Indian Agriculture : देऊळगावराजातील विनोद चव्हाण यांनी संरक्षित शेतीतून शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग

शेतीतून नोकरदाराप्रमाणे महिन्याला पैसा मिळू शकतो काय, या प्रश्‍नाला बहुतांश शेतकऱ्यांचे उत्तर कदाचित नकारार्थी असेल. मात्र सेवानगर (ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) येथील विनोद चव्हाण यांनी संरक्षित शेतीमध्ये पगारदाराप्रमाणे नियमित पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Seed Production : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत बीजोत्पादन क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. संरक्षित शेतीमध्ये (शेडनेट, पॉलिहाउस) घेतल्या जाणाऱ्या बीजोत्पादनातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीचा प्रशस्त असा मार्ग तयार केला आहे.

यापैकीच अंधेरा सेवानगर (ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) येथील विनोद मोतीराम चव्हाण हे एक. त्यांची स्वतःची ४ एकर शेती आहे. आई लीलाबाई, बंधू रवींद्र, वडील मोतीराम या सर्वांची १२ एकर असे एकूण १६ एकर शेतीचे व्यवस्थापन ते पाहतात.

स्वतःच्या शेतात सव्वा दोन एकरांमध्ये शेडनेट आहे. शिवाय दीड एकर खुल्या शेतीमध्येही विविध बियाणे उत्पादक कंपन्यांसोबत करार पद्धतीने ते बीजोत्पादन घेतात. कुटुंबीयांच्या उर्वरित शेतामध्ये पारंपरिक पिके घेतात.

कर्जबाजारीपणातून सावरले

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या विनोद चव्हाण यांनी गावातच इलेक्ट्रिकल्सचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. बँक, पतसंस्था, हात उसनवारी यातून कर्ज वाढले. तितके उत्पन्नांचे स्रोत नसल्याने हे पैसा फेडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.

सन २०१८ मध्ये त्यांनी थोडे आणखी धाडस करून कृषी विभागाच्या सहकार्याने २० गुंठ्यांत शेडनेट घेतले. त्यात मिरची बीजोत्पादन कार्यक्रम राबवला. पीक व्यवस्थापनासाठी अडीच लाख रु. खर्च झाला.

त्यातून एक क्विंटल ३२ किलो बियाणे तयार केले. त्याचा सात लाख रुपये मिळाल्याने खर्च वजा जाता निव्वळ साडेचार लाख रुपये नफा शिल्लक राहिला. यातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढला.

Indian Agriculture
HTBT Seed : अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी करू नये

अडचणींतूनही काढला मार्ग

शेती म्हटले की अनेक अडचणी पाचवीलाच पुजलेल्या नुकत्याच उभारलेल्या शेडनेटमध्ये एकच मिरची हंगाम घेतल्यानंतर आलेल्या एका चक्रीवादळामध्ये शेडनेट पूर्णतः उखडले गेले. आता चांगले दिवस सुरू होणार, अशी चिन्हे दिसत असताना संकट आ वासून उभे होते. डोळ्यांत आलेली आसवे तशीच परतून लावली.

शेडनेटमधील बीजोत्पादनावर विश्‍वास ठेवत ते पुन्हा कामाला लागले. आता त्यांनी संरक्षित शेतीत चांगलाच जम बसवला आहे.

आज त्यांच्याकडे १० गुंठे क्षेत्राच्या सात, तर अर्धा एकर क्षेत्राची एक अशा आठ शेडनेट आहेत. या नेटमध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, झेंडू, कारली, पिकॅडोर मिरची, भोपळा अशा विविध भाजीपालावर्गीय पिकांचे बीजोत्पादन काढले जाते. अर्थात, संकटे संपलेली नाहीत.

नुकताच (७ ते ९ एप्रिलदरम्यान) झालेला जोरदार पाऊस, वादळामुळे दोन नेटमधील झेंडू बीजोत्पादनाचे नुकसान झाले. काढणीला आलेला प्लॉट पावसात भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र कोणत्याही स्थितीत हार मानायची नाही, हे विनोद चव्हाण यांनी ठरवलेले आहे.

...असे राहते अर्थकारण

शेडनेटमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरचीची लागवड केली जाते. पाच ते साडेपाच महिन्यांचा हा हंगाम राहतो. १० गुंठे क्षेत्रातील एका नेटमध्ये साधारणतः ९० ते १०० किलोपर्यंत मिरची बियाणे मिळते. याचा दर सात लाख रुपये क्विंटल असा ठरलेला असतो.

जितके किलो बियाणे तितके पैसे येतात. यासाठी दोन ते सव्वा दोन लाखांपर्यंत खर्च येतो. चार शेडनेटमध्ये असे बीजोत्पादन घेतले जाते. त्यातून १० ते १२ लाखांपर्यंत निव्वळ उत्पन्न हाती येत असल्याचे चव्हाण यांनी सांगतात.

डिसेंबरमध्ये याच शेडनेटमध्ये दुसरे पीक म्हणून टोमॅटो, झेंडूची लागवड करतात. टोमॅटोपासून तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात सुमारे १८ ते २० किलो बियाणे मिळते. टोमॅटो बियाण्याचा दर १२ हजार रुपये किलो निश्‍चित राहतो. त्यासाठी उत्पादनखर्च ७० ते ७५ हजार रुपये इतका होतो.

