Color Cotton Verity : नैसर्गिक रंगीत कापसाचे तीन वाण विकसित

नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी नैसर्गिक रंगीत अशा देशी कापूस वाणांचा विकास केला आहे.
Cotton Color
Cotton Color Agrowon

नागपूर येथील केंद्रीय कापूस (Cotton) संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी नैसर्गिक रंगीत अशा देशी कापूस वाणांचा विकास केला आहे. जंगली कापूस प्रजातींपासून नैसर्गिकरीत्या (Natural) रंगधारणा असलेल्या तीन वाणातील दोन वाण हे दक्षिण भारतासाठी, तर एक वाण मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आला आहे. कापड उद्योगातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे वाण मोलाची भूमिका निभावू शकतील, असा विश्‍वास आहे.

कापड उद्योगामध्ये (Textile industry) कपड्यांच्या निर्मितीमध्ये व रंग देण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध रासायनिक घटकांचा वापर केला जातो. या उद्योगातून वॉशिंग, ब्लिचिंग आणि डाइंग प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये ही रसायने मिसळलेली असतात. त्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत असून, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पाण्यातील विरघळणाऱ्या ऑक्‍सिजनची पातळी कमी झाल्याने जलचरांवरही विपरीत परिणाम होतो.

Cotton Color
Bhima Sugar Election : भीमा’ वर महाडिकांचेच वर्चस्व

कापडाच्या टिकाऊ रंगासाठी वापरली जाणारे अनेक रसायनेही विषारी, म्युटेजेनिक आणि कॉर्सिनजेनिक (कर्करोगकारक) आहेत. असेच दूषित पाणी पुढे शेती सिंचनासाठी वापरले गेल्यास हे रसायनाचे अंश शेतीमालामध्ये उतरतात. त्यातून पुढील सर्व अन्नसाखळी प्रभावित होऊ शकते.

प्रदूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्वचारोग, विविध प्रकारच्या ॲलर्जी, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात होणारा दाह, नासिकाशोथ, दमा, जळजळ, पाचक मार्ग, श्‍वसन, मूत्रपिंड निकामी होणे आणि कर्करोग अशा आजारांचा धोका वाढतो. मानवांसह प्राण्यांमध्ये विविध रोगांचा संसर्ग होऊ शकतो.

Cotton Color
Sugar Export : साखर निर्यातीला हिरवा कंदील ?

या साऱ्या समस्यांचे मुळ असलेल्या कापड उद्योगामध्येच डाइंग प्रक्रियेतील रसायनांचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने कापसालाच नैसर्गिकरित्या रंग असलेले वाण विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तब्बल आठ वर्षांच्या संशोधनानंतर नैसर्गिक रंग असलेले कापसाचे तीन वाण विकसित केले आहेत.

जंगली कापूस प्रजातींचा उपयोग करीत हे वाण विकसित करण्यात आले. पांढऱ्या कापसाच्या क्षेत्रात विलगीकरण अंतर (आयसोलेशन डिस्टन्स) हे ५० मीटर असणे गरजेचे आहे. म्हणजे इतर पांढऱ्या वाणांसोबत संकर होणार नाही.

वेलस्पून, गोपुरी यांसारख्या अनेक संस्थांकडून रंगीत कापसाच्या बियाण्यांना मागणी आहे. प्रायोगिक तत्त्वावर १०० एकरांवर लागवडीसाठी वैदेही-१ या वाणाचे बियाणे तमिळनाडूतील एक संस्थेला उपलब्ध करून देण्यात आले आहे.

- डॉ. विनिता गोतमारे, ९४२२१४६८८६

वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

आरोग्याप्रती जागरूक नागरिकांसाठी नैसर्गिकरित्या रंगीत कापूस हा सक्षम पर्याय असणार आहे. त्यातच हे देशी वाण असल्याने या बियाण्यांचा पुनर्वापर शेतकरी करू शकतात. सुरुवातीला बोंड फुटण्याच्या काळात मळकट-पांढरा रंग असतो. सूर्यप्रकाश पडल्यानंतर तो काही प्रमाणात गडद होतो.

