हाच होईल आपला पितृदिन!

वर्षातून एकदा साजरा होतो मातृदिन तसा पितृदिनही. त्या दिवसापुरताच येतो सामाजिक माध्यमांवर महापूर... मातृपितृ भक्तीचा!
हाच होईल आपला पितृदिन!
Banyan TreeAgrowon

राजेंद्र उगले

अस्वस्थता माणसाला अंतर्मुख करते. मागे वळून बघायला सांगते, ‘स्व’मूल्यमापन करविते. जीवनाच्या अनवट वाटेवरचं ठेचकाळणं, पडणं, उठणं, लढणं सगळं-सगळं आठविण्यास भाग पाडते. इथेच सापडतात गळलेले सारे बंध, पाश... काही आपलेसे, काही परकेसे. ज्या वाटेवरून करून आलोय आपण आजचा प्रवास; त्या वाटेवर आपलं चिमुकलं बोट हातात धरून चालायला शिकवणारे आई-बाबाही आठवतात.

थोडावेळ जरी सुटलं बोट तरी भोवतालची गर्दी वाकुल्या दाखवायची. भोकाडी म्हणून भीती दाटलेल्या मनात अधिक भीती दाटायची आणि आपण भोकाड पसरून रडायचो. आपल्या आवाजाची कंपनं गर्दीचा माग काढत शिरायचे आई-बाबांच्या कानात आणि ते मागोवा घेत पोहोचायचे आपल्याजवळ.

आपल्याला अलगद उचलून घेताना त्यांच्याही चेहऱ्यावर असायचे किंचितसे भीतीचे भाव; पण ते विरून जात आपल्याला पाहिल्यावर आणि उरे नुसताच आनंद! ‘मायबाप’ हे आपलं आकाश आहे; एवढंच ठाऊक असणाऱ्या त्या वयात आपण घट्ट बिलगायचो बापाला. आईच्या पदराखेरीज नसायचं आपलं जग.

वयाबरोबर समज वाढत गेली आणि आईचा पदर वाटू लागला मळका. ऐहिक सुखांची तुलना करताना बाप भासू लागला राक्षस वगैरे. ज्यांनी आपल्या पायाशी अंगार घेऊन आपल्या पावलांसाठी फुले अंथरली ते खरेच असतील का असे? मग आपली समज वाढली की बिघडली? ज्यांनी न लाजता-घाबरता दुनियेशी पंगा घेत पुरवलेत आपले लाडकोड; ते कसे वाटू शकतात आपल्याला नकोसे? आई-बापापेक्षा मुलं कधीच होत नसतात मोठी; हे कसं नाही कळत आम्हाला वाढत्या वयात?

वर्षातून एकदा साजरा होतो मातृदिन तसा पितृदिनही. त्या दिवसापुरताच येतो सामाजिक माध्यमांवर महापूर... मातृपितृ भक्तीचा! प्रश्‍न उरतो ते इतर वेळेचं काय? एकवेळ आईला जवळ धरतो आपण; पण बाप मात्र कायमच राहतो उपेक्षित. तरीही त्याच्या परीने तो धरतोच आपल्यावर सावली. ऊन, पाऊस-वाऱ्यात मुळं घट्ट रोवून सावरतो तो आपल्याला. बाप सजवतो आपल्या आयुष्याचं सोनेरी मखर त्याच्या कष्टानं. आपल्या वर्तमान रस्त्यावर बाप डेरेदार वडासारखा असतो.

आपल्या चिवचिवाटाने सुखावणारा. बापाचं हे महत्त्व अधोरेखित करताना स्वर्गीय कमलाकर देसले म्हणतात,

येऊ दे मित्रा डोळ्यांत पाणी, आठवतील तितक्या आठवणी काढ

बाप असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड..!

या वडाची मजबूत पारंबी होता आलं; तर हाच होईल मग आपला पितृदिन!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com