Amit Shah PACS: देशात आणखी दोन लाख प्राथमिक कृषी सहकारी संस्था उभारणार 

देशातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना बळकट करून ग्रामीण भागाचा कायापालट केला जाईल, असे शाह यांनी यावेळी सांगितले.
Amit Shah PACS
Amit Shah PACSAgrowon

देशात आणखी दोन लाख नवीन प्राथमिक कृषी सहकारी संस्था (Primary Agriculture Co-operative Societies- PACS) उभ्या केल्या जातील.

तसेच अमूलच्या धर्तीवर तीन नवीन बहुराज्य सहकारी संस्था उभारण्यात येतील. या संस्था बीजोत्पादन, सेंद्रिय शेती आणि निर्यात या क्षेत्रात काम करतील.

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी या बहुराज्यीय सहकारी संस्थांशी थेट जोडले जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (ता. १९) पुण्यात दिली.  

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सहकार महापरिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते शनिवारी (ता. १९) बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,  ‘सकाळ'चे अध्यक्ष प्रताप पवार, ‘सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, मुंबई बॅँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते.

देशातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना बळकट करून  ग्रामीण भागाचा कायापालट केला जाईल, असे शाह यांनी यावेळी सांगितले.

‘‘या संस्था आता केवळ शेती कर्ज वाटपाचे काम करणार नाहीत. तर गावपातळीवर ३०० सरकारी योजना राबविण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात येईल.

विविध ३० प्रकारची कामे त्यांच्याकडे सोपविण्यात येतील. बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्थांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात येईल,'' असे शाह म्हणाले.

देशात सध्या ६३ हजार प्राथमिक कृषी सहकारी संस्था आहेत. त्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तयार करण्याचे काम सुरू आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्राथमिक कृषी सहकारी संस्था असावी यासाठी नवीन दोन लाख संस्था सुरू केल्या जातील.

त्या आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभ्या राहाव्यात यासाठी मॉडेल तयार करण्यात आले आहे, असेही शाह यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रासारखे मोजके अपवाद वगळता देशात सहकाराची स्थिती फारशी समाधानकारक नाही.

त्यामुळे संपूर्ण देशात सहकाराचे जाळे विणण्यासाठी प्राथमिक सहकारी संस्थांची संख्या वाढवून त्यांना बळकट केले जाणार आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com