परंपरा अन् पर्यावरणातील टोकदार पेच

त्रिपुरातील सुमारे १७ आदिवासी प्रजाती ‘जाळा आणि शेती करा’ (जूम) पद्धतीची पारंपरिक शेती करतात. त्यातून हजारो वर्षांपासून पारंपरिक वाणाचे जतन झाले आहे. मात्र झाडे जाळण्याच्या प्रक्रियेमुळे होणारा पर्यावरणावरील विपरीत परिणाम कमी करण्यासाठी त्रिपुरा शासनाच्या वतीने कंबर कसलेली आहे.
परंपरा अन् पर्यावरणातील टोकदार पेच
Farming In TripuraAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

केरळच्या पाठोपाठ सर्वांत जास्त सुशिक्षित लोकसंख्या असलेल्या त्रिपुरा या राज्यामध्ये कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असला, तरी घरटी एकतरी व्यक्ती नोकरी करतेच. आर्थिक उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत उपलब्ध असल्यामुळे येथील शेतकरी बऱ्यापैकी कर्जमुक्त आहेत. डोंगर, दऱ्या, पर्वतराजी आणि जंगलामुळे समृद्ध असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे अधिक आहे. मुळात राज्याची भौगोलिक परिस्थिती रासायनिक शेतीला पूरक ठरणारी नाही.

भात हे येथील मुख्य पीक. त्रिपुरामधील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेकडो पारंपरिक भातजातींचे संवर्धन केले आहे. सेंद्रिय खताचा वापर असल्यामुळे उत्पादनही हेक्टरी २.२ टन इतके आहे. (तुलनेसाठी भारताचे सरासरी भात उत्पादन हेक्टरी दोन टन.) यातही दक्षिण आणि पश्‍चिम त्रिपुरा हा उत्तर भागापेक्षा आघाडीवर आहे. राज्याच्या कृषी विभागाने याची कारणमीमांसा शोधली असता त्यामागे पाण्याची कमतरता या नैसर्गिक कारणाबरोबरच येथील शेतकरी भात पिकातील आधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचेही दिसून आले.

त्रिपुरामधील भात शेतीच्या प्रगतीमागील एक मुख्य कारण म्हणजे बांगलादेशातून आलेले शेतमजूर. बांगलादेशमधील मेघना नदीच्या खोऱ्यात असलेली भात शेती वातावरण बदलामुळे अडचणीत येऊ लागल्याने येथील बहुतांश शेतकरी त्रिपुरामध्ये मजूर म्हणून स्थलांतरित झाले. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना या पिकातील आधुनिक तंत्रज्ञान शिकवले. त्रिपुरामध्ये डोंगर उतारावरील शेतीसारखी बदलत असते, कुठलेही एक पीक येथे घेतले जात नाही. वातावरण, पाऊस आणि मागणी यानुसार या शेतीमध्ये भाताव्यतिरिक्त अन्य पिके घेतली जातात. समतल शेतीमध्ये भात पिकाचीच शेती होते. तीही तीन ऋतूत औश (Aush), अमन (aman) आणि बोरो (boro) या तीन प्रकारे.

डोंगर उतारावरील शेती ही राज्याच्या दृष्टिकोनामधून काळजीचे कारण ठरत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक वेळा ही शेती वाहून जाते. जुन्या वयस्कर शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांचे मत पडते की पूर्वी या शेतीतून हमखास उत्पादन मिळत असे. मात्र गेल्या एक दीड दशकापासून हे चित्र बदलले आहे. उत्पादनाची आणि उत्पन्नाची काही हमीच राहिलेली नाही. शासन अशा शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहत असल्याने या भागात आता भाजीपाला उत्पादन होऊ लागले आहे. भुईमूग पिकासही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

त्रिपुरामधील ३२ टक्के शेतकरी आदिवासी आणि अल्पभूधारक आहे. डोंगर उतारावरील त्यांची शेती कायम बदलती असते. या पद्धतीला ‘जूम’(jhum) अथवा टिला (tila) म्हणतात. जूमिंग ही हजारो वर्षापासूनची आदिवासी शेतकऱ्यांची पारंपरिक शेती आहे. ज्या ठिकाणी पर्जन्यवने आणि भरपूर पाऊस असतो अशा त्रिपुरातील भागामध्ये सुमारे दहा हजार हेक्टरवर केली जाते. या पद्धतीमध्ये घनदाट जंगलामधील काही हरित भाग झाडझाडोरा कापून साफ करतात. तेथील लाकूडफाटा त्याच जागेवर पसरून जाळला जातो.

या पद्धतीमध्ये जमिनीमधील उपयुक्त जिवाणूंचा आणि अनेक बहुमोल मूलद्रव्यांचा नाश होतो. त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पादनही तुलनेने अल्प राहते. एक दोन वर्षे अशी शेती केल्यानंतर शेतकरी पुन्हा क्षेत्र बदलतात. दुसऱ्या जागेवरील झाडे, झुडपे, गवत कापून शेत तयार केले जाते. याला ‘शिफ्टिंग कल्टिवेशन’ असेही म्हणतात. या पद्धतीमध्ये घनदाट जंगलात शेकडो मोकळे ठिपके तयार होतात. त्याचा जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होतो.

