Kalpna Dhudhal : या गोष्टींचा मेळ तर घातला पाहिजे !

अगं त्याला ताक आवडतं तर घरी करून दे की. दुधाला ऊत आलाय घरात तरी ही पोरं पाण्यासारखं ताक इकत आणतेत. ते कधीचं असंल, कसलं असंल. घरचं कसं ऐकंल इकतच्याला.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

- कल्पना दुधाळ

जनाई ओट्यावर बसली होती. हातात काहीतरी लपवत तिचा नातू तिथून जोरात पळत घरात गेला. जनाई त्याला आडवत म्हणाली, दाखव रे काय आणलंय. काय लपवतोय दाखव दाखव. 

तिला चुकवून नातू थेट स्वयंपाकघरात पोचला. घाईघाईनं झाकण काढून बाटली तोंडाला लावली. घटाघटा पित होता. तोपर्यंत मागून जनाई स्वयंपाकघरात पोचली, काय रे काय पितोस ढसाढसा आं ?

काही नाही आजी, काही नाही, म्हणत शर्टाच्या बाह्यांना तोंड पुसत नातू पुन्हा धुमाट बाहेर. जनाईनं ओळखलं. म्हणाली, काय बाई बाटल्याच्या बाटल्या ताक आणून पितेत लेकरं. फुकट वाटतोय का त्यो दुकानदारबाबा. बघा जरा बघा. लेकरांना दापा. 

Rural Development
Kalpna Dudhal Article: एक दिवस तिचा

अहो आई, जाऊ द्या. ताक आणलं त्याने आत्ता. आवडतं ना त्याला, सूनबाई म्हणाली

अगं त्याला ताक आवडतं तर घरी करून दे की. दुधाला ऊत आलाय घरात तरी ही पोरं पाण्यासारखं ताक इकत आणतेत. ते कधीचं असंल, कसलं असंल. घरचं कसं ऐकंल इकतच्याला.

त्याला विकतचंच आवडतं. घरी केलेलं नाही आवडतं.

 सूनबाईचं बोलणं ऐकून जनाईला राग आला, काय बाई, ऐकावं ते नवलंच वाटतं मला. आईनं म्हणायचं घरचं आवडत नाय. लेकरं आणतेत इकत. घरी करायचा ताप नको. आम्ही कधी कालचं ताक आज खाल्लं नव्हतं का पोरांना दिलं नव्हतं. हे ताक करून बाटल्यात कधी भरलंय, कधी नाय. असलं पिवून दुखन्यानी ज्याम व्हायची लेकरं.

अहो आई, काही पण कसं बोलता तुम्ही ? 

काही पण कसं. खरं तेच बोलतेय मी.

पाय आपटत सूनबाई निघून गेली. जनाई बडबडत पुन्हा ओट्यावर येऊन बसली. असं ब-याचदा घडतं. ताकाच्या जागी दुसरं काहीतरी असतं, पण तेढ हीच.

 जनाईचं म्हणणं काही अगदीच चुकीचं नसतं. तिच्या डोक्यात तिचे दिवस असतात आणि ते आजही तसेच असावेत असं तिला वाटतं. पण त्या दिवसांचा या दिवसांशी मेळ काही बसत नाही.

थोड्यावेळाने कुल्फीवाला आला. प्रत्येकाला दहा दहा रूपायाच्या कुल्फ्या. गेले शंभर रुपये. जनाईचा जीव वरखाली. लेकरांचा नाद असतो म्हणून कुल्फीचा विषय थांबतो ना थांबतो की, जनाईचा मुलगा आला. गाडी दारात उभी करायच्या आधीच लेकरं त्याच्याकडे पळत आली, 

पप्पा पप्पा कॅडबरी आणली का ? 

आणली की. ही घ्या.

लेकरांनी कॅडबरीला हातपण लावला नाही. पसरलं भोकाड- इवढूशी नाही पप्पा. सगळ्यात मोठ्ठी आणायला सांगितली होती ना तुम्हाला. आम्हाला तसलीच पाहिजे.