अशाच प्रकारे झेंडू बियाण्याचा दर २५ हजार रुपये प्रति किलो असा ठरलेला आहे. १० गुंठे क्षेत्रातील शेडनेटमध्ये अडीच ते तीन महिन्यांमध्ये १० ते १५ किलोपर्यंत बियाणे मिळते. सव्वा लाखापर्यंत सर्व खर्च होतो. दुसऱ्या हंगामामध्ये १२ ते १५ लाख रुपये मिळतात.

खुल्या दीड एकर शेतीचा ताळेबंद

पीक - क्षेत्र - उत्पादन - दर - उत्पादन खर्च

वांगी - बीजोत्पादन २० गुंठे - २.५ ते ३ क्विंटल बियाणे- ७० हजार रु. प्रति क्विंटल- ५० हजार रु.

मिरची- बीजोत्पादन २० गुंठे - ७० ते ८० किलो बियाणे- ३ लाख रुपये प्रति क्विंटल- ५० हजार रु.

टोमॅटो- बीजोत्पादन १० गुंठे- १८ ते २० किलो बियाणे- १० हजार रु. प्रति किलो - ६० ते ७०

हजार रु.

अशा प्रकारे खुल्या शेतीतील बीजोत्पादनामधून खर्च वजा जाता ४ ते ५ लाख रुपये निव्वळ मिळतात.

एकूण बीजोत्पादनामधून वार्षिक २५ ते ३२ लाख रुपये इतके निव्वळ उत्पन्न हाती येते.

आलेल्या उत्पन्नाचे नियोजन

- पुढील हंगामातील पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत १० ते १२ लाख रुपये येतो. त्याची प्रथम तजवीज केली जाते.

- कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ४ ते ५ लाख रुपये लागतात.

- पहिली तीन वर्षे पूर्वी झालेल्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी गेली.

- गेल्या दोन वर्षांमध्ये उरलेल्या निव्वळ नफ्यातून सिंचनाच्या सुविधा करणे, शेतीमध्ये सुधारणा करणे यावर भर दिला आहे.

- मुलांच्या भवितव्यासाठी काही रक्कम शिल्लक ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. माळरानावर फुलले नंदनवन

- चव्हाण यांची ही शेती अत्यंत हलक्या दर्जाची आहे. चार-सहा इंच इतका मातीचा थर असून, खाली पूर्णतः खडकाळ स्वरूपाची जमीन आहे. या जमिनीमध्ये वडिलांपासून पारंपरिक पिके घेऊनही उदरनिर्वाहाइतपतच उत्पादन कसेबसे मिळायचे. मात्र अशा जमिनीवर संरक्षित शेती आणि बीजोत्पादनातून उत्पन्नाचा स्रोत वाढत गेला. अर्थात, कल्पकता विनोद यांची असली, तरी त्यांना मुलगा मनोज, पत्नी सौ. विद्या, वडील मोतीराम, आई लीलाबाई आणि मुलगी पूजा यांच्यांकडून पाठबळ मिळाल्यानेच ही घोडदौड सुरू आहे.

Indian Agriculture
Bogus Seed In Yavatmal : बोगस बियाण्यांना लावा लगाम

कृषी विभागाकडून मिळाले पाठबळ

सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची होती. त्यासाठी चव्हाण यांनी ३४ बाय ३४ मीटर आकाराचे शेततळे घेतले. यासाठी ३ लाख ३९ हजार रुपये अनुदान मिळाले. अर्ध्या एकरात घेतलेल्या शेडनेटसाठी ४ लाख ३५ हजार रुपये अनुदान भेटले. तुषार संचाला १८ हजार, तर ठिबकसाठी ८० हजार रुपयांचे अनुदान मिळाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

कुशल मजूर घडवले

चव्हाण यांनी बीजोत्पादनाची शेती सुरू केल्यापासून सेवानगर येथील मजुरांनाच प्राधान्य दिले. बीजोत्पादनातील अनेक कौशल्ये येथील महिला, पुरुषांनी हळूहळू संपादित केली आहेत. संरक्षित शेतीत परपरागीकरण तसेच बीज काढण्याची महत्त्वाची प्रक्रिया पुरुष सहजपणे करतात.

तिन्ही हंगामांत मिळून त्यांच्याकडे रोज २५ ते ३० मजूर राहतात. हंगामात ही संख्या ५० पर्यंत राहते. त्यांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे ३०० ते ४०० रुपये प्रति दिन दिले जातात. तसेच अन्य काही सुविधाही पुरवल्या जातात. अगदी त्यांचा चहापाणीही जागेवरच केले जाते. योग्य वागणुकीमुळे मजुरांची कमतरता त्यांना फारशी भासत नाही.

विनोद चव्हाण व कुटुंबीयांनी संरक्षित शेतीमध्ये बीजोत्पादनात सातत्य राखले आहे. या आधुनिक शेती पद्धती आणि बीजोत्पादनाचे स्थिर दर यामुळे त्यांचे अर्थकारणही चांगलेच सुधारले आहे. अन्य शेतकऱ्यांसाठी त्याची शेती दिशादर्शक ठरत आहे.
समाधान वाघ, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी कार्यालय, देऊळगावराजा, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com