फिरस्तेही झाले कमी

गेल्या सुमारे सव्वाशे वर्षामध्ये गावोगावी फिरणाऱ्या फिरस्ते लोकांमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झालेला आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात फिरस्ते असणाऱ्या लोकांचे दोन मुख्य प्रकार पडतात.
फिरस्तेही झाले कमी
FirasteAgrowon

शेखर गायकवाड

गेल्या सुमारे सव्वाशे वर्षामध्ये गावोगावी फिरणाऱ्या फिरस्ते (Firaste) लोकांमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झालेला आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात फिरस्ते असणाऱ्या लोकांचे दोन मुख्य प्रकार पडतात. काही फिरस्ते लोक पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटी प्रमाणे ठरावीक तिथीला गावांमध्ये जात होते व त्या प्रत्येक गावांमध्ये राहण्याचा कालावधी निश्‍चित असायचा. अशा फिरस्ती लोकांना ‘वतनदार फिरस्ते’ असे म्हणायचे. त्याउलट जे फिरस्ते नेमलेल्या गावी ठरावीक दिवशी न जाता स्वतःच्या सोयीप्रमाणे कुठे चार पैसे मिळतील असा विचार करून वाटेल त्यागावी फिरायचे त्यांना ‘उपलाणी फिरस्ते’ असे म्हणायचे. हळूहळू या फिरस्ती लोकांची संख्या गेल्या ३०-४० वर्षांत कमी झालेली आहे.

राज्यात विशेषतः सुगीच्या काळात पांगळे, कुडमुडे जोशी, रक्तपित्ये, आंधळे, बैरागी, पोतराज, गोसावी, राऊळ, कातकाडी, हरदास, बंजारा, गोपाळ, मदारी, गारुडी, लमाण, कंजारी, बेलदार, घिसाडी, वैदू, कैकाडी, वडार, कोल्हाटी, गोपाळ, गोंड, जोगतीण, कुंचीकोरवे, नंदीबैलवाले, आराधी, वाघ्या-मुरुळी, दरवेशी, गारोडी, माकडवाले, बहुरूपी, भुत्या, भगत, भोप्या, पांगुळ, कानफाटे, ठोके जोशी, भराडी, वासुदेव, सुप हलव्या, कबीरपंथी, नाथपंथी, अघोरी, उदासी, जोगती, चित्रकथी, नेमाडतील, मेवाती, फासेपारधी, रायनंद, हिजडे, मानभाव, संन्यासी, जती, मापे, गोसावी असे असंख्य प्रकारचे फिरस्ते पोट भरण्यासाठी गावोगावी फिरत. याशिवाय बाहेरून येणारे फकीर, सिद्धी, अफगाणी, बलुची हे सुद्धा लोक अधून-मधून दिसत असत.

बेलदार ही जमात विहिरींची, घरांची किंवा झाडाखाली पाल बांधण्याची इत्यादी दगडांची कामे करत. प्रत्येक घराला लागणारे उखळ, पाटा-वरवंटा, चौरंग इ. दगडी वस्तू विकायचे किंवा जाते काढून त्याला छन्नीने ठोकून टाके लावत असत. शेतकऱ्याला लागणारा नांगराचा फाळ, विळे, खुरपी, कुदळी आणि बैलगाडीला धावा बसवायचे काम घिसाडी करत असत. विहिरी खेादणे, मातीकाम करणे, पाटे-वरवंटे, उखळ विकायचे काम वडार करत असे. बहुतेक वेळा या सर्व जमातीबरोबर गाढवे, बकरे, कोंबड्या, कुत्री असत. कैकाडी समाजाचे लोक करंजी, तडवड इत्यादी झाडांचे फोक काढून कोंबड्याचे झाप, कणगी इत्यादी वस्तू बनवत असत. माकडवाले ही कैकाड्यांची पोट जात आहे. शेतकऱ्यांच्या बायकांना गोंदायचे काम आणि सुपे, टोपली विकायचे काम यांच्या बायका करीत असत. भराडी, गोंधळी, वाघ्या-मुरुळ्या हे देवतांची गाणे किंवा पोवाडे गाऊन लोकांचे मनेारंजन करीत असत. आराधी जोगती आणि जोगतीण हे देवीच्या नावाने भीक मागत.

