
संतोष मुंढे
Jalna Cotton News : स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतकरी ते कापड उद्योजकांपर्यंत थेट साखळी राहील. जालना, घनसावंगी, बदनापूर व भोकरदन या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना शिवार फेरीसह प्रशिक्षणही देण्यात येणार, असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
कृषी विभागाच्या आत्मा मार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प जालना जिल्ह्यात राबविला जात आहे. शेतमालाला भाव नसणे, शेतमालाचे भाव स्वत: ठरवण्याचे अधिकार नसणे, बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या हाती असणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
मात्र, यापुढे कापूस उत्पादक शेतकरी थेट ऑनलाइन विक्री करू शकणार आहे. ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पातंर्गत शेतकऱ्याला बाजारभावानुसार गाठींची विक्री करण्यात येईल, अशी माहिती स्मार्ट प्रकल्पाचे जिल्हा पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ कैलाश राजबिंडे यांनी दिली.
श्री. राजबिंडा यांच्या माहितीनुसार, कृषी विभागांसह महाराष्ट्र कापूस पणन महासंघ महाकॉट, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचाही प्रकल्पात समावेश आहे.
हेक्टरी उत्पादकता वाढवून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे आणि कापसाच्या मूल्य साखळीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे हा स्मार्ट कॉटन प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांचे जवळच्या जिनिंग मिलसोबत करार करण्यात येणार आहेत.
एका गावात २०० एकर कापसाचे क्षेत्र असलेले १०० शेतकरी गटांमध्ये निवड करून त्यातून एक शेतकरी गट प्रमुख म्हणून काम करणार आहे. हे सर्व शेतकरी एकाच वाणाची लागवड करतील.
लागवडीपासून ते वेचणीपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर शेतकऱ्यांना गटप्रमुखांमार्फत सूचना व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांना लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे.
प्रत्येक जमिनीचा पोत, कस, उगवण क्षमता वेगवेगळी असते. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार.
दलालमुक्त ऑनलाइन विक्री...
सर्व शेतकरी गटांची पणन महासंघाकडे रीतसर नोंदणी केली जाईल. शेतकरी गटाने तयार केलेल्या गाठींची संपूर्ण माहिती ऑनलाइन पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. त्यात धाग्याची लांबी, शुद्धता, कापूस व गाठी कोणत्या शेतकरी उत्पादक गटाचा आहे, याची माहिती राहील. त्यानंतर खरेदीदार थेट शेतकरी उत्पादकांकडून कापूस विकत घेऊ शकेल.
ब्रँडिंग करून विकणार कापूस
मानकानुसार कापसात तंतूचे प्रमाण ४३ ते ४४ टक्के हवे. आपल्याकडे ते ३३ ते ४४ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार उत्पादन घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रदेशनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. या गटांना काडी कचरा व भेसळविरहित कापूस कसा घ्यावा याविषयी सांगण्यात येईल. स्मार्ट काॅटन ब्रँडखाली कापूस व गाठींची विक्री करण्यात येईल.
६००० शेतकऱ्यांची निवड होणार
जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ६० गावांमधील प्रत्येक तालुका निहाय १५०० प्रमाणे ६००० शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यांनीहाय ३० प्रमाणे १२० शेतकरी प्रशिक्षण घेतले जातील.
याशिवाय प्रत्येक तालुकानिहाय १५ प्रमाणे ६० गटप्रवर्तक प्रशिक्षणही होतील.सोबतच प्रत्येक तालुका निहाय ३ प्रमाणे १२ शेती शाळा आयोजित केल्या जाणार आहेत.जवळपास १८०० प्रात्यक्षिक या माध्यमातून घेतली जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.