
Water Management नदयांचे पुर्नजीवन (River Revival) हे त्यांच्या उगमापासूनच असावयास हवे आणि हे कार्य नदीच्या अंतिम टोकापर्यंत लोकसहभागामधून व्हावयास हवे. पवित्र गंगा नदी वाराणसीला स्वच्छ मात्र गंगोत्री (Ganga River) आणि गंगा सागर येथे अस्वच्छ याला नदी स्वच्छता मोहिम (River Cleanliness Campaign) म्हणता येत नाही, मात्र या स्तुत्य प्रयत्नांचे इतरांनी अनुकरण केले तर उगमापासुन नदी निश्चित स्वच्छ होऊ शकते.
जल व्यवस्थापनाच्या यशोगाथेसाठी पीक व्यवस्थापन योग्य हवे. ही दोन्ही व्यवस्थापने कोसळल्यामुळेच आजची भिषण परिस्थिती ओढावलेली आहे.
जलव्यवस्थापना मधील सर्वात नाजूक भाग म्हणजे यातून निर्माण होणार्या सांडपाण्याचे नियोजन. इस्त्राइल या राष्ट्राचे जलव्यवस्थापन हे संपूर्णपणे तेथील सांडपाण्याशी जोडलेले आहे.
सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करुन त्याचा शेतीला वापर करण्यामध्ये इस्त्राइल बरोबर चीन हा देश आज आघाडीवर आहे. सिंगापूर, द. कोरिया हे देश सांडपाण्याचा अतिशय काटेकोरपणे वापर करतात.
जल व्यवस्थापन जर शाश्वत करावयाचे असेल तर भुगर्भामधील जलसंचय वाढणे गरजेचे आहे आणि यासाठी पडणारा पाऊस जमिनित मुरणे हे महत्वाचे आहे.
कोकणामध्ये पडणारा दक्षिण मान्सूनचा प्रचंड पाऊस आहे तसा समुद्राकडे वाहून जातो आणि आम्ही मात्र तेथील माती खडकाला दोष देऊन मोकळे होतो.
विदर्भातही चांगला पाऊस पडतो पण आमच्या रासायनिक जमिनीना तो बरोबर घेऊन नदी नाल्यामध्ये जातो. ज्या भौगोलिक पट्ठयामध्ये भरपूर पाऊस पडतो तेथे सेंद्रिय शेती आणि जंगल निर्मिती हा जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमूना आहे. भूगर्भामधील पाणी संचय यामुळेच वाढतो.
पाण्याचा अनियंत्रित उपसा करण्यासाठी परिसरामधील भुगर्भाला खोल छिद्रे पाडणे हे जल व्यवस्थापनाच्या विरोधात आहे. शासनाने यावर अनेक नियमावली केली मात्र आम्ही पाण्यापेक्षाही त्यास जास्त पुरुन उरलो आहोत.
जल व्यवस्थापन हा शासनापेक्षाही लोकशिक्षणाचाच जास्त भाग आहे तो याच मुळे. पाणी केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हा शहरी तसेच ग्रामिण भागामधील जल व्यवस्थापनातील कळीचा मुद्दा आहे.
देशाच्या विकासासाठी वाहत्या नदयांना बंदिस्त करुन त्यावर मोठमाठी धरणे बांधणे याच्या योग्यतेपेक्षा एका ठिकाणी केंद्रित झालेला हा जलसाठा कसा शाश्वत राहिल, त्याचे शेती, औदयोगिक क्षेत्र आणि शहरी भागासाठी कसे योग्य विक्रेद्रिकरण होईल याबाबतीत जलव्यवस्थापन आज पूर्ण कोसळलेले आहे.
धरणाकाठी रासायनिक शेती करावी का? औदयोगिक क्षेत्रात वापरलेले पाणी कुठे जाते? शहरी भागामधील नळांना ८-१५ दिवसामधून एकदाच पाणी येणे म्हणजे धरण निर्मिती करणार्या पेक्षाही त्या साठवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणार्यांचे गणित कुठेतरी चुकले आहे.
धरणाकाठी आणि आजूबाजूच्या डोंगरमाथ्यावर घनदाट वृक्षराजी असणे हा जल व्यवस्थापनेमधील महत्वाचा धडा आहे. नेमकी या धडयाची पानेच गायब झाल्यामुळे आज महाराष्ट्रामधील शेकडो धरणांनी एप्रिलमध्येच मृत साठयाला स्पर्श केला आहे.
धरणाचा मृत साठा डोळयांना दिसणे म्हणजे जलव्यवस्थापन फसले असे आहे. जल विकेंद्रिकरन म्हणजेच केंद्रिय साठयामधून त्याचा सुनियोजीत पुरवठा हे जल व्यवस्थापनाचे मुख्य अंग आहे. नायझेरिया मधील अनेक शहरात तीन महिन्यामधून एकदाच पाणी पुरवठा होतो.
हे पाणी मोठमोठया टाकीत साठवून ठेवले जात आणि ते लोकाकडून काटकसरीने वापराले जाते. पाऊस भरपूर असुनही तेथील गरिब शासनाने जनतेला लावलेली ही सवय आहे.
पाणी हे कधीही शिळे नसते, आम्ही मात्र त्यास शिळे, निरोपयोगी म्हणून टाकून देतो. इस्त्राइल, सिंगापूर, दुबई, आणि इतर अनेक ठिकाणाच्या शालेय अभ्यासक्रमात नर्सरीपासूनच मुलांना जलव्यवस्थापनाचे धडे शिकवले जातात, दृश्य माध्यमातून गोष्टी रुपाने त्यांना पाण्याचे महत्व शिकवले जाते
म्हणूनच जेमतेम ५ इंच पाऊस पडूनही इस्त्राइल मध्ये आपणास कधीही पाणी टंचाई अथवा जल समस्या निर्माण झालेली आढळत नाही. जलव्यावस्थापन हा प्रश्न आपण शासनावर ढकलून दोषारोप करण्याचा विषय नाही.
यामध्ये आपल्या प्रत्येकाचा मनापासुन सहभाग हवा. पाणी हे निसर्गदेवतेचे स्फटिकासारखे निर्मळ रुप आहे, ते आपण अतिशय आनंदाने निसर्गहस्ते प्राप्त करुन परत ते निसर्गाकडे सुखरुप कसे जाईल याचा सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जलव्यवस्थापन शिकविण्यासाठी निसर्गासारखा उत्कृष्ट शिक्षक नाही फक्त आपणा प्रत्येकास त्याचे विदयार्थी होता आले पाहिजे अन्यथा ‘पाण्यासाठी दाही दिशा, फिरविशी आम्हा जगदिशा’ ही वेळ फार दूर राहिली नाही असे वाटते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.