Balaji Sutar: व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात रूमणेच घ्यावे का?

नापिकी आहे, दुष्काळ आहे, मी कर्ज फेडू शकत नाही, वीज बिल भरू शकत नाही, हातउसनी देणी देऊ शकत नाही, ही त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नोंदवलेली काही कारणे.
Sahebrao Karpe
Sahebrao KarpeAgrowon

आज साहेबराव करपेंचा (Sahebrao Karpe) स्मृतिदिन. साहेबराव शेषराव करपे. राहणार चिलगव्हाण, जिल्हा यवतमाळ. १९ मार्च १९८६ या दिवशी या माणसाने आत्महत्या (Farmer Suicide) केली. एकट्याने नव्हे, सबंध कुटुंबांसहित. ज्यांनी ‘भूदान’ चळवळ चालवली त्या विनोबांच्या पवनार आश्रमात जाऊन पत्नी, चार मुलांसहित सहा जीव ‘दान’ करून टाकले. आज या आत्महत्येला ३७ वर्षे पूर्ण झाली.

नापिकी आहे, दुष्काळ (Drought) आहे, मी कर्ज (Agriculture Loan) फेडू शकत नाही, वीज बिल भरू शकत नाही, हातउसनी देणी देऊ शकत नाही, ही त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नोंदवलेली काही कारणे. काही न नोंदवलेली कारणेही असतील, ज्यांची आपण कल्पना करू शकतो. शब्दांमध्ये सगळंच नोंदवता यावं एवढी चतुराई मरू घातलेल्या कुणब्याकडे असती, तर अजून काय पाहिजे होतं?

कृषिसंस्कृती हाच जिथल्या जगण्याचा मुख्य आधार आहे त्या या प्रदेशात अधिकृतपणे नोंदली गेलेली ही पहिली ‘शेतकरी आत्महत्या’. त्यापूर्वीच्या शे-पाचशे वर्षात नोंदल्या न गेलेल्या आत्महत्यांचा आकडा कदाचित लाखात असेल, कदाचित कोटींत.

त्यांच्या मरण्यामागची कारणेही हीच किंवा अशीच असणार. त्या शे-पाचशे वर्षात झाली नव्हती अशी एकच गोष्ट साहेबराव करपेंच्या आत्महत्येनंतर झाली, ती म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं मरणं ‘एका शेतकरी कुटुंबाची सामुदायिक आत्महत्या’ म्हणून नोंदलं गेलं.

ही नोंद झाली आणि त्यानंतर मागची सलग एकतीस वर्षे या नोंदी होत गेल्या. लागोपाठ या नोंदी होत जाण्यातली विदारकता लक्षात घेऊन शेतक-यांची किंवा शेतीची परिस्थिती सुधारावी यासाठी काय प्रयत्न झाले, याचा तपास करण्याच्या प्रयत्न केला तर हाती काहीही लागत नाही.

पिढ्यानपिढ्यांचा अन्नदाता काही हजारांचं कर्ज फेडता येत नाही म्हणून जीव देतो आणि मग त्याच्या उरलेल्या कुटुंबाला लाखभराची रक्कम ‘मदत’ म्हणून दिली जाते. आम्ही पांढरपेशा व्यवस्थेतले लोक या व्यवस्थेसकट इतके बेईमान कसे झालो आहोत?

Sahebrao Karpe
Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी साहित्याची निर्मिती व्हावी

थोडा उलटा प्रवास केला तर आपल्या सगळ्यांचेच वाडवडील शेतीत्तल्या मातीचा रंग जन्मजातपणे रक्तात घेऊन जन्मलो, वाढलो, जगलो असल्याचे आढळून येईल.

ज्या भुईने जन्म दिलेल्या अन्नावर आपल्या पिढ्या पोसल्या त्याच भुईत ते अन्न जन्मण्यासाठी बीज पेरणारा वंश रानोमाळ सैरभैर होत असताना स्वत:ला ‘शेतक-यांचे पुत्र’ किंवा ‘भूमिपुत्र’ असं म्हणवून घेणा-या कुणालाच यातल्या वेदना तीव्रतेने भिडताना का दिसत नाहीयेत?

भिडत असतील तर काही घडताना का दिसत नाहीये? माणूस मेल्यावरच त्याला मदत देण्याइतके बेशरम राज्यकर्ते निपजतात, त्यांचीही नाळ कुठेतरी भूईतच पुरलेली असते नं? की आभाळातल्या विमानात चांदवा म्हणून टांगून ठेवतात ती नाळ?

बायको पोरांसोबत जीव देऊन टाकताना साहेबराव करपेंच्या मनात काय किती दाटून आलेले असेल? जिथे जन्मलो, ज्या भूमीत राबलो, घाम गाळला, त्याच भूमीत, त्याच गावात आपले सगळे आधार संपलेले आहेत, ज्याच्याकडे मन उकलावं असा कुणीही आपल्या भोवतालात नाही, या भूमीने आपल्याला मुळापासून उखडून मृत्यूच्या कडेलोटाप्रत आणून ठेवलेलं आहे आणि आपल्या सबंध वंशासह इथे आपण मरून जातो आहोत, हे मनात येऊन त्या भल्या कष्टाळू माणसाच्या मेंदूच्या चिंधड्या उडाल्या असतील आतल्या आत. माणसांनी गजबलेल्या या भोवतालात कुणीच आपलं नाही, ही भावना केवढी जीवघेणी असेल नं?

