
Kolhapur Water News : यंदा आजमितीस राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी धरणांत गतवर्षीच्या तुलनेत साडेसहा टीएमसी कमी पाणीसाठा (Water Stock) आहे. सात वर्षांनंतर यंदा या धरणांतील पाणीसाठा नीचांकी ठरला आहे.
मात्र उपलब्ध पाणीसाठा वापराच्या काटेकोर नियोजनामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी तुटवड्याची शक्यता नसल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केला आहे.
शेती व पिण्यासाठी मे आणि जून अखेरपर्यंत सध्याचा पाणीसाठा पुरेसा आहे. तरीही अल-निनोच्या प्रभावाने मॉन्सून लांबण्याच्या अंदाजाने परिस्थितीनुसार पाणी वापराच्या नियोजनात बदल करावे लागणार आहेत.
सर्वाधिक कमी म्हणजे १७.७७ टक्के (४.२६ टीएमसी) पाणीसाठा काळम्मावाडी धरणात आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ९.८९ टीएमसी पाणीसाठा होता.
राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा जवळपास एक, तर ‘तुळशी’त अर्धा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. ‘राधानगरी’त ३४.५९ टक्के, तर ‘तुळशी’त ४२.६३ टक्के पाणीसाठा उरला आहे.
यापूर्वी २०१६ मध्ये या धरणांत मे महिन्यात कमी पाणीसाठा होता. त्यावेळीही पाणी वापराच्या नियोजनातून संभाव्य टंचाईवर जलसंपदा विभागाने मात केली होती. यंदाही पावसाळा सुरू होईपर्यंत तिन्ही धरणांच्या लाभक्षेत्रातील पाणीटंचाई सावट दूर करण्यास जलसंपदा विभागाची कसोटी लागणार आहे.
पाणीटंचाईच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल
पावसाळा लांबल्यास राधानगरी तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता अधिक आहे. याचा सर्वांत मोठा फटका या तिन्ही नद्यांच्या काठावरील ऊस पिकांना बसणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
आधीच उपसाबंदी व पाळी पत्रक असल्याने पिकांना उशिरा पाणी मिळत आहे. अशात टंचाई निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. यामुळे शेतकरी आतापासूनच हवालदिल झाला आहे.
धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती - १ मे २०२३
राधानगरी - २.६९ टीएमसी
काळम्मावाडी- ४.२६ टीएमसी
तुळशी - १.३८ टीएमसी
१ मे २०२२
राधानगरी - ३.८० टीएमसी
काळम्मावाडी - ९.८९ टीएमसी
तुळशी - १.९१ टीएमसी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.