुरु राहील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
उन्हाचा तडाखा वाढल्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदुरमधमेश्वर कालवा क्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्याची व सिंचनासाठी तीव्र टंचाई जाणवत आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. पिकेही पाण्याअभावी सुकून जाण्यास सुरवात झाली होती.
त्यामुळे आवर्तन सोडण्याची मागणी लाभ क्षेत्रातील ग्रामपंचायतीकडून व शेतकऱ्यांकडून सुरू होती. स्थानिक पाटबंधारे विभागाने नाशिक पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.९) सकाळी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून पाणी सोडण्यात आले.
बुधवारी (ता. १०) सकाळी वैजापूर तालुक्यात पाणी दाखल झाले. या आवर्तनातून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तिन्ही तालुक्यांतील १०२ गावांना १.२ टीएमसी पाणी मिळेल.
१०० पेक्षा अधिक गावांत तीव्र टंचाई
लाभ क्षेत्रातील जवळपास १०० पेक्षा अधिक गावांत पिण्याचे पाणी व सिंचनासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे येथील ग्रामपंचायत सरपंच व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार रमेश बोरणारे यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे व पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना भेटून आवर्तनाची गरज व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी आदेश देताच अखेर मंगळवारी (ता.९) सकाळी पाणी सोडण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.