शेतकरी : विकास निवृत्ती गवळी
गाव : नारायण टेंभी, ता. निफाड, जि. नाशिक
एकूण क्षेत्र : १५ एकर
कारले लागवड : २ एकर
नाशिक जिल्ह्यातील नारायण टेंभी (ता. निफाड) येथील विकास गवळी यांची १५ एकर शेती. त्यापैकी २ एकरांत कारले लागवड आहेत. उर्वरित क्षेत्रापैकी द्राक्ष बाग ८ एकर, कांदा ५ एकर आहे. याशिवाय टोमॅटो लागवडही केली जाते. टोमॅटो पीक निघाल्यानंतर त्याच शेतामध्ये कारले लागवडीचे नियोजन केले जाते.
शिक्षण पूर्ण करीत असल्यापासून विकास यांनी शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. त्या वेळी अधिक क्षेत्रावर द्राक्ष लागवड होती. मात्र गेल्या काही वर्षांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे द्राक्ष मालाचे नुकसान, दरातील अस्थिरता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभावित झालेल्या बाजारपेठ या सर्व बाबींचा विचार करून २ एक क्षेत्रावर द्राक्ष लागवड काढण्याचा निर्णय घेतला.
द्राक्ष बाग तोडल्यानंतर सुरुवातीला २०२१ मध्ये भाजीपाला पिकांचा अभ्यास सुरू केला. त्यातून वेलवर्गीय कारले पिकाचे अर्थकारण योग्य वाटल्याने कारले लागवडीचा निर्णय घेतला. त्यामध्ये वाण निवड, लागवड पद्धती, कीड-रोग व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थेचा अभ्यास केला.
उन्हाळी हंगामातील कारले लागवडीसाठी पूर्वमशागत, रोपांची उपलब्धता, सिंचन पद्धती, पीक संरक्षण इत्यादी सर्व बाबींचे योग्य नियोजन केले जाते. बाजारात मागणी चांगली असल्याने कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याचे विकास सांगतात.
लागवड नियोजन
- मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कारले लागवडीचे नियोजन केले. त्यानुसार टोमॅटो पीक निघाल्यानंतर जमिनीची पूर्वमशागत करून शेत तयार केले.
- रोपवाटिकेत अधिक उत्पादकता आणि कीड-रोग प्रतिकारक असे विविध गुणधर्म असलेल्या रोपांची आगाऊ मागणी नोंदवली.
- लागवडीपूर्वी शेणखत १ ट्रॉली, निंबोळी पेंड ५० ते ६० किलो, तर डीएपी, १०:२६:२६ प्रत्येकी ५० किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश २५ किलो प्रति एकर या प्रमाणे वापर केला.
- लागवडीसाठी ४ फूट अंतराचे बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरून घेतला.
- सिंचनासाठी इनलाइन पद्धतीने एक फूट अंतरावर ठिबकच्या लॅटरल टाकून घेतल्या.
- रोपवाटिकेमध्ये रोपांची आगाऊ नोंदणी केली होती. त्यानुसार १५ दिवसांच्या रोपांची उपलब्धता केली. एक रोप साधारण ४ रुपयांना मिळाले.
- सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर ८.५ बाय ३ फूट अंतरावर ५ मार्चला रोपांची लागवड केली. लागवडीसाठी एकरी साधारण १२०० ते १३०० रोपे लागली.
- उन्हाळी लागवड असल्याने दिवसा तापमान अधिक राहते. त्यामुळे सायंकाळी सिंचन करण्यावर भर दिला.
लागवडीनंतरचे नियोजन
- वाढीच्या अवस्थेत साधारण १५ दिवसांनंतर ताटीवर वेल चढविण्यास सुरुवात केली जाते. त्यामुळे वेलींना आधार मिळतो.
- वेलीला आधार मिळण्यासाठी ताटी बांधून त्यावर वेल चढविण्यास सुरुवात केली.
- साधारण ४५ ते ५० दिवसांत सगळ्या ताटी वेलींनी पूर्ण झाकून जातात.
- ताटी विकसित झाल्यानंतर मंडप पद्धतीने त्याच वेलीवर उत्पादन घेतले जाते.
खत नियोजन
- लागवड केल्यानंतर ५ ते ६ दिवसांनंतर दोन दिवसांच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्ये व बुरशीनाशकांची ४ ते ५ वेळेस आळवणी केली.
- पांढरी मुळी सुदृढ होण्यासाठी व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी ह्युमिक ॲसिडचा वापर.
- जमीन भुसभुशीत राहून जिवाणूंची क्रयशक्ती वाढीसाठी जिवाणू खतांचा वापर.
- वेलींच्या वाढीच्या अवस्थेत तसेच फळधारणा अवस्थेत ठिबक सिंचनातून १९:१९:०,१३:०:४५,१२:६१, कॅल्शिअम नायट्रेट यांचा वापर.
कीड-रोग व्यवस्थापन
- वेलवर्गीय फळभाजी पिकांवर प्रामुख्याने नागअळी, फळ पोखरणारी अळी, फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरिक्षण करून शिफारशीनुसार प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन केले.
- नागअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १५ व्या दिवशी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कीटकनाशकांची फवारणी केली.
- अवकाळी पावसामुळे पिकावर भुरी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत.
- फुलकळी धारणा होण्यासाठी आवश्यक फवारण्या
काढणी व उत्पादन :
- मागील महिन्यात २५ एप्रिलला फळ तोडणीस सुरुवात झाली आहे.
- सुरुवातीचे काही तोडे कमी उत्पादन मिळाले. मात्र बाजारात त्या वेळी दर तेजीत असल्याने चांगला फायदा झाला.
- सध्या ४ दिवसांच्या अंतराने आठवड्यातून दोन ते तीन वेळा तोडणी केली जात आहे.
- वेलवर्गीय पिकांत सुरुवातीच्या काळात कमी उत्पादन मिळते. मात्र नंतर उत्पादनात वाढ मिळत जाते.
- आतापर्यंत एकूण ४ तोडे झाले आहेत. एका तोड्याला १०० ते १५० क्रेट, तर एकरी १३०० ते १४०० क्रेट याप्रमाणे उत्पादन मिळते. (एका क्रेटचे वजन साधारण १३ किलो)
प्रतवारीवर भर
माल तोडणीनंतर घराजवळील शेडमध्ये आणला जातो. विक्रीसाठी मालाची गुणवत्ता दर्जेदार असणे अत्यंत महत्त्वाचे असते. चांगल्या मालास अधिक दर मिळण्यास मदत होते. त्यासाठी काढणीपश्चात हाताळणी आणि प्रतवारीवर विशेष भर दिला जातो. प्रतवारीवेळी वेडीवाकडी व पिकलेली कारली फळे बाजूला काढून टाकली जातात.
त्यानंतर क्रेटमध्ये योग्य पद्धतीने भरले जाते. जेणेकरून वाहतुकीमध्ये माल दबून नुकसान होणार नाही. विक्रीसाठी बाजारभावाचा अंदाज घेऊन नाशिक, सुरत येथील व्यापाऱ्यांकडे माल पाठविला जातो. यामध्ये आई शैलाबाई, वडील निवृत्ती व पत्नी तनुजा यांची मदत होते. कारले लागवडीमध्ये प्रा. तुषार उगले यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याचे विकास सांगतात.
संपर्क - विकास निवृत्ती गवळी, ९४०४६८८०८९, (शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.