मराठी साहित्य संमलनामुळे वर्धेकरांचा आनंद द्विगुणित

विविध संस्था, संघटना सहभागी होत एकजुटीने करणार यशस्वी
मराठी साहित्य संमलनामुळे वर्धेकरांचा आनंद द्विगुणित

वर्धा ः २०२३ मध्ये होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अखेर वर्धा या स्थळावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यापूर्वी १९६९ मध्ये वर्ध्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेने यापूर्वीही राज्यस्तरीय, विदर्भस्तरीय आणि जिल्हा पातळीवर संमेलने घेतली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने अखिल भारतीय संमेलनाच्या आयोजनाबाबत वर्धा शाखेवर विश्‍वास दर्शविला.

गांधी जिल्ह्यात हे संमेलन होत असल्याने स्वाभाविकच संमेलनावर गांधीविचारांची छाप राहणार आहे. गांधीविचार हा वैश्‍विक आहे, त्यामुळे या विचाराचे आणि साधन शुचितेचे पालन करण्यावरही भर राहणार आहे. महात्मा गांधीच्या वास्तव्यामुळे या जिल्ह्याला वैचारिक साहित्याची मोठी परंपरा लाभली आहेच, त्या सोबतच ललित साहित्य निर्मितीतही वर्धा जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गांधी-विनोबांच्या या जिल्ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्य संस्था विविध प्रश्‍नांवर वेळोवेळी एकत्र येतात. प्रदीर्घ काळानंतर वर्ध्यात आयोजित या संमेलनात साहित्यप्रेमींच्या उपस्थितीचा उच्चांकही गाठला जाईल, याबाबतही अनेकांनी विश्वास वर्तविला आहे.

--

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने अखिल भारतीय संमेलनाच्या आयोजनाबाबत वर्धा शाखेवर विश्‍वास दर्शविला. साहित्य संमेलन हे सकारात्मकता आणि पुरोगामी विचार समाजात रुजविणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनातही सर्व संस्था - संघटना सहभागी होतील आणि एकजुटीने हे संमेलन यशस्वी करतील, याबाबत जराही दुमत नाही.

- संजय इंगळे तिगावकर, शाखाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, वर्धा

दीर्घ कालावधीनंतर वर्ध्यात साहित्यिक आणि सामाजिक असा उपक्रम होणार आहे. नवसाहित्यिकांसाठी हा एक मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्यांना त्यांच्या साहित्याची दिशा मिळू शकते. ५४ वर्षांनंतर वर्धेला ही संधी मिळाल्याने त्याचा आनंदच आहे.

- प्रदीप दाते, केंद्रीय समन्वयक, विदर्भ साहित्य संघ

५३ वर्षांनंतर वर्ध्यात होत असलेले हे आयोजन आनंदाचीच बाब आहे. यातून साहित्य जळवळीला प्रोत्साहन मिळेल. वर्ध्याला महात्मा गांधी आणि विनोबांचा वैचारिक वारसा लाभ आहे. त्याचाही या संमेलनावर पगडा राहील.

- प्रा. राजेंद्र मुंढे, उपाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, वर्धा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९६ वे संमेलन वर्धेत घेण्याचा ठराव घेतला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबांच्या पावन नगरिला साहित्य दिवाळीचे स्वरूप येईल. या निमित्ताने वर्धा नगरी साहित्य चर्चेचा विषय होईल. या ठरावाचे मी अंतःकरणापासून स्वागत करते.

- प्रा. जयश्री कोटगीरवार, मार्गदर्शक, सृजन साहित्य मंडळ, वर्धा

वर्धा येथे साहित्य संमेलन होणे आनंदाची बाब आहे. इतरत्र होणाऱ्या संमेलनात महिला नव साहित्यिकांना जाणे कठीण जाते. वर्धेकरांसाठी ही बौद्धिक पर्वणीच आहे.

- प्रति तडस वाडीभस्मे, अध्यक्ष, सृजन साहित्य मंडळ, वर्धा

वर्धेत संमेलन व्हावी ही वर्धेकरांची बऱ्याच दिवसांची इच्छा होती. यवतमाळला झालेले संमेलन वर्ध्यात होणार होते. पण काही कारणास्तव ते बारगळले. आता ते वर्धेत होणार असल्याने आनंदच आहे.

- शेख हाशम, मुस्लिम मराठी साहित्य परिषद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com