Funeral : अंत्यविधीच्या बदलत्या पद्धती

मृत्यूनंतरच्या विधींमध्ये त्या त्या भागात असलेल्या चालीरीती आणि परंपरेप्रमाणे अंत्यविधी करणे, सावडणे, दहावा किंवा तेरावा दिवस हा मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दुःख संपवून गोड-धोडाचे जेवण आप्तेष्टांना दिले जात होते.
Funeral
FuneralAgrowon

मृत्यूनंतरच्या विधींमध्ये (Funeral Practices) त्या त्या भागात असलेल्या चालीरीती आणि परंपरेप्रमाणे अंत्यविधी करणे, सावडणे, दहावा किंवा तेरावा दिवस हा मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दुःख संपवून गोड-धोडाचे जेवण आप्तेष्टांना दिले जात होते. दहावा किंवा तेराव्याला जवळचे नातेवाईक दुःखी कुटुंब प्रमुखाला टॉवेल, टोपी, कपडे देत. या संदर्भात जगातील भिन्न संस्कृतीमध्ये भिन्न चालीरीती आढळतात. प्रत्येक गोष्टींमध्ये बदल झाला आहे.

Funeral
‘ॲग्रोवन’ बनला शेतकऱ्यांचा भक्कम आधार : साखर आयुक्त शेखर गायकवाड

मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाला अंघोळ घालणे, कपडे घालणे, मंत्रपाठ म्हणणे, माळा किंवा वस्त्रे घालणे या बाबत प्रत्येक जातींमध्ये वेगवेगळी प्रथा होती व आहे. त्याचप्रमाणे मृत शरीराला स्मशानभूमीमध्ये नेईपर्यंत तिरडी, गाडी, पालखी, शवपेटी, खुर्ची आदी अनेक प्रकारचे वाहन वापरले जात असे. आता त्यात शववाहिकेची भर पडली आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बहुतेक गावांमध्ये नियमित बांधकाम केलेली स्मशानभूमी नसायची. दोन ओढ्यांच्या संगमाच्या ठिकाणी किंवा नदीच्या कडेला अंत्यविधी केला जात असे.

Funeral
इथेनॉलमुळे ऊस, साखरेला दर मिळेल : शेखर गायकवाड

१९६० नंतर ग्राम पंचायतींच्या मार्फत स्थानिकरीत्या स्मशानभूमीसाठी जागा निश्‍चित करून किंवा पत्र्याचे शेड करून स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. शहरांमध्ये मोठ्या लोकसंख्येला व विविध समाजाला पुरतील एवढ्या स्मशानभूमी बांधण्यात आल्या. लाकडे रचून मोकळ्या जागेत अंत्यविधी करायची पद्धत भारत आणि नेपाळमध्ये हजारो वर्षापासून आहे. जागेच्या अभावी ही पद्धत प्रसिद्ध पावली. त्यानंतर बंद भट्टीत प्रेते जाळण्यास सुरुवात झाली. जाळल्यानंतर एक-दोन किलो अस्थी शिल्लक राहतात. पुरातत्त्व खात्यानुसार प्रेते जाळण्याची ही पद्धत १७०० वर्षे जुनी आहे.

ऑस्ट्रेलिया येथील लोक मोंगो येथे अर्धवट जाळलेले मोंगो महिलांचे अवशेष पुरातत्त्व खात्याला सापडले. प्रेत जाळणे, पुरणे, उघड्यावर पक्ष्यांसाठी टाकणे ही पद्धत त्या त्या संस्कृतीप्रमाणे हजारो वर्षांमध्ये उत्क्रांत झाली आहे. प्राचीन इजिप्तमध्ये आत्माच्या प्रवासाच्या संकल्पनेतून मयत व्यक्तीला वेगवेगळे लेप देऊन त्याची मम्मी बनवण्याचे तंत्र प्रगत झाले होते. युरोपमध्ये सुद्धा इ.स. २००० पूर्वी प्रेते जाळत असल्याचे पुरावे सापडले आहेत. प्रेते जाळण्याच्या भट्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गेल्या शतकांत बदल घडले. औद्योगिक भट्टीच्या ऐवजी १९६०-७० च्या दशकात मोठ्या शहरात विद्युत दाहिनी बसवण्यात आल्या.