अरे तसली संपली होती दुकानातली.

नाही संपत तसली. तुम्ही खोटं बोलताय. आम्हाला तसलीच पाहिजे म्हणजे पाहिजे. आत्ताच्या आत्ता, लग्गेच पाहिजे.

मुलानं गाडी वळवली. कॅडबरी आणून दिली तेव्हा लेकरं गप बसली. 

जनाई बघत होती. म्हणाली, दाताचं वाटोळं होईल तव्हा कळंल तुम्हाला. दात कीडलं की पुन्हा दवाखान्यात पैसं ओतून यायचं. आधी गुळमाट खायला आणायला पैसं घालवायचं मग त्ये नीट करायला घालवायचं.

जनाई रूपायाच्या पाच गोळ्या पाच लेकरांना आणायची. तेवढ्यावर लेकरं उड्या मारत जायची. आता शंभर रूपायाची एकालाच. जनाई बाहेर ओट्यावर जाऊन बसली पण लक्ष घरातच. सूनबाई नव-याला घरात लागणा-या सामानाची यादी सांगत होती. ते ऐकून पुन्हा जनाईची स्वतःशी बडबड चालू होती- सारखं हे आणा ते आणा. घराचा बाजार केलाय नुसता. शांपू साबणाला उत आलाय तरी आणाच. घरातलं सामान संपायच्या आधी डबं भरून ठेवायचे. कापडं कपाटात मावंनात तरी आम्हाला कपडे नाहीत, आम्हाला कपडे आणायचेत. आता ग बया त-हा नाय राह्यली यांची. आणू आणू ढीग घाला ढीग. पाण्यासारखा पैसा घालवतेत. अशानं संसार होत असतो का ?  पैसा पैसा केलं तरी आम्हाला पैसा बघायला मिळत नव्हता. आता पैशाला किंमत नाय राहिली बया. 

कालपण जनाई म्हणत होती, रानात पाणी बदलायला गाड्या घेऊन कधी जायचं का कुणी ? पेंडीभर वैरण आणायची तर कुणी चालत जाईना. ह्या इथनं तिथवर जायचं म्हणलं तरी गाड्या पाहिजेत आता. गाडीला तेल फुकट येतंय का, गाडी पाण्यावर पळती ? अजिबातच चालायला नको म्हणतेत माणसं. गाड्या पाहिजेत त्यांना गाड्या. एवढं सरपणाचं ढीग पडलेत. कुजून चाललेत जाग्यावर. पण घरात सगळा सैपाक गॅसवर. गॅसच्या टाक्या फुकट मिळतेत का ? 

पोरं टीव्ही बघताना दिसली की पुन्हा जनाईचं चालू होतं, ढीगानं पुस्तकं पोरांला आणायची. पण पोरं टीवीपुढनं हलतेत का बघा. पुस्तकं उघडूनसुद्धा बघत नायीत. एका म्होरं एक बसून टुकूटुकू टीवी बघतेत. त्यो रिमोट का काय म्हणतेत त्याच्यावरनं चढाओढ नुसती. तुला मिळतोय का मला मिळतोय त्याच्यावरनं कळवंड यांची. टीवी झालं की मोबाईल घेऊन बसतेत. काय त्यांचं त्यांला कळत असंल ते असू.

मग घरातलं कुणीतरी म्हणतं, म्हाता-या माणसानं, गप बसावं की जरा. सारखं कुरकूर करायची. उगं डोकं फिरवायचं. ऐकतंय का कोण बोललेलं ?

