
नजरेला सुखावणारी एखादी गोष्ट बघून आपण जेव्हा आनंदित होतो, तेव्हा आपल्या ओठांतून आपसूकच शब्द बाहेर पडतात ‘वाह सुंदर.’ आपल्या समोर एखाद्या शिल्पकाराने कोरलेले शिल्प असते. चित्रकाराने रेखाटलेले चित्र असते. एखाद्या व्यक्तीने मन लावून केलेले एखादे दर्जेदार काम असते. निसर्गाचा एखादा आविष्कार असतो किंवा एखादी सुंदर व्यक्ती असते. फक्त नजरेतून दिसणारे तेच सौंदर्य अशी जर सौंदर्याची व्याख्या केली तर ती अतिशय चुकीची होईल.
एखाद्या अंध व्यक्तीच्या सौंदर्याबाबतीत कल्पना काय असतील? त्याच्या नजरेसमोर आयुष्यभर फक्त काळाकुट्ट अंधार असतो. जगासाठी जरी तो अंध असला तर त्याला सौंदर्यदृष्टी नाही, असे म्हणता येत नाही. कारण त्याचे इतर ज्ञानेंद्रिय अधिक संवेदनशील असतात. सौंदर्य हे फक्त दिखाऊपणावर आधारित नसते हे खऱ्या अर्थाने अंध व्यक्तीच सांगू शकतो. वरवर दिसणाऱ्या दिखाऊपणाच्या सौंदर्यावर डोळस लोक भुलतात, फसतात. मात्र तशी फसगत अंध व्यक्तीची अजिबात होत नाही.
आवाज, स्पर्श, चव आणि वास आदी सोबत दृष्टीच्या बाबतीत आपण सुदैवी असलो तरी एकदा फक्त डोळ्यांनी बघितलेली गोष्ट सुंदर आहे असे म्हणून आपण लगेच निष्कर्षावर येतो. माणूस फक्त दिसायला सुंदर असून उपयोग नसतो. तो जेव्हा बोलायला सुरुवात करतो त्या वेळी त्याच्या वाणीचे सौंदर्य आपल्या लक्षात येत असते. एखाद्या सामान्य दिसणाऱ्या गायिकेचा आवाज इतका सुंदर असतो, की मंत्रमुग्ध होऊन आपले डोळे आपोआप मिटतात. माणसाच्या बोलण्यातून त्याच्या सुंदर स्वभावाची पारख करता यायला हवी.
हस्तांदोलन करताना त्याच्या स्पर्शातून त्याची सच्चाई चाचपता यायला हवी. एखादे शिल्प किंवा निसर्ग निर्मित कलाकृतीचे सौंदर्य डोळ्यापेक्षा स्पर्शाच्या अनुभूतीने अधिक अजमावता येते. कोणत्याही पाककृतीचे सौंदर्य हे चवीत असते. जेवणाचा आस्वाद घेताना ‘वाह सुंदर चव आहे!’ असे पाककृतीचे कौतुक आपण करतो. वैचारिक दृष्टी सुंदर असली, की जग सुंदर दिसू लागते. सौंदर्य दिसले की आपल्याला आनंद होतो.
आनंदी माणूस अर्थातच सुंदर दिसतो. तो अधिकाधिक सुंदर गोष्टी घडवू लागतो. जगातले प्रत्येक ठिकाण, तिथली प्रत्येक वस्तू आणि तिथली सजीव सृष्टी या वेगवेगळ्या सुंदर कलाकृती असतात. त्यांच्यातील सौंदर्याचा शोध घेण्याची दृष्टी मात्र आपल्याकडे असायला हवी. आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेमधले, बऱ्या वाईट घटनांमधले, भेटणाऱ्या प्रत्येक माणसामधले खरे सौंदर्य शोधण्याची नशा आपल्याला जडायला हवी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.