Funeral
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड

वाळलेल्या लाकडाचा तुटवडा पाहता त्या तुलनेत विद्युत दाहिनी या वर्षभर चालत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात विद्युत दाहिनीला असलेला विरोध हळूहळू मावळला. अगदी अलीकडे विद्युत दाहिनीऐवजी आता गॅस दाहिनी आल्या असून, गॅस दाहिन्यांमुळे अंत्यविधीचा खर्च बराच खाली आला आहे. सांगलीला जिल्हाधिकारी असताना मी यासंबंधी बरीच माहिती घेऊन अनेक नगरपालिकांमध्ये गॅस दाहिनी बसवण्यास प्रोत्साहित केले होते. पारंपरिक पद्धतीने लाकडांचा वापर करून अंत्यविधी केल्यास सुमारे सहा ते सात हजार खर्च येतो, तर गॅस दाहिनीमुळे हा खर्च ७००-८०० रुपयांच्या खाली आलेला निदर्शनास आले.

अंत्यविधी केल्यानंतर नातेवाइकांना मिळणारी राख किंवा अस्थी यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन हिमालयातील डोंगर रांगावर अनेक नद्यांमध्ये व शेतांमध्ये करण्यात आले होते. आजही महाराष्ट्रातील अनेक लोक अस्थी विसर्जनासाठी नाशिकमध्ये जातात. परदेशात हेलीयमच्या फुग्याद्वारे किंवा फटाक्यांद्वारे, बोटींद्वारे किंवा विमानांमध्ये टाकून राख आपल्याच शेतात किंवा झाडांना टाकून अस्थींचे विसर्जन करत आहेत.

जागतिक पातळीवर काही कंपन्या अंत्यविधीनंतर आलेल्या अस्थी राखेचे रूपांतर कृत्रिम हिऱ्यांमध्ये (डायमंड) परावर्तित करून त्यांचे दागिने करत आहेत. या दागिन्यांना क्रिएशन ज्वेलरी, फ्युनरल ज्वेलरी, आठवणींची ज्वेलरी किंवा स्मरण ज्वेलरी म्हणून ओळखले जाते. आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर अस्थीचे रंगांमध्ये मिश्रण करून त्या रंगाने मृत व्यक्तीचे पोट्रेट पेंटिंग करण्याची सुद्धा पद्धत आहे. समाधी बांधून त्यामध्ये अस्थी ठेवण्याची देखील पद्धत आहे. गंगा, त्रिवेणी संगम, सतलज, गोदावरी नद्यांमध्ये पूर्वी प्रेते थेट पाण्यात सोडण्याची पद्धत होती.

अतिशय प्रदूषण वाढल्यानंतर ही पद्धत कमी झाली. कोविडच्या काळात अनेक जवळच्या नातेवाइकांना अंत्यदर्शनदेखील चेहरा पाहून करता आले नव्हते. जवळचे नातेवाईक नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी गेल्यानंतर व्यापारी तत्त्वावर अंत्यविधी करून देणारे व्यवसाय उभारले जात आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ येत असले तरी अंत्यविधीच्या वेळी घरातली माणसे जवळ असू शकतील का, हे प्रश्‍नचिन्ह मोठे होत आहे.

एका शहरात अनेक दिवस आजारी असलेल्या सासूच्या मृत्यूनंतर सुनेने चक्क नोकरीच्या ठिकाणावरून फोन करून नवऱ्याला सांगितले, की तुम्ही हॉस्पिटलमधून बॉडी घेऊन परस्पर स्मशानभूमीमध्ये नेऊन अंत्यविधी करा. आपण दोघेच असताना बॉडी घरी आणण्यात काही अर्थ दिसत नाही. ही घटना सगळ्यांच्या जीवनात नवे प्रश्‍न निर्माण करणारी आहे, हे मात्र नक्की

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com