Ashadhi Wari : भक्तिरसात डुबलेला तो वारकरी

या वर्षी माउली ज्ञानेश्‍वर आणि जगद्‍गुरू तुकोबाराय यांच्या पालख्यांनी तब्बल दोन वर्षांनंतर पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. तो सोहळा दूरचित्रवाणीवर पाहताना काय हर्ष झाला म्हणून सांगू!
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

या वर्षी माउली ज्ञानेश्‍वर आणि जगद्‍गुरू तुकोबाराय यांच्या पालख्यांनी तब्बल दोन वर्षांनंतर पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. तो सोहळा दूरचित्रवाणीवर पाहताना काय हर्ष झाला म्हणून सांगू! कोरोना महामारीमुळे भविष्यात कधी हे पाहायला मिळेल की नाही, याची शाश्‍वती नव्हती. हा कोरोना आपल्यात असाच कायम ठिय्या मांडून राहिला तर आमचं अंतःकरण उजळून टाकणारी ही वारी आम्हाला परत पाहायला मिळेल की नाही, याची खात्री वाटत नव्हती. समाजातील अनिष्ट प्रथांवर चालीरीतींवर ‘वार’ करून समाजाचे प्रबोधन करण्याचे व्रत ज्याने उचललेलं असतं तो वारकरी.

गीतेतील ज्ञान कर्म भक्ती या त्रिगुणांना समाजात स्थिर करण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून भक्तिरसात आकंठ डुंबायला निघालेली व्यक्ती म्हणजे वारकरी! ईश्‍वर भक्तीने माणूस बदलू शकतो, जसा वाल्याचा वाल्मीकी झाला तसा सामान्य माणूससुद्धा उच्चतम शक्तींची अनुभूती घेऊ शकतो हा विश्‍वास ज्याला वाटतो तो वारकरी! हे सर्व गुण समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे माझे आहे, हे काम जर मी केले नाही तर तो पंढरीत कमरेवर हात ठेवून उभा असलेला जो विठ्ठल आहे तो याचा जाब मला विचारल्याशिवाय राहणार नाही, असा विचार जो करतो तो वारकरी. भक्तिरस समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला हवा यासाठी कमळाप्रमाणे सुकोमल ज्याचे हृदय असतं पण अनिष्ट प्रथा, धर्मातील भ्रष्टाचार पाहता जो वज्राहून कठोर होतो तो वारकरी!

माउली ज्ञानेश्‍वरांपासून ते आजतागायत या वारकऱ्यांनी आपल्या या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत आपला घाम गाळला आहे. त्या निःस्वार्थ केलेल्या कामामुळेच आज कोणतेही निमंत्रण नसताना, कोणताही मानपान मिळेल याची खात्री नसताना, खायला मिळेल की नाही, प्यायला पाणी मिळेल का, याची कोणतीही खात्री नसताना कोणती अशी ताकद आहे जी या लाखो लोकांना एका विशिष्ट माळेत गुंफत असते? त्या प्रश्‍नाचे उत्तर शोधणे म्हणजेच ‘स्व’चा शोध घेणे होय. या ‘स्व’चा शोध घेणे या स्वतःचा शोध घेणे हेच भारतीय तत्त्वज्ञान. हे भारतीय तत्त्वज्ञान जसा ‘स्व’चा शोध घेते तसेच इतरांनाही तो शोधण्यासाठी मदत करतो. वारीची ही महान परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे याबद्दल नितांत अभिमान वाटला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com