जंगल अन् दहा नद्यांनी समृद्ध त्रिपुरा

हिमालयाच्या कुशीत उत्तर पूर्वेकडील सात छोट्या राज्यांमधील त्रिपुरा हे छोटे राज्य. या राज्यात पाच पर्वतरांगा, दहा वाहत्या नद्या यामुळे पाऊस पाणी मुबलक. मात्र गेल्या दीड दशकामध्ये अधिक पाऊस, वाढत्या पुरामुळे भातशेती अडचणीत येत आहे.
Tripura
Tripura Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

वातावरण बदलाचे दृश्य परिणाम आपणास मुख्यतः उत्तर, दक्षिण गोलार्ध, बर्फाच्छादित हिम शिखरे आणि सात मुख्य समुद्र अशा ठिकाणी दिसतात. येथील जैव विविधतेवर पर्यावरणाच्या या बाबींचा नकारात्मक परिणाम होतो. तो व्यक्त होतो घनदाट जंगलाच्या माध्यमातून.नष्ट होत चाललेले ॲमेझॉनचे जंगल, आटत असलेल्या नद्या आणि सुपीक शेतांचे होणारे वाळवंट या परिणामातून निसर्गाचे रुदन आपण नेहमीच पाहतो. जागतिक पातळीवर जी व्यथा आहे तीच आपली सुद्धा. हिमालय विरघळत आहे. प. घाट पातळ होत आहे. नद्या शोधाव्या लागत आहेत. समुद्र किनाऱ्यांची भीती वाटत आहे. ही आजची आपली स्थिती.

हिमालय हा सर्व पर्वतांच्या राजा. त्याच्या कुशीत राहणाऱ्या, जगणाऱ्या प्रत्येक जिवाचे, मग ती वनस्पती असो अथवा प्राणी त्यांचे रक्षण करतो. पण आज हाच रक्षणकर्ता वातावरण बदलांच्या जखमांनी विव्हळत आहे. त्याच्या कुशीमध्ये विसावलेल्या राज्यांचे काय होणार? हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सात बहिणींची. उत्तर पूर्वेकडील सात छोट्या राज्यांबद्दल - अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा. त्यातील त्रिपुरा राज्याबद्दल जाणून घेऊ.

त्रिपुरा हे चिमुकल्या राज्याच्या बाजूला तिन्हींकडून आंतरराष्ट्रीय बांगलादेशाच्या सीमेला जोडलेले आहे. तर देशांतर्गत आसाम आणि मिझोरामच्या सरहद्दीलगत आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.३% एवढी (जेमतेम ३६ लाख) लोकसंख्या. वृक्ष श्रीमंती ५० टक्क्यांपेक्षाही जास्त. वातावरण बदलावर मात करण्यासाठी मानवी लोकसंख्या ही वृक्ष संख्येपेक्षा नेहमीच कमी असायला हवी. वृक्ष संख्येपेक्षा मनुष्य संख्या वाढल्यानंतर तो जेव्हा विकासाच्या रथावर स्वार होऊन वेगाने धावू लागतो, तेव्हा त्याच्या गडगडाटापेक्षा वातावरण बदलाच्या उग्र राक्षसाचे विकट हास्य तीव्र असते. पण आपली नजर समोरच असते.

असते. मार्गात येणाऱ्या निसर्गास कापत तुडवत पुढे जात असतो. प्रवासाच्या टप्प्यावर क्षणभर विश्रांती घेऊन मागे नजर टाकणे गरजेचे असते. त्रिपुरा उर्वरित भारताबरोबर राष्ट्रीय महामार्ग आठ मुळे जोडलेले आहे. राज्यामध्ये बोरोमुरा, अथरामुरा, लाँगथराई, शाखान आणि जामपुई या पाच पर्वतरांगा आहेत. या सर्व पर्वत रांगा राज्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आढळतात. या पर्वतराजी आणि घनदाट जंगल यामुळे दक्षिण मध्य मॉन्सून मनसोक्त बरसतो. येथील जंगलात बांबूची घनदाट बेटे आढळतात. राजधानी आगरतला असून, राज्याची ८० टक्के लोकसंख्या शेती आणि वनोपजांवर अवलंबून आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील ८८ टक्के जनता साक्षर आहे. खोल जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा अपवाद वगळता येथे घरटी एक व्यक्ती नोकरी करतेच. हे राज्य दहा वाहत्या नद्यांनी समृद्ध असून, त्यात मनू, गोमती, लोंगाई, फेनी या नद्यांचा अवश्य उल्लेख हवा. त्यात भरपूर पावसामुळे फेब्रुवारीपर्यंत दुथडी भरून वाहतात. उन्हाळ्यात पाणी कमी होते.

