टपाल सेवेतील स्थित्यंतरे

सुरुवातीला टपालाची सेवा देण्यासाठी तिकिटे नव्हती. त्यामुळे धातूचे टोकन शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येत होते. भारतीय टपाल कायदा १८३७ मध्ये आला. १८५४ पासून चिकटवता येतील अशी टपाल तिकिटे वापरात आली.
टपाल सेवेतील स्थित्यंतरे
Indian PostAgrowon

शेखर गायकवाड

एकमेकांना निरोप देण्यासाठी वापरात असलेली टपाल व्यवस्था गेल्या १०० वर्षांमध्ये आमूलाग्र पद्धतीने बदलली आहे. वॉरेन हेस्टिंग यांनी १७६६ मध्ये भारतात फक्त ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या कामासाठी ‘कंपनी मेल’ नावाने पोस्टल सेवा (Postal Service) सुरू केली. लॉर्ड डलहौसीने एक ऑक्टोबर १९४५ साली भारतीय डाक विभागाची स्थापना केली. सुरुवातीला टपालाची सेवा देण्यासाठी तिकिटे नव्हती. त्यामुळे धातूचे टोकन शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येत होते.

भारतीय टपाल कायदा १८३७ मध्ये आला. १८५४ पासून चिकटवता येतील अशी टपाल तिकिटे वापरात आली. १९ वे शतक सुरू झाले त्या वेळेपर्यंत टपाल व्यवस्था भारतात स्थिरावली होती. ग्रामीण भागावर या व्यवस्थेचा अतिशय प्रभाव होता. जवळच्या गावांपर्यंतचा निरोप ओळखीच्या माणसांमार्फत दिला जायचा. परंतु त्यापेक्षा जास्त लांब अंतरावर फक्त टपाल खाते हे निरोपाचे एकमेव साधन होते.

सुरुवातीला अर्धा आणा आणि दोन आणा यांची तिकिटे वापरण्यात आली. पोस्ट कार्ड हा सर्वांत जास्त वापरला जाणारा प्रकार होता. त्या काळात फार कमी लोकांना लिहिता वाचता येत असल्यामुळे सर्रासपणे शिक्षकांची किंवा पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पत्रे लिहिण्यासाठी मदत घेतली जायची. अनेक वर्षांनी आंतरदेशीय पत्रांचा देखील वापर वाढला. त्यामध्ये मजकूर सीलबंद असायचा.

साधारणपणे १९६०-७० पर्यंत पोस्टाच्या बाहेर निरक्षर लोकांना पत्र लिहायला मदत करण्यासाठी किरकोळ रक्कम घेऊन पत्रे लिहून देणारी माणसे बसलेली असायची. त्यांचा उदरनिर्वाह त्या कामावरच चालायचा. माहेरी बाळंतपणाला गेलेल्या पत्नीचा निरोप प्रत्यक्ष डिलिव्हरी झाल्यावर एक-दीड महिन्याने पोस्टामार्फत तिच्या नवऱ्याला मिळायचा. बोलण्याच्या ओघात कार्डवर उरणारी जागा पाहून, आता फार जागा उरली नाही हे पाहून ‘सगळे मुद्दे संपले का,’ अशी विचारणा लिहिणारा करत असे.‘हा आता एवढंच सांगायचं आहे.’ असे सांगून पत्र लिहून झालं तरी नंतर एखादा मुद्दा सुचायचा आणि त्याला ‘ता.क.’ म्हणजे ताजा कलम असे टपालाच्या शेवटी लिहून बारीक अक्षरात राहिलेला मुद्दा लिहिला जायचा.

अति आवश्यक असेल तरच लोक पूर्वी पत्र लिहीत असत. वसतिगृहात शिकणारी मुले आईवडिलांना पैसे पाठवून देण्यासाठी, कोणाचा जन्म झाल्यास आनंदाची बातमी देण्यासाठी, कोणाचे निधन झाल्यास दुःखद बातमी देण्यासाठी आणि दर तीन-चार महिन्यांनी फक्त खुशाली कळविण्यासाठी पत्रव्यवहार होत असे.