माझं कशाला कोण ऐकतंय, माझी लाकडं पोचली मसनात, म्हणत जनाई रागानं उठून शेजारीपाजारी तिच्या वयाच्या कुणापाशी तरी मन मोकळं करायला जाऊन बसली. तिथं तिच्यासारखी काही मंडळी भेटतात. वयानं सारख्याला वारखी. त्यातलं लिलाकाकू, राधाक्का, सखूमावशी, अंजूबाई अजून कुणी कुणी असतात. कुणीतरी कड घेतं, कुणी समजावतं, कुणी आपापले अनुभव सांगतं. त्यात लिलाकाकू बोलकी बाहूली. जनाईला म्हणाली,

कुणाचं काय मनाला लावून घ्यायचंय आता. आपलं चार गेलं दोन राहिलं. आपण जोडला पैशाला पैसा. आपला संसार इथवर आणला. काय वाईट झालं का आपलं जनाई ? आता त्यांचा संसार त्यांच्या मनानं करून द्यायचा. आपल्याला उधळपट्टी माहीत नव्हती. मूठचिमटीत जीव आडकायचा आपला. काटकसर करायची. इलाजच नव्हता दुसरा. जरा पैशाला हात ढिला झाला की आमची सासू म्हणायची, कानी ना केसी काकणं, चोळीला पैसं नासी. 

सखूमावशी पण येऊन गप्पात मिसळली, काय मग लै निवांत दिसताय आज.

आम्ही निवांतचय की. आम्हाला काय इकडचा डोंगर तिकडं करायचाय का ?

जवा करायचा तव्हा नाही केला. इथं बसली जागा उठवंना. आता डोंगर हलत असतोय का, राधाक्काचं आपलं कण्हतकुथत बोलणं चालू असतं.

आताची माणसं डोंगर हलवणारी. आपलं काय तेव्हा ? त्यांच्या सवडीनं सगळी कामं होतेत. निवांत. तुम्हाला सांगते, घरचं सगळं उरकून दिवस उगवायला आम्ही कामाला लागलेलो असायचो. आता यांचं बघा, सगळं जिथल्या तिथं असून घरचं उरकायला बारा वाजतेत. मग रानात जायचं कधी, कामं करायची कधी ? इळनमाळ घरी न् चिमणी लावून दळण करी. अशी त-हाय यांची, अंजूबाईचं हे निराळंच गा-हाणं.

लिलाकाकू म्हणाली अंजूबाई, होय खरं झालं. आता आपलं मागचं उकरून काय फायदा ? आपली कुरकुर ऐकून आता घरातली माणसं आपल्याला टाळतेत. त्याचा पुन्हा आपल्याला राग येतो. आपल्याला वाटतं, बघा आमचं ऐकून न ऐकल्यासारखं करतेत. म्हाता-या माणसांना किंमत नाही राहिली घरात.

पाठीमागे हात टांगून येरझाऱ्या घालणारे घुगेगुरूजी यांचं बोलणं ऐकून चालता चालता थांबले, घर्षणाने उष्णता निर्माण होते हा विज्ञानाचा नियम. पण माणसांच्या दोनतीन पिढ्या एकत्र आल्या की कशावरून ना कशावरून खटके उडतात हापण एक कौटुंबिक नियम आहे बरंका. जुन्या माणसांची काटकसरीची सवय सुटत नाही. त्यांना घरातली उधळपट्टी पहावत नाही. कितीही गप्प बसायचं ठरवलं तरी काही ना काही घडतं आणि मग तुम्ही असं एकमेकींना सांगत बसता. तुमच्या मेंदूला गरीबीच्या, काटकसरीच्या चिकटपट्टया जाम चिकटल्यात बघा. त्या निघता निघत नाहीत म्हणून हा प्रॉब्लेम  येतो.

आवो गुरुजी तुम्ही म्हणता आमच्या मेंदूला चिकटपट्टया चिकटल्या आणि बाकिच्यांच्या गळून पडल्या काय वो ?

