पुस्तकांनी दिलंय एक अनोखं विश्‍व

जिथं जिवंत माणसं वेळेनुसार वागतात अन् बोलतात तिथं पुस्तकांतील शब्दांनी दिलाय खूप मोठा आधार कधीही न संपणारा... दिलीये खूप मोठी प्रेरणा आणि जगण्यातला आनंद कित्येक पटीने वाढवलाय.
पुस्तकांनी दिलंय एक अनोखं विश्‍व
Mashagat ArticleAgrowon

जिथं जिवंत माणसं वेळेनुसार वागतात अन् बोलतात तिथं पुस्तकांतील शब्दांनी दिलाय खूप मोठा आधार कधीही न संपणारा... दिलीये खूप मोठी प्रेरणा आणि जगण्यातला आनंद कित्येक पटीने वाढवलाय.

त्या शब्दांची, लेखकांची, पुस्तक प्रवासातील प्रत्येक व्यक्तीची आजन्म ऋणी राहील. कारण त्यांनीच तर दुःखातून सावरायला मदत केली. कित्येकदा. मोठा पंकजदादा जेव्हा शहीद झाला तेव्हा आदरणीय राऊतसरांनी परिवारापुढे काही पुस्तके सुचवली. धनंजय देशपांडे यांचे ‘दिव्यस्पर्शी’ पुस्तक म्हणजे डॉ. राम कृष्णराव भोसले यांच्या जीवनातील दिव्य अनुभवच. डॉ. राम हे अत्यंत लहान वयात सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत जगातील सर्वश्रेष्ठ मसाजिस्ट बनले. त्यांची हिमालयात सहा वर्षे योगसाधना घडली.

जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदा परिक्रमा दरम्यानचे अनुभव असलेले ‘नर्मदे हर हर’ पुस्तकातून अहंकाराचा नाश, आसक्तीरहित जीवन कसं असतं या दोन गोष्टींचे अनुभव येतात. वृन्दा भार्गवे यांचे ‘व्हाय नॉट आय?’ अंधारावर उजेड करणाऱ्‍या मायलेकीची वास्तव कहाणी आहे ही. टपोऱ्‍या डोळ्यांची देवू जेव्हा अकस्मात दृष्टी गमावते तेव्हा तिची आई आणि देवू मनाच्या सामर्थ्याने, जिद्दीने यशस्वी प्रवास करतात. खूप सकारात्मक आणि विलक्षण कहाणी आहे ही. या तिन्ही पुस्तकांबाबत राऊत सरांची ऋणी आहे. कारण या पुस्तकांनी आपल्या दुःखापेक्षाही मोठं दुःख जगात आहेत, संसारातील आसक्ती, मोह, माया या पलीकडे जाऊनही एक निरागस, स्वच्छंदी, आसक्ती विरहीत सुंदर जीवन जगता येत हे शिकवलं. आणि हळूहळू आम्ही सर्व कुटुंबीय दुःखातून सावरायला शिकलो. आईवडिलांकडून, शिक्षकांकडून, वाचनातून, ऋणानुबंध परिवाराकडून, अनेक मैत्रिणींकडून खूप सुंदर, प्रेरणादायी, सकारात्मकता वाढवणारी, आध्यात्मिक जागृती करणारी पुस्तके वाचण्याची संधी मिळाली.

रॉन्डा बर्न यांचे रहस्य, त्याचबरोबर त्यांची इतर पुस्तके, तसेच रॉबिन शर्मा, जोसेफ मर्फी या लेखकांची सकारात्मक ऊर्जा देणारी पुस्तके वाचली तेव्हा असं जाणवलं, की आपण जो विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडतं. मग सर्वांनी मिळून देशकल्याणाचा विचार केला तर देश किती प्रगती करेल.

शिक्षणविषयक पुस्तकांमधून खूप नवीन संकल्पना अनुभवयास मिळाल्या. ताराताई मोडक, गिजुभाई बधेका, अनुताई वाघ, प्रवीण दवणे, लीला पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील खूप सुंदर पुस्तके आपणासाठी लिहिली आहेत. आदरणीय रूपाली दिवटे मॅडम यांनी सांगितलेल्या हीराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ या पुस्तकात परमात्मा प्राप्तीचे तीन मार्ग आहेत. राधानाथ स्वामींचे ‘तृषार्त पथिक’ यात सांगितलंय, की सुख हे विशिष्ट भौतिक वस्तू नसून ते देण्यामागील प्रेमभावनेत असते. पुस्तकांविषयीचे खूप अनुभव आहेत. आपणही जरूर ही पुस्तके वाचून परमानंद घ्याल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com