Sahebrao Karpe
Farmer Suicide : अब की बार, किसान सरकार; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना साद

कडेलोटाच्या या नेमक्या क्षणी कुठे असतात आप्तस्वकीय, कुठे असतं सरकार? आपल्याशी रक्ताचं नातं सांगणारा एक माणूस इथे आत्मघात करून घेतो आहे, त्याला मरण्यापूर्वीच आधार द्यावा, ही इतकी साधी गोष्ट कुणालाच कशी सुचत नाही?

मुर्दाड भोवताल, कोरडी रखरखीत नोकरशाही आणि केवळ खुर्च्या मिळवण्याच्या, टिकवण्याच्या लालसेने बरबटलेली मनं मुखवट्याआड दडवून संभावितासारखे वावरणारे राजकारणी हे बळीवंशाच्या या आत्मघाती परंपरेचे उद्गाते, प्रणेते आहेत.

या आत्महत्या नसतात, हत्या असतात व्यवस्थेने घडवलेल्या. अप्रत्यक्ष का होईना; लक्षावधींच्या मरणाला कारण होणा-या या घटकांना कधी पश्चात्ताप तरी होताना दिसतो काय?

कुणी जीव दिला की चार पुढाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार स्तरावरचा अधिकारी जाऊन हजार चौकशा करून झाल्यावर त्या जीवाचं मोल लाख रुपयांच्या चेकने करतो, ही त्या मरणाची किंमत असते?

Sahebrao Karpe
Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी साहित्याची निर्मिती व्हावी

काय मोल करते ही व्यवस्था एखाद्याच्या जगण्या-मरण्याचं?

व्यवस्था म्हणते, शेतकरी प्रेमप्रकरणातून आत्महत्या करतात, व्यवस्था म्हणते, त्यांना व्यसनं असतात, त्यातून ते कर्जबाजारी होतात, कुवत नसताना पोराबाळांच्या लग्नात ते अवाढव्य खर्च करतात, व्यवस्थेतलाच गोपाल शेट्टी नावाचा कुणी बिनडोक म्हणतो, आत्महत्या ही तर फॅशन झालीये.

ऋतूमानातल्या अत्यंत विषम बदलांमुळे शेती आतबट्ट्यात आली आहे तशीच ती स्वत:ला ‘शेतक-यांचं लेकरू’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यांच्या अदूरदृष्टीमुळेही आलेली आहे.

मेक इन इंडिया आणि कॅशलेस इकॉनॉमी वगैरे बिनबुडाच्या भानगडी अभिमानाने सांगणा-या शासनव्यवस्थेला शेतीमध्ये काही दीर्घकालीन गुंतवणूक करावी, असे वाटत नाही.

सिंचनातल्या भ्रष्टाचारामुळे आणि आपापल्या प्रदेशाच्या पोळीवर अवघं तूप ओढून घेण्याच्या लालसेपोटी पाण्याचं नियोजन नाही, असलेल्या साठ्यांचं योग्य वाटप नाही.

इथले तीस टक्क्यांहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. कोरडवाहू शेतक-यांची संख्या नव्वद टक्क्यांवर आहे. हेच शेतकरी बहुधा अल्पभूधारकही असतात. फार तर तीन-चार एकर जमीन असते.

यांना बँका जवळ करत नाहीत. पावसाळा येण्यापूर्वी शेतीची मशागत करावी लागते. एखाद बरा पाऊस झाला की पेरणी करावी लागते. बियाणं, खतं, कीटकनाशकांसाठी अव्वाच्या सव्वा खर्च करावा लागतो. बँकांच्या सहकार्याअभावी सावकारांचे पाय धरून हा खर्च केला जातो. तो करून झाला की नेमका पाऊस गायब होतो.

डोळ्यांदेखत वाळून जाणारी पिकं, आजवरच्या खर्चाचे, कर्जाचे, व्याजाचे आकडे छाती दडपून टाकत राहतात. शिवाय दैनंदिन जगणं सोडून देता येणारं नसतं. दुखणीभानी असतात, लग्नकार्य असतात, आहेर-हुंडे असतात. यातून बोजा वाढतो, ताणही वाढतो. गावठी सावकारांच्या व्याजाचे दर महिन्याला पाच ते दहा म्हणजे वर्षाला साठ ते एकशेवीस टक्के एवढे असतात. या व्याजाचं कर्ज टाटा-बिर्लांनाही आत्महत्या करायला भाग पाडेल.

एक फाटका माणूस, ज्याच्या भोवतालात बहुसंख्येनं फाटकेच असतात, ज्याला अस्मानी-सुलतानी दोन्हींनी झोडलेलं असतं. मार्ग खुंटलेले असतात, उजेडाची तिरीपही सापडत नसते, तेव्हा तो गोठ्यातला कासरा काढतो. शिवारातल्या फांदीला बांधतो आणि गळ्यात फास अडकवून उडी मारतो.

आणखी एक ‘शेतकरी आत्महत्या’ घडली असं म्हणत मुर्दाड प्रदर्शनाखातर पांढरपेशे हळहळतात, सरकार सातबारावरचा बोजा तपासतं आणि मरण जुनंपुराणं होऊन गेल्यावर कधीतरी नोटांचं एक बंडल उरलेल्यांच्या हवाली करतं.

त्याने मेलेला जीव परत येत नाही, त्याने कोवळ्या पोरांच्या मस्तकावरचं हरवलेलं बापाचं छत्र पुन्हा सावली धरत नाही. व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात रुमणेच घ्यावे अशी अपेक्षा असते काय?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com