Agricultural Research : वागनिंगेन विद्यापीठ : शेती संशोधनाची पंढरी

नेदरलॅंड हा देश अन्न, धान्य, फुले-फळे निर्यात करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश कसा बनला, याचे मला कुतूहल होते. समुद्र हटवून जमीन निर्माण केलेल्या या देशाला मातीचे तर महत्त्व आहेच; पण इतर कष्टांची जोड देऊन त्यांनी हे साध्य केले आहे.
Wageningen University
Wageningen UniversityAgrowon

श्रीरंग गोखले

मी नुकताच नेदरलँडला (Netherland) काही काळ वास्तव्याला असताना वेगवेगळ्या गोष्टी अनुभवत होतो. नेदरलॅंड हा देश अन्न, धान्य, फुले-फळे निर्यात (Fruite Export) करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश कसा बनला, याचे मला कुतूहल होते.

समुद्र हटवून जमीन निर्माण केलेल्या या देशाला मातीचे तर महत्त्व आहेच; पण इतर कष्टांची जोड देऊन त्यांनी हे साध्य केले आहे. त्यातले मुख्य योगदान वागनिंगेन (डच उच्चार वाखनिंगेन) विद्यापीठाचे (Wageningen University) आहे.

कृषी, खाद्यपदार्थ आणि पर्यावरण या विषयांत विद्यापीठात अनेक वर्षे संशोधन होत गेले. त्याचा देशाला आणि जगाला खूपच फायदा झालेला आहे. मला या विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देता आली. त्या वेळी विद्यापीठाच्या कार्याचा आवाका पाहून थक्क झालो.

वागनिंगेन हे खूप जुने आणि छोटे शहर आहे. आज सुमारे दीडशे देशांतले विद्यार्थी इथल्या वागनिंगेन विद्यापीठामध्ये शिकत आहेत. १८७६ मध्ये प्रथम कॉलेज सुरू झाले. त्यानंतर १९१८ मध्ये कॉलेजचा विस्तार होऊन नेदरलँड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची स्थापना झाली.

वागनिंगेन शेती विज्ञानात अग्रेसर तर आहेच, पण या परिसरात अनेक संस्था आणि उद्योगधंदे उभारले गेल्यामुळे ते फूड व्हॅलीच्या केंद्रस्थानी आले आहे.

फूड व्हॅलीमध्ये आंतरराष्ट्रीय अन्न कंपन्या, संशोधन संस्था आणि वागनिंगेन विद्यापीठ असल्यामुळे हा परिसर जगात प्रसिद्ध आहे. वागनिंगेन विद्यापीठाचा परिसर चिंतनशील आणि अभ्यासपूरक अशा विचारांनी भारलेला आहे.

‘निसर्गाची शक्ती वापरून मानवाचा विकास’ हे वागनिंगेन विद्यापीठाचे बोधवाक्य आहे. हे साध्य करण्यासाठी विद्यापीठाच्या कामाचे पुढील सहा विभाग पाडण्यात आले आहेत ः

१) जैवविविधतता (बायोडायव्हर्सिटी)

२) हवामान बदलाचा अभ्यास

३) जैवाधारित चक्राकार अर्थव्यवस्था (सर्क्युलर आणि बायोबेस्ड अर्थव्यवस्था)

४) कुपोषण आणि अन्नसुरक्षा

५) आरोग्य आणि पोषण

६) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

हे सहाही विभाग एकमेकांशी इतके निगडित आहेत की तेथील प्रकल्पांमध्ये एकाहून अधिक विभागांचा समावेश असतो.

१) जैवविविधता

जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) या विषयात पृथ्वीवरचे जीवन वनस्पती, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील परस्पर सहकार्यानेच सुकर होईल, टिकेल हा विचार आहे.

उपयुक्त जीवजंतू व कीटक, वनस्पती आणि प्राणी यांचे सहजीवन, त्यातून जल- जंगल- जमीन यांचा सुनियोजित वापर यात अभिप्रेत आहे.

जमिनीखालील जीवजंतू आणि झाडांची मुळे यांचे परस्परावलंबित्व प्रकर्षाने लक्षात येते. वनस्पती एकमेकांच्या मदतीनेच प्रतिकूल हवामान व रोगराई यात टिकाव धरतात आणि वाढत राहतात.

