
नगरः जिल्ह्यात यंदा कांद्याचे (Onion) क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगानुसार जिल्ह्यात कांद्याचे हेक्टरी सरासरी १९ टन ९३५ किलो उत्पादन निघाले आहे. यानुसार जिल्ह्यात यंदा तब्बल ३५ लाख टनांच्या जवळपास कांदा उत्पादन निघाल्याचा अंदाज आहे.
गतवर्षीच्या खरिपात मात्र पावणे अकरा टन हेक्टरी उत्पादन निघाले. पावसाने फटका बसल्याने उत्पादन घटले होते. जिल्ह्यात खरिपात २५ हजार हेक्टरपर्यंत, तर रब्बीत १ लाख २० हजार हजार हेक्टरपर्यंत कांद्याची लागवड होत असते. गेल्या दोन वर्षांत कांद्याला चांगला दर मिळाल्याने गेल्यावर्षी खरिपात व यंदा रब्बीतही कांद्याकडे (Onion) शेतकऱ्यांचा कल होता.
गेल्या वर्षी खरिपात तर क्षेत्र वाढलेच, पण रब्बीत सुमारे ७० ते ८० हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली. यंदा कांदा उत्पादनही चांगले निघाले आहे. कृषी विभागाने कांद्याचे रब्बीत २६१ पीक कापणी प्रयोग केले. त्यानुसार कांद्याचे (Onion) सरासरी हेक्टरी १९ हजार ९३५ किलो उत्पादन निघाले आहे.
तालुकानिहाय कांदा उत्पादन
नगर तालुक्यात हेक्टरी २२ टन ७०९ क्विंटल, पारनेरमध्ये २४ टन १३४ किलो, पाथर्डीत १४ टन १४१ किलो, संगमनेरमध्ये १३ टन ८४३ किलो, संगमनेरमध्ये १७ टन ४४८ किलो, कोपरगावात १८ टन ३०९ किलो, श्रीरामपूरमध्ये २४ टन ९८२ किलो, राहुरीत १६ टन ७०१ किलो, शेवगावात १४ टन ३२१ किलो, नेवाशात २१ टन ६६४ किलो, कर्जतमध्ये १८ टन ९८ किलो, जामखेडमध्ये १८ टन ४४६ किलो, श्रीगोंद्यात २१ टन ६४७ किलो, तर राहत्यात ३० टन ४११ किलो कांद्याचे उत्पादन निघाले आहे.
दरात चढ-उतार; शेतकरी हतबल
नगर जिल्ह्यात नगर, घोडेगाव, पारनेर, राहाता, श्रीरामपूर येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव होतात. बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून दरात सतत चढ-उतार होत आहे. २५ रुपये किलोपर्यंत मिळणारा दर मागील काही दिवसांत दहा रुपयांवर आला होता. मागील आठवड्यातील दोन लिलावांत दरात काहीशी वाढ झाली. तरीही दरातील चढ-उतार सुरूच आहे. मोठा खर्च करून कांदा उत्पादन घेतले असले तरी पुरेसा दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक हतबल झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.