Climate Change : हवामान बदल समजून घ्या...

हवामानातील बदल हा सध्या जागतिक पातळीवरील चर्चेचा विषय ठरला आहे. तथापि, त्याचे गंभीर परिणाम पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर दिसून येताहेत.
Climate Change
Climate ChangeAgrowon

हवामानातील बदल (Climate Change) हा सध्या जागतिक पातळीवरील चर्चेचा विषय ठरला आहे. तथापि, त्याचे गंभीर परिणाम पिकांच्या वाढीवर (Crop Growth) व उत्पादनावर (Agriculture Production) दिसून येताहेत. अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास अवकाळी पाऊस (Untimely Rain), गारपीट, कडाक्याची थंडी (Cold Weather), उष्णतेची लाट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ (Drought) या सर्वांचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो.

Climate Change
Climate Change : एकात्मिक शेतीवर द्या भर

यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी हवामान बदल ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. पिकांचे नियोजन हे जमीन पाणी व हवामान या तीन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. पीक वाढीचा व हवामानाचा निकटचा संबंध आहे. सध्या वातावरणातील बदलांचा विचार केला, तर पीक नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वातावरणातील बदलाचा पिकांवर काय परिणाम होतो तसेच त्यावर कशी मात करता येईल, ते पाहूया

तापमानवाढीचा पिकावर होणारा परिणाम

शेतीसंबंधी असणारे सर्व जोडधंदे उदा. दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन बहुतांशी तापमानावरच अवलंबून असतात. तापमान प्रत्येकी १ अंश सेल्सियस वाढले तर मका, ज्वारी, गहू व धान उत्पादनात अंदाजे १० टक्के इतकी घट होते. तापमान वाढल्यामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी होते. जमिनीचे तापमान वाढल्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होतो व उपयुक्त जिवाणूंची घट होते.

Climate Change
Climate Change : विदेशी मदतीवर चाललेला अडखळता देश

पावसाचा पीक उत्पादनावर होणारा परिणाम

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा सतत पडणाऱ्या जोराच्या  पावसामुळे ओला दुष्काळसदृश परिस्थिती तयार होते. अतिपावसामुळे पिकाच्या काढणी, आंतरमशागती व लावणीवर परिणाम होतो. पिकांची पडझड होऊन आतोनात नुकसान होते. 

थंडी, उष्णतेची लाट, वादळ यांचा पिकावरील परिणाम

वातावरणात अचानक बदल होऊन कडाक्याची थंडी किंवा लाट आली तर केळी, द्राक्षे, फळबागा, भाजीपाला या पिकांवर परिणाम दिसून येतो. याचप्रमाणे उष्णतेची लाट आल्यासही काही पिके तग धरू शकत नाहीत. ती करपून वाळून जातात. तसेच जर धावते वादळ झाल्यास उसासारखी पिके लोळतात. काढायला आलेली भातासारखी पिके झडतात. केळीसारख्या पिकाची पाने फाटतात, उन्हाळी पिकांवर व फळबागांवर धूळ साचल्याने त्यावर रोग आणि किडीची वाढ होऊ शकते.

आर्द्रतेचा पीक उत्पादनावरील परिणाम

आर्द्रतायुक्त हवामान काही पिकांना पोषक तर काही पिकांना हानिकारक असते. द्राक्ष पिकाला आर्द्रतायुक्त हवामान घातक ठरते, तर पानमळ्यास पोषक ठरते. भाजीपाला पिकास थंड हवामान मानवते, तर ज्वारी, बाजरी, धान पिकांना उष्ण-कोरडे हवामान मानवते. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते.

ढगाळ हवामानाचा पिकावर होणारा परिणाम

ढगाळ हवामानामुळे उभ्या पिकांवर वेगवेगळ्या किडी व रोगांचा हमखास प्रादुर्भाव होता. किडी-रोगांचे नियंत्रण करण्यासाठी खर्च तर वाढतोच शिवाय उत्पादनात घट होते. ढगाळ हवामानामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे पिकाची कर्बग्रहण क्रिया ठप्प होते व उत्पादनात घट होते.

बदलत्या हवामानानुसार करावयाच्या उपाययोजना

हवामानावर आधारित कृषी सल्ल्याचा वापर वाढवणे व त्यानुसार पीक व्यवस्थापनात बदल करणे महत्त्वाचे आहे.

हवामान बदलानुसार पिकांचे तंत्रज्ञान विकसित करणे. कृषी हवामान विभागानुसार पीक पद्धतीत बदल करणे.

विविध कृषी हवामान विभागानुसार पीक प्रारूप तयार करावीत व त्याप्रमाणे पिके घ्यावीत.

हवामान बदलास योग्य अशा एकात्मिक शेती पद्धतीचे वेगवेगळे प्रारूप (मॉडेल) तयार करावे.

बदलत्या हवामानानुसार पीक तंत्रज्ञान वापरून खते व पाणी इत्यादींनी कार्यक्षमता वाढवावी.

जैविक व अजैविक ताण सहन करणाऱ्या वाणांचा वापर करावा.

कोरवाहू क्षेत्रात ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर वाढवावा.

पाणलोट क्षेत्रामध्ये मृदा व जलसंधारण पद्धतीचा विकास करून हवामान बदलाची तीव्रता कमी करता येते.

बदलत्या हवामानाला तोंड देशासाठी शेतीमध्ये वाक्य तेवढा कृषी यांत्रिकरणाचा वापर करावा.

- प्रवीण सरवळे, सहायक प्राध्यापक, बारामती कृषी महाविद्यालय (९८५०८८१८२८)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com