वनविभागाच्या तत्कालीन तीन अधिकाऱ्यांना अटक

जलयुक्त शिवार अभियानात गैरव्यवहार प्रकरण
वनविभागाच्या तत्कालीन तीन अधिकाऱ्यांना अटक
Jalyukat Shiwar YojanaAgrowon

नगर : ‘जलयुक्त शिवार अभियाना’ (Jalyukt Shiwar Abhiyan) अंतर्गत २०१५- २०१६ मध्ये करण्यात आलेल्या कोंभळी व चांदेकसारे (ता. कर्जत, जि. नगर) येथील दोन कामात गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत (Jalyukt Shiwar Inquiry) स्पष्ट झाले. त्यानंतर नगरच्या लाचलुचपत विभागाने शुक्रवारी (ता.१०) वन विभागातील तत्कालीन पाच अधिकारी, कर्मचारयावर सात गुन्हे दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. या कारवाईने जलयुक्त शिवार अभियानाची कामे करणाऱ्या यंत्रणांत खळबळ उडाली आहे. गैरव्यवहार उघड झालेले काम माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या मतदार संघातील आहे.

‘जलयुक्त’च्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर शासनाने कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले. नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल दिल्यानंतर काही कामाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होती. त्यानुसार नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंभळी व चांदेखुर्द येथे केलेल्या खोल सलग समतल चरांच्या कामाची लाचलुचपत विभागाच्या पथकाने ४ सप्टेंबर २०२१ पासून खुली चौकशी केली. या चौकशीत कोंभळी येथील कामात संगनमताने खोटे दस्तऐवज तयार करून ९३२० रुपयांचा तर चांदे खुर्द येथील ५८ हजार २४८ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले.

लाचलुचपत विभागाच्या चौकशी पथकाने वरिष्ठांना अहवाल दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कोंभळी येथील कामाबाबत वन विभागातील व सध्या सेवानिवृत्त असलेले तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) रमेश गोलेकर, सध्या बल्लारशहा (जि. चंद्रपूर) येथे कार्यरत असलेले व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी शंकरराव पाटील, तत्कालीन वनपाल शेखर रमेश पाटोळे तर चांदेखुर्द येथील कामातील गैरव्यवहाराबाबत तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) रमेश गोलेकर, सध्या बल्लारशहा (जि. चंद्रपूर) येथे कार्यरत असलेले व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी शंकरराव पाटील, वनपाल पल्लवी सुरेश जगताप, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे अशा दोन्ही कामांतील गैरव्यवहारप्रकरणी पाच लोकांवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, विजय ठाकूर, संतोष शिंदे, विजय गुंगल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरूण शेख व राहुल डोळसे यांच्या पथकाने शंकर पाटील, बलभीम गांगर्डे, शेखर पाटोळे तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता. १३) पोलिस कोठडी सुनावली आहे.

कामे निकृष्ट केल्याच्या तक्रारी

नगर जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये कृषी, वन विभाग, जलसंपदा, जलसंधारण व इतर विभागामार्फत २०१५ ते २०१९ या कालावधीत हजारो कोटी रुपये खर्च करून ‘जलयुक्त’ कामे केली. कृषी विभागाने केलेली कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याची फारशी दखल त्यावेळी कृषी विभागाने घेतली नाही. आता मात्र या अभियानात गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली. त्यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com