शासनाच्या एका पाहणीनुसार, अंदाजे १७ आदिवासी जाती-जमाती या प्रकारची शेती करतात. त्रिपुरा शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यांना डोंगर-उताराच्या खाली पृष्ठभागावर भातशेतीला जागा दिली जात आहे. त्यांना स्थिर केले जात आहे. यामुळे शिफ्टिंग कल्टिवेशनचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. आदिवासींनाही वातावरण बदल आणि जंगलांचे महत्त्व समजावण्यात यश येत असल्याचा दावा वन विभागाकडून केला जात आहे.

बंदीपेक्षाही लोकशिक्षणावर भर...

वास्तविक शिफ्टिंग कल्टिवेशन हे आदिवासींच्या संस्कृतीचा एक भाग आहे. एका कुटुंबास पुरेल एवढीच जमीन घनदाट जंगलातून घेतली जाते. जंगलातील शेतीयोग्य जागा स्वच्छ केल्यानंतर आदिवासी त्या जागी एक पूजा बांधतात. भूमिपूजनासाठी विविध प्रकारचे नृत्य केले जाते. या व कामाच्या निमित्ताने सर्व आदिवासी एकत्र येतात. या एकत्र येण्यामुळेच हजारो वर्षांपासूनची भात वाणे, अन्य धान्ये, भाजीपाला वाणे जपली गेली आहेत. सर्वांत महत्त्वाचे आदिवासीची शेती एकल पिकांची कधीही नसते. एकाच क्षेत्रात आठ ते दहा प्रकारची पिके घेतली जातात.

या पिकांवरील रोगकिडीचे प्रमाण अत्यल्प राहते. उत्पादन घेतल्यानंतर सर्व धान्यांचे पूजन केले जाते. या शेतीमध्ये कोणतेही रासायनिक खते, कीडनाशकाचा वापर केला जात नसल्याने पर्यावरणपूरक आहे. अशा सर्व सकारात्मक बाबी विचारात घेता या शेती पद्धतीवर शासनाने बंदी घातलेली नाही. मात्र प्रोत्साहनही दिले जात नाही. या पद्धतीमध्ये सुधारणा कशा करता येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्यात----

१) शेतीसाठी जागा निवडता शक्यतो मोठा नसेल, अशी जागा निवडणे.

२) तोडलेला झाड झाडोरा पूर्ण जाळण्यापेक्षा अर्धवट जाळलेल्या अवस्थेत जमिनीत गाडणे.

३) तेथील औषधी वनस्पतींना संरक्षण देणे.

पर्यावरणाच्या दृष्टीने वाढतोय पेच...

पर्यावरणाच्या दृष्टीने अशी ‘जाळा आणि शेती करा’ पद्धती अधिक हानिकारक असल्याचे पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञांचे मत आहे. नेमके तेच आजच्या वातावरण बदलाच्या पार्श्‍वभूमीवर ठळकपणे उठून दिसते. १८७६ मध्ये डब्ल्यू. डब्ल्यू. हंटर या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्रिपुरामधील सर्व डोंगर, टेकड्या आणि जंगलांसह सुमारे पन्नास हजार आदिवासी आणि त्यांच्या या पद्धतीच्या शेतीचा जंगलावर, तेथील जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला होता. त्यावर आधारित पुस्तकामध्ये ते म्हणतात, ‘‘यामुळे जंगलाची पीछेहाट निश्‍चितच होणार आहे. भविष्यात याचे परिणाम पाहावयास मिळतील.

‘जूम’ पद्धतीमध्ये मोठमोठी झाडे तोडणे, त्यामुळे जमिनीची होणारी धूप, अन्य झाडांवर होणारे परिणाम हे निश्चितच वातावरण बदलास साथ देणारे आहे. या पद्धतीत जमिनीमधील मूलद्रव्य, उपयुक्त जिवाणूंचा नाश तर होतोच पण त्याच बरोबर शेकडो औषधी वनस्पती नष्ट होतात. जमिनीमधील सेंद्रिय कर्ब, नत्र नष्ट होतो. मात्र स्फुरद आणि पालाशचे अधिक राहतो. जमिनीची आम्लता कमी झाल्यामुळे या उपलब्ध मूलद्रव्यांचाही पिकांना फारसा फायदा होत नाही. या पद्धतीमध्ये जमिनीचा सुपीकपणा आणि सर्वांत वरचा बहुमोल थर नष्ट होतो. तो पुन्हा नैसर्गिकरीत्या निर्माण होणे कठीण होते.

थोडक्यात, या क्षेत्राचे नंतर degraded wasteland मध्ये रूपांतर होते. या पद्धतीमध्ये प्राथमिक जंगलाचा नाश होतो. वृक्षांमधील विविधता लयाला जाते, त्यांची संख्या कमी होते, पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते, जमिनीची धूप होते, परिसंस्थेवर परिणाम होतात आणि सर्वात महत्त्वाचे केवळ जंगली तणांचे प्राबल्य वाढते. वातावरण बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ही पद्धती बंद होणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. मात्र चांगल्या आदिवासी प्रथाही जपल्या गेल्या पाहिजेत, असा पेच निर्माण झाला आहे.

त्यातून मार्ग काढण्यासाठी शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये जंगलातील मोकळ्या जागेचा पुनर्वापर करण्यासाठी शासनातर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. त्यात फळ, वृक्ष लागवड,भाजीपाला, पशुपालन, अळिंबी उत्पादन, मधमाशीपालन, रेशीम उद्योग, फुलउद्योग अशा शेती व पूरक व्यवसायाचा समावेश आहे. बांबू आणि रबर लागवड हाही एक उपाय उपलब्ध आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com