मागत. पोतराज हा मरीआईचा देव्हारा घेऊन घरोघरी फिरायचा. नंदीबैलवाले कुडमुडे जोशी, पांगुळ आणि ठोके जोशी हे नंदीबैलाला शिकवून व गुबुगुबु वाजवून धान्य आणि वस्तू मागायचे. कुडमुडे जोशी हे कुडमुडे वाजवायचे. वासुदेव टाळ-चिपळी वाजवायचा, मदारी गारुडी हे सापाचा व नजरबंदीचा खेळ करायचे. गोपाळ, डोंबारी, कोल्हाटी हे कसरतीचे खेळ करायचे, बहुरूपी हे ना-ना प्रकारचे रूप घेऊन सोंग घेऊन धान्य आणि पैसे मिळवत.

या सर्व भटक्या जमातीचे पाल सुद्धा वेगवेगळे असायचे.पूर्वीच्या काळी पोलिस पाटलाच्या परवानगीने हे भटकणारे लोक राहत असत. एकाच गावांत राहून आजूबाजूच्या गावांमध्ये फिरत असत. चोरी करणारे लोक पकडले जाऊ नयेत म्हणून ज्या गावात उतरले आहेत, त्या गावात चोरी न करता इतर गावांमध्ये चोऱ्या करत असा शेतकरी सातत्याने आक्षेप घेत. बायका दिवसभर गावामध्ये फिरून सरपण व चारा गोळा करत.

फिरस्ते लोकांची गुरे शक्यतो शेतकऱ्यांच्या हाताला लागत नसत. परंतु बांधावर चालता-चालता अशी गुरे शेतात जात असत. एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाले म्हणून शेतकरी जनावरे कोंडवाड्यात घेऊन जायला लागला, तर बायका-मुले रडून शेतकऱ्याला गोंधळात टाकत.१९४०-५० नंतर हळूहळू शहरीकरण वाढले व गावोगावी फिरणारे हे लोक कमी होऊ लागले. शेतकरी पण जागरूक झाला. खळे व खळ्याची जागा नांगरली गेली व कणसे काढून छोट्या मशिनने धान्य तयार करून व लगेच पोत्यात भरून आणायला सुरुवात झाली.

पारंपरिक जाती-जमाती या पूर्णपणे पोटाची खळगी भरण्यासाठी शेती व शेतकऱ्यांवर अवलंबून होत्या. आता मात्र रस्ते चांगले झाल्यामुळे, तालुक्याच्या ठिकाणी राहून सायकल किंवा मोटार सायकलने व्यवसाय करणारे आधुनिक फिरस्ते दिसतात. शहरामध्ये बनणाऱ्या आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणारे लोक आता वाडी- वस्तीवर फिरतात. त्यामध्ये गंगावन, सुया-पोत विकणारे, गारेगार कुल्फी विकणारे, ब्रेड-बटर, अंडी विकणारे, ॲल्युमिनियमची भांडी, स्टीलची भांडी, लहान मुलांची खेळणी, प्लॅस्टिकची खेळणी, किचनमध्ये वापरली जाणारी छोटी यंत्रे विकणारे कल्हई करणारे, सुऱ्या, चाकूला धार करणारे फिरस्ते दिसतात.

कमीत-कमी वेळेत दहा-पंधरा वाडी-वस्त्यांना जाणारे फिरस्ते आता रोखीचा व्यवहार करतात. काही गावांमध्ये तर पिण्याचे पाणी आर.ओ प्लॅन्ट वरून भरून आणून २० लिटर कॅनमध्ये छोट्या टेंपोमधून विकले जात आहे. शहरातून खेड्यात पिण्याचे पाणी विकले जाईल असा विचार ५० वर्षांपूर्वी कुणाच्या मनामध्ये आला नसता. शेतकऱ्यांना फिरस्त्यांद्वारे मिळणाऱ्या घरपोच सेवा बंद झाल्या आहेत, परंतु शेतीवर पडणारा फिरस्त्यांचा भार हा शेकडो वर्ष चाललेला अप्रत्यक्ष कर कमी झाला आहे, असेही म्हणता येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com