
Ratnagiri Rabi Crop Sowing : यंदा लांबलेला पाऊस, पडीक जमिनीच्या ठिकाणी बांधलेले कच्चे बंधारे आणि कृषी विभागाकडून (Agricultural Department) वितरित करण्यात आलेल्या बियाणे त्यामुळे यंदा रब्बी हंगामात (Rabi Season) गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार हेक्टरवर अधिक लागवड (Rabi Cultivation) झाली आहे.
गतवर्षी नऊ हजार ३१ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ११ हजार ०६९ हेक्टरवर रब्बी हंगामात कडधान्य, फुलशेतीसह (Flower Farming) अन्य लागवड झाली आहे.
कोकणात पाण्याचा अभाव असल्यामुळे रब्बी हंगामात लागवड करण्यावर कमी भर असतो. बहुसंख्य गावांमध्ये वायंगणी शेती म्हणजेच हिवाळ्यात करण्यात येणारी लागवड होते. गेल्या काही वर्षांमध्ये पडीक जमिनी रब्बी हंगामात लागवडीखाली याव्यात यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू होते.
यंदा ‘आत्मा’ विभागाकडून सुमारे १६ हजार बियाण्यांची पाकिटे शेतकऱ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर अनुदानावरही भाजीपाला, कडधान्य, फळभाज्या, फुलशेतीसाठी बियाणे दिली गेली. तसेच गावातील छोटे वहाळ, नद्या यावर बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले.
त्यामुळे किनारी भागामध्ये लागवड झालेले क्षेत्र अधिक असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.
कोरोनामध्ये घरगुती भाजीपाला विकून उदरनिर्वाह केल्याची अनेक उदाहरणे असल्यामुळे अनेक तरुणांनी, महिलांनी रब्बी हंगामात भाजी विक्रीला प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे यंदा जिल्ह्यात भातशेती आटोपल्यानंतर त्वरित अनेकांचा कल रब्बीतील लागवडीकडे होता.
यामध्ये सर्वाधिक पालेभाजी २ हजार १०८ हेक्टर, कलिंगड ३४७ हेक्टर, फळभाजी २३० हेक्टर, कुळीथ २ हजार ५०७ हेक्टर, वाल १ हजार ६२२, पावटा १ हजार ५४२, चवळी ५४७, मूग ३४८ हेक्टरवर तर यंदा नव्याने लागवड केलेल्या मसूरची २१७ हेक्टरवर लागवड केली आहे.
यंदा लागवड झालेल्या ११ हजार ०६९ हेक्टरपैकी कडधान्य ७ हजार २८४, भाजीपाला ३ हजार ५३७, तृणधान्य ५३.९२ तर ६७ हेक्टरवर गळीतधान्याचा समावेश आहे. राजापूर तालुक्यात ४३.६० हेक्टरवर ऊसाची लागवड केली गेली.
तालुकानिहाय लागवड स्थिती
तालुका क्षेत्र (हेक्टर)
मंडणगड - ८४६
दापोली - ६९७
खेड - १,१२९
गुहागर - ५७६
चिपळूण - ८०३
संगमेश्वर - १७८४
रत्नागिरी - २९९५
लांजा - १२५१
राजापूर - १५३१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.