सोयाबीनसाठी मूल्य साखळी होणार

सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास कार्यक्रम सन २०२४-२५ पर्यंत सुरू राहणार आहे. उत्पादकता वाढ, शेतकऱ्यांची क्षमता बांधणी, बियाणे साखळी बळकटीकरण व मूल्याची वाढ आदी घटकांचा यात समावेश आहे.
सोयाबीनसाठी मूल्य साखळी होणार
SoybeanAgrowon

गडहिंग्लज : यंदापासून सलग तीन वर्षे कमी उत्पादकतेची गावे निवडून एक हजार हेक्टर क्षेत्रातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीनचे उत्पादन वाढविण्यावर भर दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात येणार असून, कृषी विभागाने यात पुढाकार घेतला आहेत. या वर्षी त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ‘उत्पादन वाढ-प्रक्रिया-मार्केटिंग’ अशा साखळीतून सोयाबीनचे मूल्य वाढविण्याचा प्रयत्न या मोहिमेतून होणार आहे.

सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास कार्यक्रम सन २०२४-२५ पर्यंत सुरू राहणार आहे. उत्पादकता वाढ, शेतकऱ्यांची क्षमता बांधणी, बियाणे साखळी बळकटीकरण व मूल्याची वाढ आदी घटकांचा यात समावेश आहे. उत्पादन वाढविण्यासह शेतकऱ्यांना सोयाबीनवरील प्रक्रियेसाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे.

पहिल्या वर्षी गडहिंग्लज तालुक्यात सोयाबीनची कमी उत्पादकता असलेल्या १४ गावांतून ३०० हेक्टरची निवड केली आहे. पुढील दोन वर्षांत तालुक्यातील उर्वरित ७०० हेक्टर क्षेत्रात ही मोहीम राबविली जाईल. तीन वर्षांत एक हजार हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम होईल. प्रत्येकी शंभर हेक्टरमागे एक अशा एकूण दहा शेतकऱ्यांचा समूह तयार करून त्यांच्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यात येईल.

या कंपनीला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून अर्थसाह्यासह विविध योजनांचाही लाभ मिळेल. निवडलेल्या १४ गावांत कृषी विभाग १२ शेतीशाळा, १५० शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम घेणार आहे. तीन कृषी प्रवर्तकांची नेमणूकही केली जाईल. हंगामात दोन शेतकरी प्रशिक्षण होतील. सोयाबीनला साठवणूक सुविधा उपलब्ध करणे, शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे, उत्पादक कंपनी बळकट करणे, कंपनीला वायदेबाजाराशी जोडणे, प्रक्रियाधारकांना चांगल्या दर्जाचा माल देणे ही उद्दिष्टे कार्यक्रमाची आहेत.

यामुळे वाढणार ‘व्हॅल्यू चेन’

सध्या सोयाबीन उत्पादनानंतर शेतकरी थेट व्यापाऱ्यांकडे जाऊन विक्री करतो. आता नव्या योजनेत समाविष्ट शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतील. त्यावर प्रक्रिया करून कंपनीतर्फे बाजारपेठेत त्याची विक्रीही शेतकरीच करतील. यामध्ये कुठेही व्यापारी आणि दलाल असणार नाहीत. यामुळे सोयाबीनचे मूल्य वाढण्यास मदत मिळेल.

उत्पादनाचे टार्गेट

निवडलेल्या १४ गावांमध्ये सोयाबीनचे उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत आहे. योजनेतील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवून ही उत्पादन क्षमता हेक्टरी १६ ते १७ क्विंटलपर्यंत नेण्याचे टार्गेट आहे.

निवडलेली गावे

कडगाव महसूल मंडळांतर्गत कडगाव, करंबळी, शिप्पूर, अत्याळ, बेळगुंदी, लिंगनूर, बेकनाळ, तर नूल मंडळातून नूल, खणदाळ, अरळगुंडी, चन्नेकुप्पी, तनवडी, खमलेहट्टी, हणमंतवाडी या कमी उत्पादकतेच्या गावांची यंदाच्या पहिल्या टप्प्यात निवड केली आहे.

योजनेत समाविष्ट होण्यासाठी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ४५० शेतकऱ्यांनी सहभाग दर्शविला आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्यासह उत्पादकता वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल. निवडलेल्या गावातून १० ते १५ टक्क्यांनी उत्पादन वाढविण्याचे लक्ष्यांक आहे.

अनिल फोंडे, तालुका कृषी अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com