Farmers Betterment : शेतकऱ्यांचा उद्धार हाच विचार

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी प्रथम कृषक समाजाला शिक्षित केले. भारतात कृषिक्रांती केली तसेच रूढी, परंपरावादी कृषक समाजाला नव्या प्रगत व्यवस्थेत नेले. आज १२४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
Dr. Panjabrao Deshmukj
Dr. Panjabrao DeshmukjAgrowon

डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) यांच्या जन्मकालीन परिस्थितीचे अवलोकन केले तर त्यावेळी भारतातील बहुसंख्य समाज हा शेतकरी होता. महात्मा जोतिबा फुले (Mahatma Phule) यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ (Shetkaryancha Aasud) या ग्रंथात शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीचे वर्णन केलेले आहे ते असे : ‘विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’’ हाच भाऊसाहेबांचा अनुभव होता आणि म्हणून त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांचा उद्धार हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता.

कृषिरत्न, शिक्षण महर्षी, निर्भीड राजकारणी आणि महान समाज सुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन चरित्र म्हणजे एक अद्भुत आणि उद्बोधक अशी गाथाच आहे. २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या लहानशा खेड्यात, एका गरीब शेतकरी कुटुंबात डॉ. पंजाबरावांचा जन्म झाला. जवळपास शिक्षणाच्या सोई नसल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर रेल्वे सोनेगाव येथे आणि माध्यमिक शिक्षण पापळपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या कारंजा (लाड) या गावी झाले.

Dr. Panjabrao Deshmukj
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

१९१८ मध्ये पंजाबराव मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात पास झाले आणि त्यांना उच्च शिक्षणाचा ध्यास लागला. त्यांची ही उच्चशिक्षणाची प्रबळ इच्छा पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षण देण्याचे ठरविले. पण त्या काळी विदर्भात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने पंजाबरावांना त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये १९१८ साली दाखल केले. यासाठी पंजाबरावांना त्यांच्या मामांनी सर्वतोपरी आर्थिक साहाय्य केले.

अनेक अडचणी आणि हाल अपेष्टांना धैर्याने तोंड देऊन आपले महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तेथे पूर्ण केले. त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ब्रिटिश राजवटीत त्यांनी इंग्लंडला १९२० मध्ये प्रयाण केले. इंग्लंड मधील वास्तव्यात त्यांनी एडींबर्ग विद्यापीठाची एमए ची पदवी संपादन केली. १९२५ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून ते पीएचडी झाले. डॉ. पंजाबराव देशमुख म्हणजे विदर्भातील एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कार्यक्षेत्र मूलतः विदर्भ असले तरी त्यांची दृष्टी मात्र केवळ राष्ट्रव्यापीच नव्हे तर वैश्विक होती.

Dr. Panjabrao Deshmukj
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

परदेशात शिक्षण घेत असतानाच पुढील कार्याच्या योजना त्यांच्या मनामध्ये घोळत होत्या. त्याचप्रमाणे भारतीय शेतकऱ्यांच्या हलाखीच्या स्थितीने त्यांचे मन नेहमीच व्यथित होत असे आणि सावकारांच्या घशातून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कशा सोडविल्या जातील, याचाच विचार त्यांच्या मनामध्ये सतत चाललेला असे.

या विचारातूनच भाऊसाहेबांनी भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी उपयोगी पडेल अशा वकिली व्यवसायाचा अंगीकार आपले उच्चशिक्षण पूर्ण करून मायदेशी आल्यानंतर केला. १९२६ पासून अमरावतीला वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी अधिक आत्मीयतेने लक्ष देणे सुरू केले. संघटितरीत्या प्रश्न सोडविता यावेत यासाठी ‘मध्यप्रांत आणि वऱ्हाड शेतकरी संघ’ १९२८ मध्ये स्थापन केला.

Dr. Panjabrao Deshmukj
Indian Agriculture : प्रत्यक्ष काम करणारे होऊयात...

भारत कृषक समाज

भारतीय किसान जागा व्हावा, तो एका व्यासपीठावर एकत्र येऊन आपल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील व्हावा याकरिता भाऊसाहेबांनी एक समर्पक पाऊल उचलले आणि ’भारत कृषक समाज’ नावाची राष्ट्रीय संघटना १९५४ मध्ये स्थापन केली. भारत कृषक समाजाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले.

