Childhood : बालपणीची श्रीमंती...

बालपणीचा काळ सुखाचा म्हणत आपण वाचू लागतो मुलांचे निबंध आणि तिथेच शोधू पाहतो आपलं हरवलेलं बालपण. खरं तर प्रत्येकाचंच नव्हतं बालपण सुखाचं वगैरे. बऱ्याच जणांचं गरिबीतच होतं करपलेलं.
childhood
childhoodAgrowon

राजेंद्र उगले

बालपणीचा (Childhood) काळ सुखाचा म्हणत आपण वाचू लागतो मुलांचे निबंध आणि तिथेच शोधू पाहतो आपलं हरवलेलं बालपण. खरं तर प्रत्येकाचंच नव्हतं बालपण सुखाचं वगैरे. बऱ्याच जणांचं गरिबीतच होतं करपलेलं. असं असलं तरी ते वाटायचं सुखाचं. आपल्याला आजही आठवतात काही आठवणी आणि आपण जातो हरखून. बालपणात सुख होतं असं वाटायच्या कारणांचा घेऊ लागतो आपण शोध आणि सापडत जातात कितीतरी गोष्टी.

childhood
Onion Cultivation : रोपांच्या टंचाईमुळे उन्हाळ कांद्याच्या तुरळक लागवडी

आपल्याला आठवतं - चार मित्र... एकच गोळी आणि ती ज्याची आहे त्यानेच त्याच्या दातांनी केलेले तिचे चार तुकडे! आपल्याला नाही वाटली किळस त्याने दिलेला गोळीचा छोटासा तुकडा खाण्यात किंवा नाही झाले त्याच्यापासून इन्फेक्शन वगैरे. एखाद्या मित्राने घेतला असेल नवा ड्रेस तर आपल्यालाच व्हायचा आनंद आणि आपण सांगायचो त्याला, ‘मीही घेणार आहे असाच... मामाच्या गावाला गेल्यावर.’ पुढे नाही घेता आला तरी त्यावाचून नाही आपलं कधी काही अडलं. आपलं बालपण रम्य होतं की नाही ते नाही माहीत; पण श्रीमंत मात्र नक्कीच होतं.

आपल्याकडे स्वतःचा असा समुद्र नव्हता, नदी नव्हती पण आपल्याकडे पाच-सहा तरी शिडाच्या होड्या होत्या. त्या सोडून द्यायचो आपण अंगणात साठलेल्या पाण्यात. शाळेतल्या अभ्यासासाठी पुरेशा वह्या किंवा पुस्तकं नव्हती पण रोज एक विमान असायचं आपल्या मालकीचं. कागदाचं असलं म्हणून काय झालं...! अभ्यास इतरांच्या मानाने कमी असेलही, पण तरीही होती आपल्याकडे शाळेतल्या एखाद्या जबाबदार मंत्रिपदाची धुरा.

childhood
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

मध्यान्ह भोजन नावाचे काही नव्हते शाळेत पण फडक्यात बांधलेली भाकरी आणि त्यावरचा लाल मिरचीचा गोळा वाटून खाण्यातही होता उच्चकोटीचा आनंद. शिक्षक फिरायचे व्हरांड्यात आपली पंगत बसल्यावर आणि कधीतरी खाऊन पाहायचे आपल्या फडक्यातली भाकर. त्यांना जायचा ठसका... आपल्या परिस्थितीचा आणि त्यानंतर झालेल्या एखाद्या स्पर्धेत आपल्या गरजेचंच मिळायचं बक्षीस-वही, पेन किंवा कंपासच्या रूपात.

आपला खुलायचा चेहरा. आज या कोणत्याच गोष्टींची नाहीये कमतरता. तरीपण का आठवत राहतं बालपण? कारण त्या वेळी आपल्याजवळ असलेली एक गोष्ट आज हरवलीय आणि ती म्हणजे समाधान! आपल्याला वेगळाच काही जडलाय का आजार? शोध घेऊन लवकर व्हायला हवे बरे. लोक काय म्हणतील या भीतीला फाट्यावर मारून! घ्यायला हवा मोकळा श्वास आतल्या लहानग्यासाठी. आपल्याला लाभो आपल्या बालपणीची श्रीमंती, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com