दोन तासातील अंतर ७५/६० सेंमी, दोन झाडातील अंतर ३० सेंमी, एकरी अडीच किलो बियाणे याप्रमाणे लागवडीची शिफारस आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने संस्थेअंतर्गत विकसित तंत्रज्ञान उदा. बियाणे, अवजारे यांच्या विक्रीसाठी ‘ॲग्री इनोव्हेट’ हा ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या माध्यमातून रंगीत कापसाच्या बियाण्यांचे व्यावसायिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.

- डॉ. वाय. जी. प्रसाद, ९४९०१९२७४९, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

...असे आहेत रंगीत कपाशी वाण

वैदेही-१

हे पहिले गर्द तपकिरी नैसर्गिक रंगाचे वाण आहे. हिरसुटम, बारमेडंस, रायमोंडी आणि थरबेरी या चार जंगली कापूस प्रजातींच्या संकरातून विकसित करण्यात आलेले हे भारतातील पहिले रंगीत कापूस वाण आहे. दक्षिण विभागातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्यानंतर या वाणाच्या व्यावसायिक प्रसारणाला २०२१ मध्ये मान्यता मिळाली.

Cotton Color
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

खास दक्षिण क्षेत्रासाठी विकसित या वाणाची शिफारस केवळ कोरडवाहू क्षेत्राकरिता होते. पुढे २०२२ मध्ये बागायती लागवडीसाठीही त्याची शिफारस केली गेली. कोरडवाहू क्षेत्रात हेक्टरी १४ ते १५ क्‍विंटल आणि बागायती क्षेत्रात हेक्टरी २० ते २१ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. याच्या तंतूची लांबी २२ ते २३ मिमी, मजबुती २२.८ ग्रॅम/टेक्‍स, मायक्रोनेअर ३.९५ इतके आहे. मायक्रोनेअर हे ‘फाइन कॉटन’साठी ४ पर्यंत असावे अशी शिफारस आहे.

याच्या झाडाची कॅनॉपी मोकळी असल्याने फांद्यांच्या सर्व भागात सूर्यप्रकाश पोहोचतो. परिणामी, रसशोषक किडी आणि बोंडअळीचा प्रादुर्भावही कमी होतो, असा दावा करण्यात आला आहे. ‘ऑल इंडिया कॉटन इंप्रूव्हमेंट प्रोजेक्‍ट’ मध्येही या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या.

अल्टरनेरिया पानावरील ठिपके (alterneria leaf spot), अणुजीवी करपा (bacterial blight), दहिया (grey mildew) यांचा प्रादुर्भाव या वाणात होत नाही. सोबतच कोरीनोस्पोरा पानांवरील ठिपके (corynespora leaf spot), तांबेरा (rust) यालाही हे वाण कमी बळी पडते.

Cotton Color
Fodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन

सीएनएच-१७३९५

(सीआयसीआर-एच-कॉटन ५८)

हिरसुटमपासून तयार केलेले हे वाण २०२२ मध्ये प्रसारित झाले. दक्षिण क्षेत्रातील कोरडवाहू आणि बागायती शेतीमध्ये या वाणाची शिफारस आहे. हेक्टरी २० क्‍विंटल उत्पादकता, लांबी २३.७ एम.एम., मजबुती २३.४, मायक्रोनेअर ४.७ इतकी अधिक अशी या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.

१७५२२

(सीआयसीआर-ए-कॉटन ५९)

हे देशी वाण मध्य भारतातील महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसाठी २०२२ मध्ये प्रसारित करण्यात आले. आरबोरीयम बेस असून, जंगली प्रजातींचा उपयोग विकसित केलेल्या या वाणाची उत्पादकता हेक्टरी ११ ते १२ क्‍विंटल आहे.

देशी वाण असूनही २३.३ एम.एम. वाण लांबी, मजबुती २३.१, मायक्रोनेअर ५.३ आहे. त्यामुळे याचे कापड हिरसुटम (अमेरिकन कॉटन) प्रमाणे फाइन राहत नाही. मात्र देशी वाण असल्याने यावर बोंड अळी आणि रसशोषक अशा किडीसह रोगांचा प्रादुर्भावही कमी असल्याचे डॉ. विनिता गोतमारे सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com