मिश्र पिके घेणे हे जैवविविधतेच्या दृष्टीने खूप फायद्याचे; परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने कटकटीचे ठरते. वैविध्य असलेली जंगले व मिश्र ग्रासलॅंड्स यांचे फायदे आता अधोरेखित झालेले आहेत.

जगात एकूण सहा हजार प्रकारची धान्ये आपल्याला माहीत आहेत; पण फक्त नऊ प्रकारच्या धान्यांतून आपले दोन तृतीयांश अन्न पदार्थ तयार होतात.

२) हवामान बदलाचा अभ्यास

ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बरेच बदल होत आहेत. त्यामुळे वनस्पती आणि प्राण्यांना पुढील काळात संघर्ष करावा लागणार आहे. दोन प्रकारे हे करता येते.

एक, बदल होणार हे गृहीत धरून आपण बदलणे आणि दुसरे म्हणजे तंत्रज्ञानाने या बदलावर मात करणे. वागनिंगेन विद्यापीठ या दोन्हींचा संगम करीत आहे.

तपमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढणार आहे; पण नेदरलँड हा असा एक देश आहे की ज्याने अनेक वर्षांपूर्वी समुद्रावर मात करून देश वाचवला आणि वाढवला आहे.

३) जैवाधारित चक्राकार अर्थव्यवस्था (Circular and Biobased Economy)

नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून अन्न, रसायने व विविध उत्पादने तयार केली ततरी त्यांचा वापर करताना व करून झाल्यावर त्याज्य वस्तू परत निसर्गात पोहोचण्यायोग्य झाल्या पाहिजेत.

४) कुपोषण आणि अन्नसुरक्षा

जगाची लोकसंख्या २०५० पर्यंत १००० कोटी होईल. दिवसेंदिवस शेतजमीन तर कमी होत जाणार, दुसऱ्या बाजूला हवामान बदलामुळे शेतीवर संकट, पाण्याची कमतरता ही संकटे भेडसावतील.

या सर्वांतून मार्ग काढून एक विश्‍वासार्ह अन्नसाखळी तयार केली जात आहे. नुसते अन्न उत्पादन वाढवून चालणार नाही. कारण त्याचे पर्यावरणावर परिणाम होतील, जैवविविधता धोक्यात येईल; म्हणून या विषयात सर्वंकष संशोधनाची गरज आहे.

अन्नाची नासाडी हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. विद्यापीठाने भारतातील स्थितीचा एक टास्क फोर्स नेमून अभ्यास केला होता. त्यात भारतात अन्नधान्यांच्या नासाडीचे प्रमाण ४० टक्के असल्याचे लक्षात आले.

धान्य उत्पादन, साठवणूक, वाहतूक व टाकून दिलेले तयार अन्न या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या नासाडीचा त्यात समावेश आहे. ही नासाडी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

५) आरोग्य आणि पोषण

खाद्यपदार्थ बनवण्याची प्रक्रिया सतत बदलत असते आणि त्याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याबरोबरच भेसळयुक्त अन्न, खराब अन्न आणि ग्राहकाला फसवून केलेली दडपशाही हे मुद्देही महत्त्वाचे ठरतात.

पदार्थ करताना वापरलेली पद्धती, तयार झालेल्या पदार्थांची गुणवत्ता यावर संशोधन सुरू आहे.

६. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अतिशय वेगाने बदल घडत आहेत. आरोग्य सुलभ खाद्य आणि निरामय वातावरण या दोन विभागांतील संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फार कामी येत आहे.

इमेजिंग प्रोसेसने खाद्यपदार्थांची गुणवत्ता ठरवणे, बदलत्या परिस्थितीत सुद्धा स्वयंचलित शेती, दूरस्थ पशुपालन, पिकांचे कुठले गुणधर्म अनुवंशिक अभ्यासासाठी उपयोगी पडतील असे निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून घेतले जात आहेत.

Wageningen University
Agrowon Agri Exhibition : ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

वागनिंगेन विद्यापीठातील निवडक संशोधन प्रकल्पः

वागनिंगेन विद्यापीठात असंख्य विषयांवर संशोधन चालू आहे. त्यातले काही निवडक संशोधन प्रकल्पांची माहिती खाली देत आहे.

१) TTADDA project ः हा प्रकल्प बटाट्याच्या सर्क्युलर चेनशी निगडित आहे. यात जपानी व डच शास्त्रज्ञ एकत्र येऊन डेटा, सेन्सर आणि रोबोटिक्स यांचा वापर करून बटाट्याच्या उत्पादनाची प्रणाली विकसित करत आहेत.