होते. जाणकार वृद्धांच्या मते, त्या उन्हाळ्यातही वाहत होत्या. मात्र मागील एक दीड दशकापासून उष्णतामान वाढत चालले असून, या नद्या कोरड्या पडत आहेत. त्रिपुरामध्ये उगम पावणारी गोमती नदी पुढे बांगला देशात जाते. तिला भारत बांगलादेशाची जीवन वाहिनी म्हणतात. तिच्यामार्फत दोन्ही देशांत जलवाहतूक चालते. येथील सर्वच नद्यांवर वातावरण बदलाचा प्रभाव गेल्या दोन दशकांपासून आढळत असला तरी गोमती अधिक संवेदनशील आहे. मॉन्सूनवर अवलंबून असलेली ही नदी पावसाळ्याचा अपवाद वगळता स्वच्छ पाणी घेऊन वाहत असे. मात्र गेल्या दीड, दोन दशकांत वाढलेले पावसाचे प्रमाण आणि अफाट वृक्ष तोडीमुळे बहुमोल गाळ घेऊन वाहते. हा सर्व गाळ बांगलादेशात जाऊन, तेथील शेती सुपीक करत आहे. त्रिपुरामध्ये गोमतीचे पात्र पसरू लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात शेतीच करणे अशक्य झाले आहे. याच नदीवर बांगला देशामध्ये ४० चौ.कि.मी.चा मोठा तलाव बांधला आहे. वातावरण बदलामुळे पावसामध्ये झालेली वाढ, नद्यांच्या पुरांचे महापुरात झालेले रूपांतर, विस्तारत असलेले तिचे पात्र त्रिपुरातील हजारो शेतकऱ्यांना खरीप पिकापासून वंचित करत आहे.

पाऊस थांबवणे कठीण आहे, मात्र नदीचे पात्र पसरण्यापासून निश्‍चितच वाचवता येईल. त्यामुळे त्रिपुरा शासन गोमतीच्या दोन्ही तीरांवर स्थानिक वृक्षांची लागवड करून तिचे पात्र स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. गोमतीच्या उगम स्थानापासून ते बांगलादेश सीमेपर्यंत लोक सहभागातून वृक्ष लागवडीने तीर संरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी बांबूच्या बेटांचा यशस्वी वापर केला जात आहे. हा गाळ नेण्याची शेतकऱ्यांना परवानगी व आर्थिक मदत दिली जात असली तरी बांबू तोडण्यास मनाई आहे. वाळू उपशावर संपूर्ण बंदी आहे.

गोमती - नाव एकच, वर्तन मात्र भिन्न

त्रिपुरा राज्यात अनेक लहान मोठे तलाव असून, त्यांचे व्यवस्थित संवर्धन केले जाते. भरपूर पाऊस, मुबलक पाणी यामुळे त्रिपुरामध्ये भात शेती उत्तम होते. त्रिपुरामधील यशस्वी भात शेतीचे रहस्य हे बांगलादेशमधील विस्थापित शेतकऱ्यांमुळे आहे. पूर्वी हे शेतकरी मेघना आणि पद्मा या बांगलादेशामधील मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात भात शेती करत. वातावरण बदल, कोसळणारा पाऊस आणि न ओसरणारा पूर या तिहेरी संकटामुळे या शेतकऱ्यांची भात शेती वाहून जात असे. त्रिपुरामधून येणारी गोमती पुन्हा बांगलादेशमध्ये मेघनेला मिळते. तिथे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्रिपुरामधील गोमती प्रतिवर्षी बांगलादेशमधील कोमिला शहरास पाण्याचा वेढा घालत असे. तिला कोमिलाचे दुःख (Sorrow of Comilla) असे म्हणतात. मात्र या नदीवर धरण बांधल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे.

मनिला येथील भात संशोधन केंद्रामुळे बांगलादेशातील शेतकरी भात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरत. मात्र आज मेघना आणि पद्माच्या महापुरामुळे हे शेतकरी शेतमजूर म्हणून त्रिपुरात अवैधरीत्या प्रवेश करतात. या मजुरांमुळेही त्रिपुरातील भात शेतीमध्ये सुधारणा होत आहे. यात एक विलक्षण योगायोग असा की त्रिपुरामधील गोमती १४० कि.मी. पल्ला तोडत शेकडो टन सुपीक मातीसह बांगलादेशात प्रवेश करते. तिच्या पाण्यावर आणि धरणाच्या साह्याने तेथील शेतकरी भरपूर भात पिकवतात. अजून एक गोमती नदी जी मध्य प्रदेशामधून उत्तरप्रदेशात शिरते.

३९० किमी प्रवास करून गंगेला मिळते. हीच गंगा पुढे बांगलादेशात प्रवेश केल्यावर पद्मा होते. मात्र त्याच वेळी वातावरण बदलाच्या परिणामामुळे मेघना, पद्मा या बांगलादेशाला जलमय करतात. शेती करणे अशक्य करून सोडतात. दोन नद्या नाव एकच पण एक कल्याणकारी तर दुसरी विनाशास आमंत्रण. बांगलादेशातील शेतकऱ्यांना शेतमजूर म्हणून त्रिपुरात यावे लागते. असे मानवी आणि प्राणी स्थलांतर हा वातावरण बदलाचा अतिशय गंभीर परिणाम असून, तो भविष्यामध्ये अधिक उग्र होत जाणार आहे. त्यात पहिला बळी शेती आणि शेतकऱ्यांच्या असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com