मर्यादित शब्द व तातडीचा निरोप देण्यासाठी तार केली जायची. ही सेवा भारतात १८५१ मध्ये सुरुवात झाली. बहुतेक वेळा जवळचा माणूस सीरियस झाल्यावर किंवा मयत झाल्यावर तार पाठवली जायची. कधी कधी तार आली एवढ्या निरोपावरच माणसे मजकूर न वाचताच घाबरून जायची. काही लोक कोणाला कळू नये म्हणून गूढ भाषेत तार करत असत व वाचणाऱ्याला त्याचा अर्थ वेगळा व ज्याला निरोप द्यायचा आहे त्याच्यासाठी वेगळा अर्थ असे.

एकदा बाहेरगावी दौऱ्यावर गेलेल्या एका माणसाने घरी तार केली व त्यात, ‘योजना १ली तून २रीत ठेवली आहे,’ असा मजकूर लिहिला. पोस्टमनने तार त्याच्या पत्नीला देताना, ‘तुमची मुलगी योजना पहिलीतून दुसरीत गेली आहे,’ असे वाचून दाखवले. योजना नावाची मुलगी नसलेल्या पत्नीला त्याचा अर्थ समजला. घरखर्चाला दिलेली रक्कम पहिल्या पिशवीतून काढून दुसऱ्या पिशवीत ठेवली आहे असा त्याचा खरा अर्थ होता.

कमी वेळेत पत्ता न वाचताच आलेल्या कोट्यवधी टपालांचे वर्गीकरण सोपे व्हावे म्हणून पिन कोड वापरात आला. श्रीराम वेलणकर या पोस्ट खात्यातील मराठी अधिकाऱ्याने भारतात पहिल्यांदा पिन कोड पद्धत आणली. बहुसंख्य लोकांना पिन कोड कोणता आहे हे माहिती नसल्यामुळे पत्ता म्हणून जिल्हा आणि गावाचे नाव टाकत असत. त्यातही अक्षर चांगले नसेल, तर आणखी गोंधळ व्हायचा. फक्त मुक्काम पोस्ट आणि जिल्हा लिहून कधी कधी त्याच नावाची अनेक गावे असतील तर टपाल फिरत राहायचे.

टपाल खात्यात वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक सुधारणा झाल्या. १८६८ मध्ये एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टॅम्प सुरू करण्यात आला, राज्याबाहेरील पोस्ट रेल्वेने जायला १८८० मध्ये सुरुवात झाली होती. त्याचबरोबर १८८० मध्ये मनी ऑर्डरची सुरुवात झाली, १८८६ मध्ये स्पीड पोस्ट सुरू करण्यात आले, जगातील पहिली एअर मेल सर्व्हिस २१ फेब्रुवारी १९११ रोजी अलाहाबाद ते नैनी या दरम्यान ६५०० पत्रे नेऊन तिची भारतात सुरुवात झाली.

मागच्या पिढीतील बऱ्याच लोकांनी आई-वडिलांनी लिहिलेली पत्रे, बायकोने लिहिलेली पत्रे जपून ठेवलेली आहेत. मोठ्या व्यक्तीने लिहिलेली वैयक्तिक पत्रे संग्रहालयात सुद्धा पाहायला मिळतात. वि. स. खांडेकरांसारख्या लेखकांनी पत्रांमधील हळुवारपणा मराठी साहित्यात एवढा सहजपणे आणला, की त्यांची पुस्तकातील वाक्ये प्रियकर एकमेकांना लिहून पाठवू लागले. एकमेकांना पत्रे न लिहिणाऱ्या आताच्या पिढीला या भावनाविश्‍वाला मुकावे लागले, असे मात्र सारखे वाटत राहते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com