२) डिजिटल ट्विनः लिडिया ॲफमन यांनी माणसाची एक डिजिटल ट्वीन (कृत्रिम जुळे) प्रतिमा तयार केली आहे.

माणसाबरोबरच त्या कृत्रिम प्रतिमेलाही वेगवेगळी औषधे आणि आहार दिला जातो. आणि त्यातून तब्येतीचे मापन आणि कुठला आहार उपयुक्त आहे याबद्दलची माहिती मिळते.

३) डिजिटल शेल्फः यात एक डिजिटल शेल्फ तयार करण्यात आले आहे. मोबाईल ॲप वापरून ग्राहकांचा विविध वस्तू खरेदी करतानाचा डेटा मिळवला जातो. त्यातून त्याचा कल समजून घेऊन त्याप्रमाणे विक्रीमध्ये बदल केला जातो.

४) स्वयंचलित ग्रीन हाउसः वागनिंगेन विद्यापीठामध्ये ग्रीन हाउसमधली कंपार्टमेंट्‌स भाड्याने देण्याची सोय आहे. तापमान, हवा, उजेड, कार्बन डायऑक्साइड हे सर्व नियंत्रित करता येते.

पाच गट तयार करण्यात आले. त्यांना वेगवेगळे कंपार्टमेंट्स देऊन तेथे लेट्यूसची लागवड करण्यात आली. प्रत्येकाला वेगळा प्रोग्रॅम देऊन, कुठल्या कंपार्टमेंटमध्ये जास्त उत्पादन मिळते, अशी स्पर्धा घेतली गेली. त्यातून पिकाच्या वाढीसाठी पोषक निकष निश्‍चित करण्यात येतील.

५) प्रकाश संश्‍लेषणः या विषयात बरेच संशोधन करून कमी प्रकाशात जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड वापरून जास्त वाढ दर्शवणाऱ्या वनस्पती विकसित केल्या जात आहेत.

६) कोरल रीफः केनियामध्ये कोरल रीफचे पुनरुज्जीवन.

७) मधमाशी संशोधनः मधमाश्यांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. त्यासाठी Bee Landscape तयार करण्यात आले आहे.

Wageningen University
Farmer Incentive Scheme : नियमित कर्जफेडीनंतरही फरफट

८) नेचर इन सिटी प्रकल्पः शहरी लोकांसाठी छतावरील बागा (टेरेस गार्डनिंग) विकसित करण्यासाठी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे.

९) ऑयस्टरची वाढः समुद्र किनाऱ्यावर ऑयस्टरची वाढ केली तर त्यांची भिंत तयार करून तिचा बांध म्हणून उपयोग करणे शक्य आहे. वागनिंगेन विद्यापीठाने बांगलादेशमध्ये असा बांध तयार करून पाण्याला अटकाव केला आहे.

१०) हवामान बदलः MSC/ ASC तंत्रज्ञान वापरून वनस्पतींच्या डीएनएचा अभ्यास करून हवामान बदलला तोंड देण्यासाठी उपयुक्त असे गुणधर्म विकसित केले आहेत.

११) स्ट्रिप कल्टिवेशनः हा प्रयोग खूप यशस्वी झाला आहे. शेतात एकच पीक घेण्यापेक्षा शेजारी शेजारी पट्ट्यांत वेगवेगळी पिके घेणे घेण्याचा हा प्रयोग आहे. त्याचा पीकसंरक्षणासाठी फायदा होतो आणि उत्‍पादनात वाढ होते.

१२) आहारविहाराच्या सवयीः लोकांमध्ये आहारविहाराच्या सवयींबद्दल जाणीवजागरण केले जाते. खानपानाच्या आवडी बदला, मांसाहाराचे प्रमाण कमी करा.

कृत्रिम धागे वापरून तयार केलेले कपडे वापरू नका, ज्यूट, लेनिन किंवा कापसापासून बनलेले कपडे वापरा, कचऱ्याचे वर्गीकरण काळजीपूर्वक करा जेणेकरून त्याचा पुनर्वापर (रिसायकलिंग) करता येईल... अशा विविध मुद्यांचा त्यात समावेश आहे.

१३) सिमेंट पुनर्वापरः बायोवेस्ट वापरून सिमेंटचा पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्याची पद्धती विकसित करण्यात आली आहे. एरवी जुने बांधकाम पाडल्यावर त्यातल्या कॉलम व बीमचे सिमेंट तोडून राबिट म्हणून तसेच गाडले जाते. नवीन संशोधनाप्रमाणे बायोकेमिकलचा वापर करून ते सिमेंट विरघळवले जाईल व त्याचा परत वापर करता येईल.