आपल्या अध्यक्षतेखाली त्यांनी ‘अखिल भारतीय युवा शेतकरी संघ’ स्थापन केला. भारतातील औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांकडे जसे लक्ष आत्तापर्यंत देण्यात आले होते, तसे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दिले जात नव्हते. किंबहुना या देशातील ७० टक्के लोकांच्या प्रश्नांची उपेक्षाच होत होती.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे औद्योगिक कामगारांच्या प्रश्नाप्रमाणेच लक्ष दिले गेले पाहिजे या करिता त्यांनी आवाज उठविला. औद्योगिक कामगारांना जसे संरक्षण दिले जाते तसेच संरक्षण शेतकऱ्यांना पण दिले गेले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले आणि अशी तरतूद भारतीय राज्य घटनेतच केली जावी असा आग्रह त्यांनी धरला.

घटना समितीचे सभासद या नात्याने त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक सवलती आणि कल्याणकारी योजना सादर केल्या आणि त्यांचा राज्य घटनेत समावेश करण्यांत यावा असे प्रतिपादन केले. त्यांचे हे मत क्रांतिकारी असे समजले गेले पण त्याचा समावेश घटनेत होऊ शकला नाही. ग्रामीण जनतेच्या कल्याणाच्या ह्या सूचना घटना समितीने स्वीकारल्या असत्या तर भारतीय शेती आणि ग्रामीण जीवनाचे चित्रच आज बदलून गेलेले दिसले असते.

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री

ऑगस्ट १९५२ मध्ये डॉक्टर साहेबांची भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून निवड करण्यात आली. धान्योत्पादन व त्यासाठी कृषी विकास हा भाऊसाहेबांच्या जिव्हाळ्याचा दुसरा विषय होता. कोट्यवधी हातांचा हा देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ नये, त्याला अमेरिकेच्या दाराशी जाण्याचा प्रसंग यावा, या प्रकारामुळे भाऊसाहेब विलक्षण अस्वस्थ होत असत. त्यामुळेच कृषिमंत्री पदाची संधी प्राप्त होताच त्यांनी आपले सगळे लक्ष धान्योत्पादनावर केंद्रित केले. गेली काही वर्षे आपल्या देशात कुठेनाकुठे अवर्षण तरी पडते किंवा अतिवृष्टी तरी होते पण तरीही देशात धान्याची टंचाई निर्माण होत नव्हती, ही केवळ भाऊसाहेबांची किमया होती.

कृषिमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्याबरोबर एका महिन्यातच त्यांनी जपानी भातशेती योजना सुरू केली आणि भारतीय भात शेती मध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला. वन महोत्सवाची कल्पना त्यांनी अत्यंत आत्मीयतेने राबविली. १९५३ मध्ये रोम तसेच १९५४ मध्ये श्रीलंका येथे भरलेल्या एफएओ च्या परिषदांना पाठविलेल्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व डॉ. पंजाबरावांकडेचे होते. १९५४ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीचे एक मंडळ जपानला आंतरराष्ट्रीय भात आयोगासाठी टोकियो येथे पाठविण्यात आले. याच भात आयोगाच्या कोलकत्ता येथे भरलेल्या सत्राचे १९५६ मध्ये ते अध्यक्ष ही होते.

जागतिक कृषिप्रदर्शन

१९५९-६० मध्ये दिल्लीला भरविलेल्या पहिल्या भव्य जागतिक कृषी प्रदर्शनामागे भाऊसाहेबांचीच प्रेरणा होती. या जागतिक कृषी प्रदर्शनाला भारतातील ८० टक्के शेतकऱ्यांनी भेटी देऊन जगातील आधुनिक कृषी अवजारांची माहिती मिळविली आणि भारतामध्ये नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती व्यवसायाचा प्रारंभ केला.

भारतीय शेतीमध्ये सुधारणा करणारे, केंद्रीय कृषिमंत्रीपद भूषविणारे शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा कायदा करणारे, विदर्भातून घटना समितीवर सभासद म्हणून काम करणारे भाऊसाहेब ही पहिली व्यक्ती होय. विदर्भात ज्ञानगंगा आणणारे, आधुनिक भगीरथ, महामानव, शिक्षण महर्षी १० एप्रिल १९६५ रोजी रामनवमीचे दिवशी अनंतात विलीन झाले. या थोर पुरुषांस नतमस्तक होऊन माझे कोटी कोटी प्रणाम!

(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी विद्यापीठ ग्रंथपाल आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com