तसं नाही जनाई, आता काय पहिल्यासारखं राहिलंय का ? जग किती बदललंय बघा. घरातला कारभार एका पिढीच्या हातातनं दुसऱ्या पिढीच्या हातात गेलाय का नाही. परिस्थिती थोडीफार सुधारली. घरात पैसा आला. नुसता पैसा आला का ? तर नाही. तो आपल्याबरोबर किती काय काय घेऊन आला. पैशानं सगळ्यात आधी कमवत्याला गर्व आणला. ताठपणा आणला. मागून हळूहळू घरात गर्वाच्या वस्तू येऊ लागल्या. वस्तूंचा लळा लागला. माणसांचा कमी झाला. टीव्हीनं कोणती वस्तू कशासाठी वापरायची, कशी वापरायची, ती वापरल्यानं तुम्ही कसं सुधारता हे घरोघरी शिकवून काळ लोटला बघा आता. त्या त्या वस्तूंची आपल्याला इतकी सवय झाली की कधीकाळी आपल्याला हे माहीतपण नव्हतं हे खरं वाटत नाही. पटत नाही. 

 होय बाई, त्या टीवीचं काही सांगू नका. बारक्या पोरांचं तर किती काय काय. हौसेला मोल नसतं म्हणायचं. गरज नसलेलं किती काय काय घरात आलंय. आधी काय असलंच होतं का ? उगं जरा काही झालं की हे आणा, ते लावा आणि मग बघा. निमताळ्याला दूक झालं न् चोळून चोळून लाल केलं.

बारकाईनं विचार केला तर लक्षात येतं, या जाहिराती आपल्या घरात तर घुसल्याच पण मनातही घुसल्या. एखादी विशिष्ट वस्तू आपण वापरली नाही, आपल्या घरात नसली तर आपण मागासलेले ठरणार, असं आपलं मन आपल्याला सांगतं. मग ते घेणं भाग पडतं, गुरुजी सांगत होते. निसर्गाच्या आधारानं जगण्याचा एक काळ होता. कोरडवाहू शेतांसारखी माणसं पण  कोरडवाहू होती. मर्यादीत पैसा यायचा. रखरखीत दिवस होते. एखादी गाय, म्हैस शेरडूकरडू दारात असायचं. जुने लोक घरात पोत्याची थप्पी आणि दावणीला भरपूर जित्राबं असलेल्या घरात सोयरिक जुळवायचे. 

लिलाकाकूचा आवडता विषय निघाला, आता मुलाच्या घरी शेती तर पाहिजे असते पण शेती करायची इच्छा नसते. दारात जित्राबं दिसली की मुलीला शेणझाडलोट करायला लागेल ही भीती. घरात माणसं जास्त असली की मुलीला स्वयंपाक जास्त करायला लागेल. नाही जमणार. घरची परिस्थिती हालाखीची. नको पोरीला कामं जास्त पडणार. अंगी नाही करणी न् मला म्हणा तरणी, अशी त-हाय आताची. 

सगळे हसले. आता जे चाललंय त्यात सामिल व्हायचं. नाहीतर बसा एकटंच मागचं उकरत.

होय होय. मोडंन पण वाकणार नाही, हा स्वभाव माणसाला एकटं पाडतो, एकाकी करतो. आपले उरलेले दिवस कुरकुरण्यात घालवण्यापेक्षा जरा समजूतीनं घ्यावं. काहीकाही माणसं बघा कसं सगळ्यांत मिळून मिसळून राहतेत. त्यांच्या मेंदूच्या चिकटपट्टया सैल असत्यात म्हणायचं. त्यांना नवं ते पाहिजे असतं. 

गुरूजी सांगत होते, कसं असतं, जेवढं पटापट राहणीमान बदलतंय, तेवढं हे अंतर वाढत जाणार बघा. तक्रारी तर कधी संपणार नाहीत. आपल्या पिढीच्या आणि पुढच्या पिढीच्याही. पण निदान काळाशी कसं का होईना जुळवून घ्यायचं. काही जूनं घ्यायचं, काही नवं घ्यायचं. दोन्हींचा मेळ घालायला पाहिजे.

मेळ तर घातला पाहिजे वो. नाहीतर सैपाकघरात भांड्यांला कळत नाही आपल्याला का आपटलं जातंय आणि बाहेर ओट्याच्या लक्षात येत नाही की आपलं काय चुकलंय,लिलाकाकू सांगत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com