१४) बायो रिफायनरीः जैविक घटकांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. झाडे, प्राण्यांची वेस्ट, गळाठा, सी वीड, अल्गी यांसारख्या जैविक घटकांपासून अन्न, ऊर्जा, रसायने, पदार्थ, औषधे बनवली जातात.

१५) चारा प्रक्रियाः कडबा सदृश कठीण चारा मऊ बनवणारे सूक्ष्मजीव विकसित करण्यात आले आहेत.

१६) सेल्युलोजः कचरा आणि बायोवेस्टचा वापर करून सेल्युलोज मिळवता येते. पॅकिंग मटेरिअल, डायपर्स, जीन्स, प्लॅस्टिक तयार करण्यासाठी त्‍याचा वापर करता येतो. बायोमासपासून रसायने, शाई, कोटिंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल, कॅबिनेट्स, पॅकिंग इ. तयार करता येतात.

१७) शाश्‍वत फूड पॅकिंगः अन्नाच्या गुणवत्तेला बाधा न आणता, ते दीर्घकाळ टिकेल याची खातरजमा करून शाश्‍वत फूड पॅकिंगवर बरेच काम झालेले आहे.

१८) समुद्रापासून उपयुक्त अन्नः समुद्रापासून उपयुक्त अन्न मिळवण्याची प्रक्रिया, सामुद्रिक शैवाल व इतर वनस्पतींचा अन्नासाठी वापर करण्याशी संबंधित हा प्रकल्प आहे.

Wageningen University
Farmer Issues : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटना आक्रमक

१९) वनस्पतिजन्य मांसाहारः प्राणीज मांसाहारापेक्षा वनस्पतिजन्य मांसाहाराला प्रोत्साहन. प्रथिनांचे नवीन स्रोत विकसित करणे. सोयाबीनवरील अवलंबित्व कमी करणे. पशुखाद्यात कीटक, अल्गी आणि त्याज्य पदार्थांचा वापर.

२०) केळी पीकसंरक्षणः जगभरातील केळी ब्लॅक सिगाटोका आणि पनामा या बुरशीजन्य रोगांनी त्रस्त झालेली आहे. (मातीत ही बुरशी ३० वर्षेसुद्धा राहू शकते.) त्यावर उपाय म्हणून Rockwool मध्ये केळीच्या झाडांची लागवड करण्यात आली. ती यशस्वी झाली आहे.

२१) बायोइंधनः वनस्पतींपासून जैवइंधन (Bio Fuel) बनवून त्यापासून वीज निर्मिती आता प्रचलित झाली आहे. परंतु जिवंत झाडामधून वीज निर्मिती करता येईल, यावर संशोधन झाले आहे. मायक्रोबियल इंधनघटामधून (Fuel Cell) सूक्ष्मजंतूंचा वापर करून एखादे झाड वीज निर्माण करू शकेल, अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे.

नेदरलॅंड हा देश अन्न, धान्य, फुले-फळे निर्यात करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश कसा बनला, याचे मला कुतूहल होते. समुद्र हटवून जमीन निर्माण केलेल्या या देशाला मातीचे तर महत्त्व आहेच; पण इतर कष्टांची जोड देऊन त्यांनी हे साध्य केले आहे.

त्यातले मुख्य योगदान वागनिंगेन (डच उच्चार वाखनिंगेन) विद्यापीठाचे आहे. कृषी, खाद्यपदार्थ आणि पर्यावरण या विषयांत विद्यापीठात अनेक वर्षे संशोधन होत गेले. त्याचा देशाला आणि जगाला खूपच फायदा झालेला आहे. मला या विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देता आली. त्या वेळी विद्यापीठाच्या कार्याचा आवाका पाहून थक्क झालो.

(मी या विषयातला जाणकार नाही. टेरेस गार्डनिंग हा माझा छंद आहे. पण शेतीविषयीच्या उत्सुकतेपोटी मी वागनिंगेन विद्यापीठाविषयी ही माहिती घेतली. जिज्ञासूंनी WUR ही वेबसाइट अवश्य अभ्यासावी. (वेबपेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात इंग्रजी भाषांतर सुविधा उपलब्ध आहे.)

(लेखक व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांना बागकाम व शेती यांत रूची आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com